सुश्री अरूणा मुल्हेरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “निशाशृंगार” (कविता संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक – निशाशृंगार 

लेखिका – सौ.राधिका भांडारकर

कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री

प्रकाशक – शॉपीझेन प्रकाशन  

किंमत -₹१६५/-

निशाशृंगार या एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा परिचय वाचकांसमोर सादर करताना मला फार आनंद वाटत आहे. साहित्याचे विविध प्रकार आजपर्यंत वाचनात आले, परंतु एकाच पुस्तकात कविता आणि त्याचे रसग्रहण अशा स्वरूपाचे पुस्तक माझ्या वाचनात प्रथमच आले.  या पुस्तकात सिद्ध हस्त लेखिका सौ. राधिका भांडारकर यांनी डॉ. निशिकांत श्रोत्री या गुणवंत कवीच्या निशिगंध या काव्यसंग्रहातून १६ निवडक कविता घेऊन प्रत्येक कवितेवर अत्यंत समर्पक आणि बहारदार असे भाष्य केले आहे.  या सर्व सोळा कविता भावगीत या काव्य प्रकारात मोडणाऱ्या असल्यामुळे त्या गेय आहेत. त्यातील भाव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या गीतातील रसास्वाद राधिकाताईंच्या रसग्रहणामुळे अधिक गोडीने घेता येतो.

भावगीत म्हटले की पटकन मनात येणारा भाव प्रीतीचाच ! मग ते प्रेम पती-पत्नीचे असेल, प्रियकर प्रेयसीचे असेल किंवा निसर्गातील चराचर सृष्टीचे असेल. त्यात भेटीची आतुरता, मिलनातील तृप्तता, प्रतीक्षेत झरणारे डोळे, हृदयाची स्पंदने हे सर्व भाव येणारच. तसेच नवरसांचा राजा म्हणून ज्या शृंगार रसाचा गौरव करावा त्या रसाचा परिपोष करणारी ही सर्व भावगीते.

निशाशृंगार ही डॉक्टरांची रसग्रहणासाठी घेतलेली पहिलीच कविता. चंद्र आणि निशा, रजनी यांच्या प्रेमातील धुंदी दर्शविणारी ही भावकविता.

 रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

 धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा

या ओळी वाचून वाचकांच्याही प्रणय स्मृती जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत. त्या धुंद करणाऱ्या प्रणयाच्या गोड आठवणींनी मनावर हळुवार तरंग उठल्यासारखे वाटतात. राधिका ताईंनी या भावगीता विषयी, ” हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं.” असं जे लिहिलं आहे ते शंभर टक्के पटणारे आहे. राधिका ताई म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच कविता वाचताना खजुराहोची तरल प्रणय क्रीडेची शिल्प पाहत आहोत असा भास होतो.

थकलेली पहाट या दुसऱ्या कवितेत दोन प्रेमी जीवांचे  अत्युच्च, उत्कट मिलन नजरेसमोर आले. शृंगारात चिंब भिजलेली अशी ही कविता, परंतु कुठेही उत्तानता नाही. एका नैसर्गिक क्षणाचे हे नितळ असे चित्र आहे असे मला जाणवले. नुसती एकदा वाचून कविता वाचकाला किती समजू शकते हे नाही सांगता येणार,परंतु राधिका ताईंचे या कवितेचे रसग्रहण वाचले की एकेका शब्दातील भाव स्पष्ट उमगतात.  कवितेविषयीच्या प्रस्तावनेत त्या वाचकांना सांगतात, “मला या काव्यरचनेतून झिरपणारं काम- क्रीडेचं चित्र म्हणजे एक नैसर्गिक कलाच भासली. संपूर्ण कविता म्हणजे समागमाच्या वेळच्या भावभावनांचं,देहबोलीचं एक वास्तविक आणि उत्कृष्ट वर्णन आहे.  मानसिक आणि कायिक अशी एक स्थिती आहे.”

 ज्योत निमाली झुळूक विसावी श्वास होऊनी दरवळली

 आर्त व्हावया व्याकुळ होऊन भावनेतूनी विसावली

 पुरी रात्र जागली मात्र ही पहाट तरी का थकलेली

या ओळींचा अगदी स्पष्ट अर्थ राधिकाताईंच्या रसग्रहणामुळेच वाचकांना सहज लावता येतो.

छेड तू काढू नको- बाहेरगावी कामानिमित्त गेलेला पती बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहे,आणि या गीतातील नायिका कामातूर झालेली आहे.या क्षणी तिला तिच्या पती व्यतिरिक्त कोणाचेही अस्तित्व नको आहे,म्हणूनच खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला ती विनवते,

 *रजनी नाथा तू नभातून

 वाकुल्या दाऊ नको*

 *नाथ माझा साथ आहे

 छेड तू काढू नको.*

अतिशय सुरेख आणि तरल भावनाविष्कार दर्शविणारी ही कविता असे मी म्हणेन.या कवितेवरील रसग्रहणकार राधिका ताईंचे भाष्य अगदी वाचनीय आहे.

त्या लिहितात,” रसमयता हा उल्लेखनीय गुण या गीतात जाणवतो. ती आतुरता, उत्कटता, आर्तता, मोहरलेपण, भावविभोरता कवीच्या शब्दप्रवाहातून कशी वाहत असते आणि याचा जाणीवपूर्वक स्पर्श वाचकांच्याही संवेदना चाळ वतात”. अगदी खरे आहे. कवितेतील नायिकेच्या भावना, संवेदना या घडीभर स्वतःच्याच आहेत की काय असे वाटते.

तुमी व्हटाचं डाळिम कुस्करलं.  तरल भावगीतातून मधेच डोकावणारी ही शृंगारिक लावणी.

 लाख तुम्ही पुसा पर कसं मी सांगू

 ज्वानी माझी सांगा कशी मी दाबू

 ताब्यात न्हाई मन उडालं पाखरू

 लई ग्वाड तरी पन हुळहुळलं 

 तुमी व्हटाचं डाळिम कुस्करलं

मराठी रांगडी भाषा आणि त्यातून दिसणाऱ्या जवान स्त्रीचं हे ठसठशीत रूप लावणी वाचताना नजरेसमोर साक्षात उभे असल्याचा भास होतो. व्हटाचं डाळिम कुस्करलं या शब्दरचनेत तक्रारीचा सूर असला तरी अंतर्यामी ही क्रिया तिला हवीहवीशी वाटणारी आहे हे स्पष्ट दिसते. राधिकाताईंना ही घटना अतिप्रसंगाची नसून खट्याळ प्रेम भावनेची वाटते.कृष्णाने गोपींची वस्त्रे पळवली तोच भाव त्यांना या कवितेत जाणवतो असे त्या लिहितात.हे रसग्रहण वाचून लावणीची रंगत अधिक वाढते.

आसुसलेली- प्रणय भावनेने धुंद झालेल्या एका प्रेयसीची ही गझल आहे. पुरुषाच्या पुलकित करणाऱ्या स्पर्शासाठी ही गझल नायिका आसुसलेली आहे,प्रेमाची गुंगी तिला आलेली आहे.ती म्हणते,

धुंदीत राहण्याला वाऱ्यास बांधिले मी

गंधित जाहले परि ना मुग्ध राहिले मी

किती सुंदर ख्याल आहे हा.संपूर्ण गझलच वातावरणात एक प्रकारची धुंदी आणणारी आहे. या शेराच्या खयालतीविषयी राधिका ताईंनी सर्वसाधारण वाचकाला जाणवणाऱ्या अर्थाव्यतिरिक्त आणखी एका अभिप्रेत अर्थाची शक्यता निदर्शनास आणून दिली आहे. त्या लिहितात, ” माझ्या मनात उसळलेले प्रेमभाव वाऱ्यासवे पसरत जाऊ नयेत.   ते गुपित आहे आणि इतरांना कळू नये.  माझं गंधावलेपण,ही प्रेम धुंदी, माझं वयात येणं इतरांच्या नजरेत येऊ नये.

सर्वसाधारणपणे कविता वाचून त्यातील सहज दिसणारा अर्थ, एकूण शब्दांकन,कवितेतील लयबद्धता याकडे वाचकांचे लक्ष असते. प्रत्येकच वाचक कवीच्या मनातील अभिप्रेत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोच असे नाही.या रसग्रहणांमुळे वाचकांची दृष्टी रुंदावण्यासाठी नक्कीच मदत होते यात शंका नाही.निष्णात गायक श्रोत्यांपुढे एखादा राग सादर करत असताना त्यातील बंदिशीच्या एकेक जागा हेरून त्या रागाचे सौंदर्य जसे खुलवत असतो त्याप्रमाणेच डॉ.निशिकांत श्रोत्री यांच्या कवितांतील सौंदर्य स्थळे हेरून  राधिकाताईंनी या कविता खुलविल्या आहेत.प्रत्येकच कवितेचे रसग्रहण करताना त्यांनी कवितेच्या अंगोपांगांचा बारकाईने विचार केला आहे.कवितेत येणारा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, त्यातील त्या शब्दांचा चपखलपणा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून,योग्य ती उदाहरणे देऊन कविता कशी वाचावी, कवितेच्या गर्भात कसे शिरावे याचे उत्तम मार्गदर्शन वाचकांना केले आहे.

सौंदर्य आगळे ही डॉक्टर श्रोत्रींची अशीच एक शृंगारिक कविता! एका रूपवतीचे सौंदर्य पाहून कवितेतील नायक अगदी घायाळ झाला आहे. तो म्हणतो,” पाहुनी या सौंदर्य आगळे विद्ध जाहलो मनोमनी ” आणि या

विद्धावस्थेत तो त्या युवतीच्या रूपाचे वर्णन करतो, असे हे गीत. राधिकाताईंचे यावरील भाष्य वाचताना त्यांचा अभ्यास,वाचनाच्या कक्षा अमर्याद आहेत याचा साक्षात्कार होतो.त्या लिहितात, ” या ललनेचं सौंदर्य वर्णन वाचून मला कालिदासाच्या मेघदूत काव्याची आठवण झाली. प्रेयसी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गादरम्यान यक्ष त्या मेघाला वाटेत भेटणाऱ्या संभाव्य स्त्रियांच्या सौंदर्याविषयीचे वर्णन करतो, काहीसे त्याच प्रकारचे हेही सौंदर्य  आहे असे मला जाणवले.

अशा प्रकारची रसग्रहणे वाचून सामान्य वाचकांना वाचण्याची योग्य दिशा मिळते याची मला जाणीव झाली.

रसग्रहण हा भाषेच्या व्याकरणाचा एक भाग आहे.एखादे काव्य वाचले की त्याचा फक्त अर्थ जाणून घेणे म्हणजे रसग्रहण नव्हे.  त्या काव्यातून होणारी रसनिष्पत्ती, त्यातील अनुप्रास,यमके, रूपके, दृष्टांत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे शब्दालंकार व अर्थालंकार काव्यावर कसे चढविले आहेत,काव्यरूपी शारदेचे सौंदर्य  कसे खुलविले आहे या सर्वांचा सापेक्ष विचार म्हणजे रसग्रहण! या दृष्टीने राधिकाताईंची ही सर्व सोळा रसग्रहणे परिपूर्ण आहेत असे मी म्हणेन.

प्रेम आणि रजनी यांचा घनिष्ठ संबंध आहे.दिवसभर थकले भागलेले शरीर जेव्हा रात्री प्रियकर/ प्रेयसीच्या कुशीत विसावते तेव्हा श्रमपरिहार होऊन गात्रे पुन्हा प्रफुल्लीत होतात,टवटवीत होतात,  प्रीतीचा तो एक क्षण दिव्यानंद प्राप्त करून देतो या दृष्टीने निशाशृंगार हे पुस्तकाचे शीर्षक समर्पकच आहे.

मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांचे मन नक्कीच आकृष्ट होणार याची मला खात्री आहे.पुस्तकाच्या *निशाशृंगार*या शीर्षकाला साजेसे असेच मुखपृष्ठ शाॅपीझेनच्या चित्रकाराने तयार केले आहे.पौर्णिमेचा चंद्र आणि एका शिळेवर बसून बासरी वाजविणारा श्रीहरि,बासरीच्या सुरात तल्लीन झालेली राधा असे हे प्रेमाचे प्रतीकात्मक असणारे मुखपृष्ठ फारच लक्षवेधी आहे.चंद्राच्या अवती भवती दाटून आलेले ढग राधेच्या मनोवस्थेचे प्रतिनिधित्व करतात.

या पुस्तकाची प्रस्तावना दस्तूरखुद्द डाॅ.निशिकांत श्रोत्री यांनीच दिली आहे.ते प्रस्तावनेत म्हणतात,”शृंगारिक काव्याचे रसग्रहण करणे ही दुधारी शस्त्र हाताळण्याइतकी कठीण कला आहे,आणि या शृंगारिक कवितांची रसग्रहणे विलक्षण संयमाने आणि तरीही सखोलपणे करून तिने(राधिका)माझ्या कवितांना पुरेपूर न्याय दिला आहे.”कवितेतील आशयावर जराही अन्याय न होऊ देता,अश्लीलतेचा मागमूसही दिसू द्यायचा नाही,म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड आहे,परंतु राधिकाताईंनी लीलया ते पेलले आहे याला डाॅ.श्रोत्रींनी मान्यता दिली आहे.

शाॅपीझेन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशन करून चोखंदळ वाचकांसमोर हा अमोलिक नजराणाच ठेवला आहे असे मी म्हणेन. त्यासाठी शाॅपीझेनचे आभार.

त्याचप्रमाणे डाॅक्टर, अशीच छान छान भावगीते लिहीत रहा आणि राधिकाताई, आपण रसग्रहणे करून

त्याचा रसास्वाद आम्हा वाचकांना देत रहा ही विनंती.

आपल्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !

परिचय : अरुणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments