डॉ मेधा फणसळकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर ☆
काही व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आपल्या आयुष्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तर काही व्यक्ती आपल्या नकळत आपल्याला प्रभावित करत असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे वडील! त्यांचे दादा ; पण खऱ्या अर्थाने बापमाणूस!
‛आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाच्या तब्बल १६१ आवृत्त्या निघाल्या आणि देशी- विदेशी अशा एकूण १७ भाषांमध्ये ते अनुवादित झाले. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. नरेंद्र जाधवांनी या पुस्तकात आपले वडील, आज्जी ,आई यांच्याबद्दल एक एक प्रकरण लिहिले आहे. शिवाय वडिलांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र त्यात समाविष्ट केले आहे. ते वाचताना त्या भाषेचा बाज आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. थोडासा मिश्किल, पण शिस्तप्रिय असणारा बाप मनाला मोहवून जातो. “तू तुझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होन्याचा प्रयत्न कर. माझं म्हनन एवढंच हाये का तू जे करशील तेच्यात टापला जायाला पायजे. तुला चोर व्हायाच? पण मग असा चोर व्हय, का दुनियाने सलाम केला पायजे.” असे सांगणारा बाप ‘सर्च फॉर एक्सलंस’ हेच तत्वज्ञान सांगतो असे जाधवांना वाटते.
जाधव कुटुंबात एकूण ही सहा भावंडे, आई- वडील व आज्जी अशी एकत्र राहिली. वडील बिपीटी मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यामुळे डॉ. जाधवांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले. अर्थातच तिथले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण उच्चभ्रू समाजापेक्षा वेगळे होते. पण जाधवांच्या बापाकडे असणाऱ्या डोळसपणामुळे ही भावंडे कायम वेगळ्या वाटेने गेली आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करून दाखवली.
हा सर्व विलक्षण प्रवास वाचण्यासारखाच आहे. ती एक कथा आहे एका कुटुंबाची ज्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत एक नवे क्षितीज गाठले आहे. हे एका सामान्य असणाऱ्या असामान्य माणसाने स्वतः च्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र आहे असेही म्हणता येईल. तर ही सर्वाना प्रेरणादायी ठरेल अशी सर्व भावांची यशोगाथा आहे जी त्यांनी आपल्याच शब्दात मांडली आहे.
पुस्तकाचा आकृतिबंध(form) हाही एक मराठी भाषेतील नवीन प्रयोग मानला जातो.
म्हणूनच सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्व पुस्तकांचा “ बाप”!
©️ डॉ. मेधा फणसळकर.
मो 9423019961.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈