सौ. स्वाती सनतकुमार पाटील

अल्प परिचय 

शिक्षण- एम.ए. बीएड सेट, (पीएचडी सुरू आहे)

विषय- इंग्रजी

छंद – शिकवणे, युट्युब वर व्हिडिओ निर्मिती, इंग्रजी व मराठी पुस्तकांचे वाचन, लिखाण (चारोळ्या, कविता, पुस्तक परीक्षण), साहित्यिकांना भेटणे व ऐकणे सूत्रसंचालन, व्याख्यान देणे इ.

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “आपले ‘से ‘” – लेखक : डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

लेखक – डॉक्टर अनिल अवचट. 

प्रकाशन वर्ष -२०१७.          

पृष्ठ संख्या-१६८

मूल्य-२००

बहुआयामी व्यक्तिमत्व( डॉक्टर, लेखक ,संपादक ,काष्ठशिल्पकार, चित्रकार, बासरी वादक, गायक, ओरिगामी चे प्रणेते व समाजसेवक) डॉक्टर अनिल अवचट यांना त्यांच्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटल्या म्हणून त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. गुणदोषांनी युक्त या सर्व व्यक्तींमधील चांगुलपणाचा मध त्यांनी टिपला व त्यांना ‘आपले’से’ केले, त्या अनुभवांचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे.  या अर्थाने त्याचे शीर्षक व मुखपृष्ठ साजेशे व समर्पक आहे. या पुस्तकात विविध क्षेत्रातील 23 व्यक्तींना लेखकाने आपलेसे करून शब्दबद्ध केले आहे.

या पुस्तकात सुनीताबाई देशपांडेंचा तडफदार स्वभावाच्या असल्या तरी मुक्तांगण साठी बेभानपणे कार्य करताना दिसतात,गौरी देशपांडे या तर महर्षी कर्वे यांची नात -इरावती कर्वे यांची कन्या जिच्या बदल ते लिहितात-” समरस होऊन जीवन जगणारी एकटेपणाने शुष्क झाली .” सरोजिनी वैद्यांच्या पी.एच.डी. साठी ‘नाट्यछटाकार दिवाकर’ हा विषय अभ्यासताना स्कूटर वरून केलेली वणवण व लेखकाने हमालावर लेख लिहिला त्यावेळी “कादंबरीचा विषय फुकट घालवलास” असे हक्काने सांगणाऱ्या सरोजिनी वैद्य भेटतात. पुढे “बुडणारया बोटीत कशाला चढता राव” असे सांगणारे अनेक जण होते पण “पुढच्या लेखाचा ऍडव्हान्स समजा, हे पैसे घ्या. गो अहेड” असे म्हणणारे दत्ताराव भेटतात. तर वंचितांसाठी “पोट दुखतंय तोच ओवा मागतो” असे म्हणणारे यशवंतराव भेटतात.  पुस्तकात कुठेतरी रद्दी वाले दामले थेट केशवसुतांचा वारसा सांगताना दिसतात. फिनिक्स चे ग्रंथपाल पोंडा तर तीन पिढ्यांना पुस्तक पुरवताना दिसतात. “सारे मुकाट्याने सहन करते म्हणून घराला घरपण येते “म्हणत लिव्हरची सुगरणीशी तुलना करणारी डॉक्टर मंजिरी भेटते तर कुठे केंद्र सरकारच्या खात्याचा प्रमुख असलेल्या अधिकाऱ्याच्या पोटी जन्मलेले नायर व्यसनी, गुन्हेगार, अज्ञात होऊन लेखकाच्या आयुष्यात येतो, लेखक त्याच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसतात व ते अजूनही आशावादी आहेत .पीक पॉकेटिंग करणारा व स्वतःला आर्टिस्ट म्हणून घेणारा गौतम तर त्याच्या सर्व कला मोकळेपणाने सांगतो. अशा लेखकाच्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या थरातील या सर्व लोकांच्यातील चांगुलपणाचा मध लेखकाने टिपला आणि स्वतःचं आयुष्य मधापरी गोड बनवले.

प्रकाशनावेळेच्या मुलाखतीत सर स्पष्टपणे सांगतात की या सर्व लोकांत त्यांना आपलेपण जाणवले. काहीतरी विशेष दिसले. म्हणून  त्यांनी ते संकलित केले. या पुस्तकाचे  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील बहुसंख्य व्यक्ती या गेल्यानंतरच लेखकाने लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे .त्याबद्दलही ते स्वतःच्या मनास प्रश्न विचारताना दिसतात. आता मोकळेपणाने ते आपल्या भावना मांडू शकतात असे त्यांना वाटते.

स्वतः लेखकाचा विचार केला तर राहीबाईच्या भावंडांचा खर्च करणारे, ओरिगामी शिकवणारे, घर बांधून देणारे ,व्यसनमुक्तीसाठी धडपडणारे, सर्वांना मदत करणारे लेखक एक ‘माणूस’ म्हणून मोठे वाटतात .आणि आपल्या आयुष्यातही त्यांना ‘आपले’से’ करावेसे वाटते. असे हे पुस्तक वाचायलाच हवे…..

परिचय : सौ.स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments