सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “दि हिडन लाईफ ऑफ ट्रीज” – मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर – परिचयकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक: द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
(झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन)
मूळ लेखक: पीटर ओहृललेबेन
मराठी अनुवाद:गुरुदास नूलकर
प्रकाशन: मनोविकास प्रकाशन
पृष्ठ:२०८
मूल्य:३२०/
अतिशय लोकप्रिय ठरलेले पुस्तक:”द हिडन लाईफ ऑफ ट्रीज” मराठी अनुवाद ,पुन्हा उपलब्ध झाले आहे..कृपया आपल्या वृक्ष मित्रांना कळवावे!
सगळेच कसे अचंबित करणारे!
झाडं आपसात बोलतात, ते आपल्याकडील माहिती इतरांना पोहोचवतात!ते रडतात आणि आपल्या लेकरांची काळजी ही घेतात…जखमी झाडाची काळजी घेऊन त्याला दुरुस्त करतात….
अद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक “लाइफ ऑफ ट्रीज” या पुस्तकातून दाखवतात.
जंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात!
सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते…
तुम्हाला हे वाचताना खरचं वाटणार नाही….वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन!
झाडांच्या माहीत नसलेल्या या कथा अर्थात वैज्ञानिक माहिती आपल्याला आणि आपल्या पाल्यांना वाचताना नक्कीच विस्मय होईल आणि खूप महत्त्वाची माहिती वाचली याचा आनंदही!
हे पुस्तक वाचताना संत तुकाराम महाराज आणि डॉ जगदीशचंद्र बोस यांची नक्की आठवण होईल….कारण यांचा झाडांशी स्नेह होता.होय जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ही झाडांना बोलायचे….आपल्याला सर्वांना हे मान्य आहे की, झाडांना संवेदना असतात…पण प्रस्तुत पुस्तकात लेखकाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती वाचताना तो अद्भुत ग्रंथ निलावंती वाचतोय की काय असे वाटायला लागेल…सांगण्याचा हेतू हाच की वैज्ञानिक निरीक्षण करून लिहिलेल्या या गोष्टी वाचकाला विस्मयकारक वाटतात….
तुम्हाला एकटं राहायला नको वाटतं अगदी तसचं तुमच्या झाडांनाही!एकट्या झाडाचे आयुर्मान ही कमी असतं!होय झाडं ही सामाजिक जीवन जगतात.ते एकमेकांची काळजी घेतात..इतकेच नव्हे तर तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला इतर झाडं अन्न पुरवठा होईल यासाठी मदत करतात….एक दोन दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे…इतकंच नव्हे तर झाडे ही परस्परांना माहिती पुरवतात.त्यांचे विस्तीर्ण असे www सारखे जाळे असते.ज्यात अमर्याद अशी माहिती असते. त्यांचे ही एक www आहे…त्याला आपल्याला wood wide web म्हणावे लागेल इतकेच!
चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा चंदनाच्या शेतीत कडुलिंब का लावतात? तर तो हेच सांगेल की हे सहजीवन त्यांना मानवते.अर्थात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. मित्रांमध्ये ते खुश राहतात….
आपल्याला नवल वाटेल की झाडांनाही स्मरणशक्ती असते. त्यांना ऐकू येत आणि त्यांची एक भाषा ही असते. ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात,त्यांना रंग दिसतात…. तुम्ही म्हणाल बस झालं ना राव…निघतो आता.पण थांबा हे वाचून घ्या आधी…
एखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठी ही माहिती देतो. सगळी झाडं या मुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात.आवश्यक ते जैवरासायनिक बदल स्वतःमध्ये घडवून आणतात…
१९८० मध्ये डेहराडून जवळ चंद्रबनी मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमारत “साल” (समूहात वाढणारे झाडं)जंगलाला साफ करून उभी केली गेली. या संस्थेच्या आवारात एकटी राहिलेली “सालची” झाडं एक एक करून मरू लागली. आपल्या सजातीयांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांचा अंत झाला, पण हे त्यांना कसं कळलं? त्यांची संभाषण यंत्रणा कशी आहे ?
या पुस्तकाविषयी फार जास्त लिहिणं आवश्यक वाटत नाही….कारण याच्या प्रत्येक पानावर अतिशय अद्भुत अशी माहिती आहे. झाडांच्या नवलाईची दुनिया आपण आणि आपली मित्र नक्की वाचणार याची खात्री आहे.
पोस्ट आपल्या प्रत्येक वृक्षमित्राला पाठवू !
मूळ लेखक : पीटर ओहृललेबेन
मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर
परिचयकर्ता : अज्ञात
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 e-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈