सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “अमृतघट” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक परिचय
पुस्तक : “अमृतघट” – काव्यसंग्रह
कवयित्री : अरुणा मुल्हेरकर
प्रकाशक : शॉपीजन
प्रकाशन :१६ मे २०२४
किंमत:®२९१/—
सुश्री अरूणा मुल्हेरकर
सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा नुकताच प्रकाशित झालेला अमृतघट हा काव्यसंग्रह हाती पडताच प्रथम दर्शनी मी दोन गोष्टींमुळे अत्यंत प्रभावित झाले. पहिले म्हणजे काव्यसंग्रहाचे शीर्षक. अमृतघट या शब्दातलं माधुर्य आणि शब्दात असलेला उपजतचा काव्यभाव, रसमयता आणि शुद्धता मनाला आकर्षित करून गेली. अमृतघट म्हणजे अमृताचा घट, अमृताचा कलश. अमृत म्हणजे संजीवन देणारं सत्त्व. तेव्हाच मनात आलं,” नक्की या काव्यसंग्रहातून मनाला संजीवन, चैतन्य, ऊर्जा लाभणार.” नावात काय असतं? असं म्हणतात पण माझ्या मते नावातही खूप काही असतं.
दुसरं म्हणजे या पुस्तकाचं अत्यंत आकर्षक असं मुखपृष्ठ जे सुप्रसिद्ध चित्रकार आणि ग्राफिक्सकार सौ. सोनाली सुहास जगताप यांनी केलेलं आहे. अतिशय मनोवेधक असं हे मुखपृष्ठ आहे. घटातून अमृतधारा ओसंडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बासरीच्या सुरात तल्लीन झालेल्या सावळ्या, मोरपीसधारी, घनश्यामाची भावपूर्ण मुद्रा! संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर हे मुखपृष्ठ किती योग्य,अर्थपूर्ण आणि चपखल आहे याचीच जाणीव होते.
अमृतघट उघडला आणि त्यातून बरसणाऱ्या अमृतधारांनी माझे मन अक्षरश: पावन झाले.
भक्तीरसमय ५८ भक्तीगीतांनी हा कलश भरलेला आहे. यात अभंग आहेत, ओव्या आहेत, आरत्या आहेत,अंगाई,लावणी, वृत्तबद्ध भक्तीरचनाही आहेत.
जसजशा तुम्ही या भक्तीरचना वाचत जाता तसतसा तुम्हाला तादात्मतेचा, एकरूपतेचा, अद्वैताचा अनुभव येतो. अवघा रंग एक होऊन जातो.
या संग्रहात गणेशाची आराधना आहे, विठ्ठल भक्तीचा आनंद आहे आणि कृष्ण भक्तीची तल्लीनता आहे. या साऱ्याच भक्तीरचना रूप रस गंध नादमय आहेत यात शंकाच नाही.
जगामध्ये असा कोणी नसेल ज्याच्या मनात परमेश्वराविषयी भाव नाही.” मी परवेश्वराला मानत नाही” असे म्हणणाऱ्या माणसाच्या मनातही कुठेतरी ईश्वरी शक्ती विषयीची, त्याच्या अस्तित्वाची मान्यता असतेच आणि त्या शक्तीशी शरण जाण्याची कधी ना कधी त्याच्यावरही वेळ येतेच तेव्हा तो हतबल जरूर होत असेल पण त्यावेळी तो फक्त शरणागत असतो. अरुणाताईंच्या या भक्तीरचना वाचताना वाचक खरोखरच शरणागत होऊन जातो.
तुज नमो या अभंगात त्या म्हणतात,
तूच एक आम्हा। दावी मार्ग काही। तुजविण नाही। जगी कोणी।।
तुजविण शंभो मज कोण तारी” हा करुणाष्टकातला बापुडा भाव याही शब्दांतून जाणवतो. कर्ताकरविता तूच आहे याची पुन्हा एकदा या शब्दांतून मात्रा मिळते.
सामान्य माणसाची भक्ती ही सगुण असते. त्याच्या श्रद्धास्थानाला एक काल्पनिक रूप असतं आणि ते मनातलं रूपदर्शन त्याला चैतन्य देत असतं.
सगुण भक्ती या काव्यरचनेत अरुणाताई किती सहजपणे म्हणतात,
लागलीसे आता। एक आस बाबा।
दावी तुझ्या रूपा ।जगन्नाथा।।
खरोखर भक्ताची व्याकुळता, आर्तता या संपूर्ण अभंगात दृश्यमान होते.
कृष्ण सखा, कान्हा, मुरलीधर, देवकीनंदन, गोवर्धनधारी अशी कितीतरी मधुर नावे प्राप्त झालेले भगवंताचे रूप आणि मानवी जीवन याचं अतूट नातं आहे. कान्हाच्या भक्तीतला जिव्हाळा ज्याने अनुभवला नाही असा जिवात्माच नसेल.
सावळा हरी या रचनेत अरुणाताई याच लडिवाळ भावनेने लिहितात,
नंदाचा तो नंदन
यशोदेचा कान्हा
करी नवनीताची चोरी
फुटतो गोमातेला पान्हा..
फुटतो गोमातेला पान्हा या तीन शब्दांनी अंगावरचा रोमरोम फुलतो.
ही रचना वाचताना वाचक गोकुळात जातो. कृष्णाच्या बालक्रीडेत सहजपणे रमून जातो.
धून मुरलीची ऐकूनी
अवघ्या गोपी मुग्ध झाल्या
देहभान त्या विसरून
सुरावटीवर डोलू लागल्या…
वाचकही अशाच मुग्धावस्थेत काही काळ राहतो.
माऊली, गुण गाईन आवडी, विठ्ठल विठ्ठल गजरी, वारी निघाली, या भक्तीरचना वाचताना आपण वारकरीच बनून जातो आणि टाळ,मृदुंगाच्या गजरात चाललेल्या वारीचा सहजपणे भाग बनून जातो.
रूप सावळे साजिरे।हरपले माझे मन।
डोळा भरुनिया।पाहू चित्ता वाटे। समाधान ।।
इतके भक्तीरसात आकंठ बुडालेले शब्द पंढरपुरी स्थित असलेल्या माऊलीच्या चरणांचे जणू दर्शन घडवितात.
जीव गुंतला, मृगजळ एक आशा,नावाडी,काय भरवसा उद्याचा,या रचना चिंतनात्मक आहेत. जगण्याविषयी सांगणाऱ्या आहेत. प्रपंचाच्या रगाड्यात रुतलेल्या सामान्य माणसाच्या मनस्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत.
लोभ मोह क्रोध मत्सर
षड्रिपू घेरती मला
ना सुटे माझेपण
*प्रपंची जीव गुंतला …*यामध्ये एक प्रांजळपणा जाणवतो. स्वतःच जगणं आणि अवतीभवती वावरणाऱ्या प्रियजनांचे अथवा इतरांच्या जीवनाचे निरीक्षण करताना जे जे टिपलं गेलं त्याची प्रतिबिंबं त्यांच्या या भक्तीरचनेत आढळतात आणि ते सारं वाचत असताना आपल्या जीवनाचे ही संदर्भ आपल्याला सापडतात. हे अगदी सहजपणे घडतं.
जरी या रचना अध्यात्मिक असल्या तरी त्यात अवघडपणा नाही. यात संत संतवाङमयाचा अभ्यास आणि आभास दोन्ही आहे आणि माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठी त्या जगण्यासाठी आधारही देतात आणि म्हणूनच त्या वाचनीय ठरतात.
या भक्तिरचना वाचताना श्रीरामाचे दर्शन होतं, बलशाली हनुमान दिसतो, दत्तगुरूंचे दर्शन होते, संत ज्ञानेश्वरांची महती कळते, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा ही दर्शन देतात, शेगावला घेऊन जातात. या भक्तीरचनांमध्ये जशा आरत्या आहेत, ओव्या आहेत, अभंग आहेत तशाच वृत्तबद्ध भक्तीरसात्मक कविताही आहेत. शोभाक्षरी नावाचा एक नवीन गोड काव्यप्रकार या संग्रहात वाचायला मिळतो.
भावसुमने ही रचना शोभाक्षरी आहे.
या रचनेत चरणाच्या प्रत्येक ओळीत नऊ अक्षरे आहेत.त्यामुळे या रचनेला एक सुरेख लय,गेयता प्राप्त होते.
वाहू तुळस विठोबाला
भजू भक्तीने ईश्वराला
नको मजला व्यवहार
एका विठ्ठला नमस्कार…
हे अनंता..हे भुजंगप्रयात वृत्तातले श्लोक अतिशय तात्विक आहेत.मनाला समजावत आधार देतात.
अनंता तुला रे किती मी स्मरावे
तुझे रूप चित्ती सदा साठवावे
दिवा स्वप्न हे पाहते मी मुकुंदा
पृथा स्वर्ग करण्यास तात्काळ यावे
शिवरायावर केलेली ही ओवी पहा…
खानापाशी सैन्य किती
मावळे घाबरले
गनिमी काव्याने त्याने
गडकिल्ले जिंकले …
काही पौराणिक विषयावरच्या ओव्याही यात वाचायला मिळतात.
आणखी एक.. ही लावणी पहा —कशी मजेदार आहे!
प्रतिष्ठापना राम मूर्तीची
डोळा भरूनशान पाहूया
राया चला अयोध्येला जाऊया…
ही आध्यात्मिक लावणी मनाला आनंद देणारी आणि प्रसन्न करणारी आहे.
यात भारतीय सण,रितीपरंपरांवर आधारितही काव्यरचना आहेत.गुरुवंदना आहे.अनमोल विचारधनाचा एक खजिनाच या अमृतघटात साठवलेला आहे
विविध प्रकारच्या तल्लीन करणाऱ्या, देहभान हरपवणाऱ्या, मुग्ध करणाऱ्या, मनावर मायेची पाखर घालणाऱ्या, दुःखावर फुंकर मारणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या दिशादर्शक, संदेशात्मक, तत्वचिंतनात्मक भक्तीरचनांनी भरलेला हा अमृतघट प्रत्येकानी देव्हार्यात जसे गंगाजल पात्र ठेवतो, तद्वतच संग्रहात ठेवावा इतका मौल्यवान आहे. यातलं सगळं लेखन संस्कारक्षम आहे.
कवयित्रीने मनोगतात म्हटल्याप्रमाणे वडिलांचा लेखन वारसा त्यांनी जपलेला आहे हे नक्कीच. या रचनांमध्ये संस्कार आहेत, शास्त्रशुद्ध काव्यनियमांचे पालन आहे मात्र हे लेखन स्वयंसिद्ध आहे. यात प्रभाव आहे पण अनुकरण नाही, यात अनुभव आहे पण वाङमय चौर्य नाही. हे स्वरचित आणि स्वतः केलेल्या चिंतनातून, मंथनातून, घुसळणीतून वर आलेलं नवनीत आहे.
या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या नाशिकस्थित सौ. सुमतीताई पवार यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
पुन्हा एकदा सांगते या भावभक्तीच्या अमृतघटातलं अमृत चाखूनच पहा….
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈