सौ.अश्विनी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ – कवी : श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
पुस्तक– प्रेम रंगे ऋतुसंगे (काव्यसंग्रह)
कवी– श्री सुहास रघुनाथ पंडित, सांगली
प्रकाशक– अक्षरदीप प्रकाशन व वितरण, कोल्हापूर
मूल्य– 150/-
कवितासंग्रहावर परीक्षण लिहिण्याइतकी मी मोठी नाही, समीक्षक तर नाहीच… पण कवितेची अतीव आवड असणारी एक वाचक म्हणून मनापासूनअभिप्राय द्यावासा वाटला.
श्री सुहास रघुनाथ पंडित
जेष्ठ कवी सुहास पंडित यांच्या ‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या कविता संग्रहासाठी अभिप्राय !
‘प्रेम रंगे, ऋतुसंगे’ या काव्य संग्रहाच्या नावातूनच प्रेम आणि ऋतू म्हणजेच निसर्ग यांचं अद्वैत जाणवतं!
कवी सुहास पंडित यांनी म्हटले आहे की, कवींच्या कविता… भावनांचा कल्लोळ ‘निसर्गदत्त’ असतो. निसर्गाचे मानवाने केलेले रूप पाहता, निसर्गाशी साहित्यातून जवळीक साधण्यासाठीची त्यांची धडपड त्यांच्या मनोगतातून दिसली.
एकीकडे माणसामाणसातला स्वार्थ, मत्सर वाढत असताना… दुसरीकडे कवी सुहास पंडीत यांना वाटत की, जगणं समृद्ध होण्यासाठी माणसातील प्रेम, एकी, आपुलकी नात्यातील जपणूक आणि निसर्गाचा अखंड सहवास, त्याच संवर्धन याचा अतूट बंध निर्माण करणे खूप गरजेचे आहे.
जेष्ठ समीक्षक विष्णू वासमकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेतून साहित्य शास्त्रातील काव्याबद्दलचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यामुळे त्यांची ही नुसतीच प्रस्तावना वाटत नसून एक अभ्यास वाटला. प्राचीन काव्य आणि शास्त्रकारांची मते, त्याबाबतची माहिती अशा अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. काव्यशास्त्रीय विवेचन हे किती महत्वाचे आहे हे लक्षात आले. काव्य म्हणजे काय इथपासून ते काव्य कसे करावे, ते कसे असावे त्याची शास्त्रीय तथ्य हे सर्व अतिशय विस्ताराने उलगडुन सांगितले आहे.
काव्य संग्रहातील ‘भेट अचानक’ ही पहिली कविता वाचून, कवीने प्रेयसीच्या भेटीचा आठव शब्दातून शृंगारला आहे त्या प्रीतीचे, रोमांचक भेटीचे चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहिलं.
‘अपुरी आपुली भेट’ या कवितेत रोजची प्रेयसीची भेट अधुरी, अपुरी वाटते… तृप्ततेतून, अतृप्तता जाणवते. भेटीचे समाधान पण विरह जाणवणारी ही कविता…
*शब्दांचे पक्षी होतील, ते गाणी गात ते तू समजून घे* असे कवी प्रेयसीला म्हणत आहेत. एक अतीव आर्तता ह्या कवितेतून जाणवली. हे वेगळेपण खूप भावले.
“पुढती पुढती काटे पळता, मन वैर असे का धरते, मनी का भलते सलते येते?”
कवींच्या कवितेतील वरील ओळीत, प्रेयसीच्या वेळेत न येण्याने त्याची जी व्याकुळ अवस्था होत आहे ती सहज सुंदर शब्दात व्यक्त केली आहे. प्रत्येकाची अशी अवस्था कधीतरी होते, होत असते… तेव्हा कवींच्या ह्या ओळी नक्कीच आठवतील!
कधीही न पाहिलेले असे काल रात्री पाहिले, असे ‘ध्यास’ ह्या कवितेत कवी सांगतात… तेव्हा ती उत्सुकता वाढत जाते. ओसंडून वाहणारं यौवन…
‘संयमाला धार होती, तो रोख होता वेगळा’ ही ओळ बरेच काही सांगून जाते!
स्वप्न की सत्य, की भास हे न कळण्यासारखी अवस्था होती. एक अत्युच्य उत्कटता प्रवाहीत होणारी ही कविता कवीचं हृदय कुठे गुंतले आहे याचे दर्शन घडवते.
प्रीतीची रीत कशी सर्वानाच खुणावते तशी कवीलाही प्रेमाची अनामिक ओढ वाटू लागते. ह्या प्रीतीला शब्दबद्ध करून या कवितेसाठी ‘अमृतवेल’ हे शीर्षक दिले आहे. निसर्गाच अन प्रेमाच अद्वैत या शिर्षकातून उठून दिसते!
‘व्रत’ ही कविता खूप भावली, जगण्यातील उत्तर कवीने शोधले आहे.
हल्ली नात्यातील प्रेम संपत आले आहे, दुरावा निर्माण होत आहे त्यामुळे लोक म्हणतात कुणी कुणाच नसत. पण इथे कवीने हे म्हणणे खोडून काढत कुणी कुणाचं नसलं तरी मग आपण जगतो कुणासाठी? अस विचारलं आहे. नवीन नात्यासाठी, ते टिकण्यासाठी वागणं, बोलण कस असावं आणि तडजोड कशी करावी… हे तत्वज्ञान युक्त वर्णन अतिशय सुंदर केलं आहे! तुटत आलेली, लयास गेलेली नातीही कमलदलाप्रमाणे फुलतील अशी आशा कवी व्यक्त करतात.
मुलीच लग्न झालं! ती बाई अन आई ही झाली… तिला शहाणपण कस आलं! हे एक बाबा(कवी) ‘शहाणपण’ या कवितेतून हृदयस्पर्शी ओळीतून व्यक्त करतो!
‘सूर्यास्ताची वेळ असे’ ही कविता शब्दातीत वाटली! जीवन जगताना उतार वयात येणारी परिपक्वता ह्या ओळीतून जाणवते. शेवटी जीवनाच्या सूर्यास्ताच्या वेळेस, काय सोडून द्यावं आणि काय शिल्लक आहे ते मनात ठेवावं हे उलगडून सांगताना कवी म्हणतात,
हिरवेपण जे उरले आहे… तेच जपू या समयाला
सुर्यास्ताची वेळ असली तरी एक विलक्षण सकारात्मकता या कवितेतून जाणवली!
असतेस घरी तू जेव्हा
फिदा
खूप आवडल्या या कविता!
प्रत्येकाच्या घरी गुलमोहराचं झाड असत पण आपण कुठेतरी दूर शोधत असतो… हे खरं खुर सत्य कवींनी या कवितेत सांगितलं आहे. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील प्रसंग तुम्हा आम्हा सर्वानाच वाटलेल्या अन दाटलेल्या भावना, इथे कल्पनेपेक्षा सत्य जास्त असल्याचे जाणवले. ते आपल्या वेगळ्या शैलीतून कवितेतून कवी सुहास पंडित यांनी मांडले आहे.
एक वधुपिता स्वतःला समजवतोय… आणि अशा अनेक वधुपित्यानाही, आपल्या ‘वधूपित्यास’ या कवितेतून. हे हृदयस्पर्शी शब्द, अन समजवणीचे सूर… कंठ दाटून आला.
कवी सुहास पंडित यांच्या अनेक कवितांमधून त्यांचा शब्दसंग्रह अतिशय उच्च दर्जाचा असल्याचं जाणवलं. कवितेतील शब्दालंकाराने कवितेला वेगळीच खासियत निर्माण होते. फक्त शब्दच नव्हे तर आशय गर्भता, प्रेम -निसर्ग हे साम्य असले तरीही विषयांची विविधता आणि त्यातून त्यांना दिसणार, जाणवणार त्यांचं अद्वैत हे अनेक कवितेतून प्रकर्षाने दिसून आलं. कवी निसर्गाशी समरस झाल्यामुळे माणसातील प्रेमाचे त्याच्याशी अनेकानेक प्रकारे साधर्म्य, एकरूपता आहे असे त्यांना वाटते. इतकंच नाही तर एक वेगळाच असा उच्च कोटीचा उत्कट समागम आहे असे त्यांना वाटत असावे.
कवींच्या कविता वाचताना त्यांच्या शब्दांमधून स्पर्श, गंध, तालाने खऱ्या अर्थाने पंचेद्रिये जागृत होतात.
कवितांची सुरुवात, मध्य आणि त्याचा शेवट इतका निट्स वाटतो कारण ते सगळं सहज घडून आलेलं शब्दबद्ध केलं आहे. त्यांच्या कवितांना लय आहे, एक ठेका आहे… त्याप्रमाणे वाचत गेलं की ती अर्थ, आशय, विषय यांनी एकरूप झालेली कवीता एक त्रिवेणी संगम वाटते.
स्वप्नातले विश्व फुलवायचे
गृहप्रवेश
मैत्र
स्नेहबंध
प्रत्येक कविता आपल्या परीने वेगळी आहे. कोणतीही अढी न ठेवता..स्नेह ठेवण्याच्या ओळी कवी लिहितात… अस कवी म्हणतात तेव्हा त्यांचा स्वभाव एकमेकांना जोडण्याचा आहे असं जाणवतं, त्यांचे विचार आदर्श वाटतात…
कारण स्नेहबंध, नाती, मैत्री दुरावत असताना आभासी झालेले असताना… कवीला हे वाटण आणि त्यांची अक्षरे कवितेतून झळकण हे विशेष आहे.
त्यांच्या पावसाच्या कविता असोत, प्रेमाच्या असोत, नदीच्या, बळीराजाच्या शेताच्या, श्रावणाच्या असोत प्रत्येकातून चैतन्य फुलते!
कधी कोपणारा पाऊस, दुष्काळ, कृष्णामाईचा क्रोध, झाडांच्या कत्तलेचा जाब हे चित्र आपल्या कवितेतून श्री पंडित सर उभं करतात.
त्यांना जे हृदयातून वाटत तस ते लिहितात, उतरवतात… म्हणूनच ते लगेचच रसिकांच्या, वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं ! अस परोपरीने जाणवलं.
श्री. सुमेध कुलकर्णी यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ या कवीता संग्रहातील कवितांना अनुसरून चपखल वाटलं. ‘माणसाचं अन निसर्गाच प्रेम’ हृदयाच प्रतीक म्हणून मानवी हातानी आणि त्यांच्याच कवितेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या फांदीने केलेले बदामाचे चिन्ह आणि एकरूप झालेला निसर्ग हे बरच काही सांगून गेलं.
कविता संग्रहातील कविता अभ्यासण्यासारख्या आहेत. काही कवितांतून तत्वज्ञान मिळत, काही कविता नात्यांची गुंफण शिकवतात, काही कवीता दुष्काळात डोळे पाणावतात, तर काही कवीता निसर्गाचे व्यवस्थापन शिकवतात. काही कवीता समाजाच्या प्रश्नांनी डोळे उघडतात.
हा फक्त कवीता संग्रह नसून प्रेम आणि ऋतू यांना अग्रस्थान मानून, जाणवणारे सत्य, साध्या पण तितक्याच खऱ्या अर्थाने शब्दबद्ध केलेला सर्वांगीण समृद्धीसाठी तळमळ असणारा असा संग्रह आहे. अस मला वाटत. प्रत्येक वाचक- रसिकांनी यातील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. त्यांची कवीता… आपण अनुभवतोय ही जाणीव आल्याशिवाय राहवणार नाही!
© सौ अश्विनी कुलकर्णी
मानसतज्ञ, सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491 Email – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈