सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “द पॉवर ऑफ यूअर सबकॉन्शस माईंड” – लेखक : डॉ. जोसेफ मर्फी – अनुवाद :  सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆ 

पुस्तक : द पॉवर ऑफ यूअर सबकॉन्शस माईंड.

लेखक :  डॉ. जोसेफ मर्फी 

अनुवाद : सौ. मंजुषा मुळे 

प्रकाशक :  रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर. 

पृष्ठे : २८८

मूल्य : रु.३५०/_

मला या विषयाची आवड आहे हे माझ्या बोलण्यातून लक्षात आल्यावर मला मंजुषाताईंनी अतिशय आपुलकीने व जिव्हाळ्याने हे पुस्तक पाठवले. हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडले तेव्हा मला 2 ताप होता. व माझा ताप हटत नव्हता. माझी कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आली. मी एकटीच रूममधे. अशक्तपणामुळे झोपून होते. त्या एकांतात हे पुस्तक माझे सोबती होते. मी भराभर पानामागून पाने वाचत सुटले. रात्री झोपताना मनाला बजावले, मी बरी होणार. माझा ताप उतरणार. मी डोलो 650 सुद्धा घेतली नाही… 

सकाळी ताप पूर्ण उतरला होता. आणि मी उठून उभी राहिले. या पुस्तकाने मला इतकी शक्ती दिली.

हे पुस्तक सर्वांनी वाचलेच पाहिजे.

हे पुस्तक प्रत्येक घरात असायलाच हवे.

.. .. कारण या पुस्तकात आपल्या सुप्त मनाच्या अगाध, अगम्य शक्तीचा वापर कसा करायचा 

व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य कशा करायच्या याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलेले आहे.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डाॅ.जोसेफ मर्फी यांच्या अभ्यासाचे व संशोधनाचे सार या पुस्तकात आहे. मूळ इंग्रजीत लिहीलेले हे पुस्तक वाचावयास क्लिष्ट वाटेल. परंतु मंजुषाताईंनी केलेला अनुवाद मात्र पटकन ध्यानात येतो. त्यांची साधी सरळ ओघवती भाषा मनाची पकड घेते.व पुस्तक हातातून सोडावेसे वाटत नाही.

इतका गहन व कठीण विषय असून सुद्धा मंजुषाताईंनी तो अगदी सोप्या भाषेत समजावला आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने प्रश्न विचारला आहे.

एक मनुष्य दुःखी तर दुसरा आनंदी असे का?

एक मनुष्य  गरीब तर दुसरा संपन्न  असे का?

एक जण घाबरट तर दुसरा धाडसी असे का?

या पुस्तकात या प्रश्नांची उत्तरे सापडतील.

आपल्या सुप्त मनाचे सर्जनशील सामर्थ्य कसे वापरायचे, आपल्या हृदयस्थ प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद कसा मिळवायचा याचे उदाहरणासकट विवरण या पुस्तकात केले आहे.

या पुस्तकात २० प्रकरणे आहेत. यातील प्रत्येक प्रकरण हे एकमेकांशी जोडलेले आहे.आणि तरीही प्रत्येक प्रकरण हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.आपण कुठलेही प्रकरण वाचायला सुरुवात करू शकतो.

सुप्त मनाला आदेश देऊन मानसिक आरोग्य कसे राखायचे, शरीराचे रोग कसे बरे करायचे, वैवाहिक समस्या कशा सोडवायच्या, भीती कशी दूर करायची, श्रीमंत कसे व्हायचे, तरुण कसे रहायचे,सुखी कसे व्हायचे, … इत्यादी अनेक गोष्टींची उकल यात केलेली आहे.

आपले सुप्त  मन कसे काम करते?

मन सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार दोन्ही ग्रहण करते.

चांगला विचार केला तर चांगले घडते… वाईट विचार केला तर वाईट घडते.

सुप्त मन ही आयुष्याची नोंदवही आहे. आयुष्यातील प्रत्येक घटनेचे ठसे मनावर उमटतात.

सुप्त मन शरीरात चालणाऱ्या सर्व कामांचे नियंत्रण करते.

सुप्त मन शरीराची अवस्था ठरवते. शरीर निरोगी ठेवू शकते. शरीराला आजारातून बाहेरही काढू शकते.

या सुप्त मनाच्या शक्तीने कॅन्सरसारखा रोगही बरा होऊ शकतो.

सुप्त मनाकडून मार्गदर्शन हे नेहमी भावनेच्या स्वरूपात, अंतर्गत जाणिवेच्या स्वरुपात, प्रभावी अंतःप्रेरणेच्या स्वरुपात मिळते.

उपनिषदात सुद्धा म्हटले आहे ….. 

मनोजातं जगत् सर्वं मन एव जगत्पतीः 

मन एव परब्रह्म  मन एव रमापतीः l

……. मन हे परब्रह्म आहे ,मन हे ईश्वर आहे ,मग या मनाची शक्ती किती अफाट असणार !

डाॅ. जोसेफ मर्फी म्हणतात, 

The reason there is so much chaos and misery is because people do not understand the interaction of conscious mind and Subconscious mind.

म्हणून या मनाला कसे चालवायचे, याचे तंत्र जर आपल्याला समजले तर आपल्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण करता येईल.

या पुस्तकात सुप्त मनाला आदेश देऊन त्याच्याकडून आपल्याला जे हवे ते साध्य करून कसे घ्यायचे याची सोपी तत्वे आणि पद्धती वर्णन केल्या आहेत .त्यामुळे आपले आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक दर्जेदार, समृद्ध व उदात्त  बनू शकेल.

लेखक म्हणतात … हे सुप्त मन पॅराशूट सारखे असते. ते उघडल्याशिवाय त्याचा काही उपयोग नसतो.

मनाला उघडून त्याला कार्यरत करण्याच्या सोप्या पद्धती पाहूया…. 

… आपल्याला जे व्हावे असे वाटते, ते झाले आहे असे समजून त्याचे मनात चलत् चित्र उभे करणे.

मनाची कल्पनाशक्ती ही सामर्थ्यवान निसर्गदत्त शक्ती आहे. निकोला टेस्ला हे बुद्धिमान विद्युतशास्त्रज्ञ होते. ते नवीन संशोधन करताना कल्पनेत त्या गोष्टींची बांधणी करत. त्या गोष्टीला लागणारे सुटे पार्ट सुद्धा त्यांच्या सुप्त मनामधे प्रकट होत.

… झोपण्यापूर्वी सुप्त मनाला विनंती करणे.

एका तरुणाने झोपताना मनाशी बोलून त्याच्यावर काम सोपवले आणि त्याला वडीलांचे मृत्युपत्र कुठे ठेवले आहे ते सापडले. डाॅ ऱ्हाईन यांनी असे बरेच पुरावे गोळा केलेत की जगभरातील अनेक लोकांना स्वप्नात प्रत्यक्ष प्रसंग घडण्याआधीच ते दिसतात व इशारा देतात.

प्रसिद्ध लेखक राॅबर्ट स्टीवन्सन यांनी सुप्तावस्थेत तुकड्या तुकड्यांनी कथा रचल्या. हे कार्य त्यांच्या सुप्त मनानेच केले.

विश्वासाच्या पाठबळाने मनात रंगवलेले चित्र प्रत्यक्ष अनुभवात आणण्याचे कार्य आपले सुप्त मन करते.

प्रार्थना करताना मनात ठाम विश्वास असेल तर चमत्कार नक्की घडतात. शांती,समाधान, सुसंवाद,उत्तम आरोग्य, आनंद यासाठी आपण प्रार्थना करतो. ते विचार सुप्त मनात शिरतात व मन कार्य करते.

अब्सेंट ट्रीटमेंटमधे रुग्ण सानिध्यात नसताना त्याच्यासाठी दुरून प्रार्थना करू शकतो.

प्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेला ईश्वर हे काम करतो.

परंतु मत्सर,भीती, चिंता, अस्वस्थता यांनी भरलेले विचार शरीरातील मज्जातंतू व ग्रंथींना इजा पोहचवतात व

शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण देतात. म्हणून नेहमी चांगले,सकारात्मक व निर्धारपूर्वक बोलावे.

कृतज्ञता मनात सतत बाळगावी. कृतज्ञ मन हे नेहमी संपूर्ण विश्वाच्या संपत्तीच्या,सृष्टीच्या जवळचे असते. देवाचे प्रेम व त्याचे आपल्यावरील उपकार याचे स्मरण ठेवल्यास आरोग्य व शांती यांच्या विद्युतलहरी मनात निर्माण होतात.

थोर मानसशास्त्रज्ञ डाॅ.जोसेफ मर्फी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनातून व अनुभवातून लिहीलेले हे पुस्तक आहे. आणि मंजुषाताई मुळे यांनी हे विचार आपल्यापर्यंत पोहचावेत या हेतूने फार सुंदर अनुवाद केला आहे. हे पुस्तक वाचून अनुभवायचे व आपले जीवन उदात्त बनवायचे.

परीक्षण  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments