सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “पिंगळावेळ” – लेखक : जी. ए. कुलकर्णी ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

 पुस्तक – पिंगळावेळ

 लेखक – जी. ए. कुलकर्णी

 प्रकाशन वर्ष – 1977

 मूल्य -20/( जुनी आवृत्ती) 225/

 पृष्ठ संख्या-  257

मराठी कथा लेखनाचे दालन समृद्ध करणारे ज्येष्ठ लेखक श्री जी. ए. कुलकर्णी यांचा ” पिंगळावेळ” हा गाजलेला कथासंग्रह. सदर पुस्तकाचे शीर्षक “पिंगळावेळ” हे खुप अर्थपूर्ण आहे. यामध्ये ‘पिंगळा’ व ‘वेळ’ असे दोन शब्द एकत्रित आले आहेत. पिंगळा याचा अर्थ घुबड असा होतो. भारतीय संस्कृतीत लक्ष्मीचे वाहन घुबड हे शुभकारक मानले असले तरी, दैनंदिन व्यवहारात ते अशुभ मानले जाते. आणि अशी.. अशुभ वेळ म्हणजे पिंगळावेळ. मुखपृष्ठावरील घुबडाचे रंगीत तोंड त्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. या चित्रांमध्ये जरी विविध रंगछटा वापरल्या असल्या तरी त्याखालील काळी चौकट ही मृत्यूची किंवा त्यासम आयुष्यातील भीषणता सांगणारी आहे. या विविध रंगछटेमध्ये, गडद हिरवा रंग हे माणसाच्या आयुष्यातील जबरदस्तीने आलेला एकांतवास, निळा रंग आसमंत, निसर्गातील खुलेपणा सांगतो. लाल -पिवळा रंग आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, तर काळा रंग हा वेदना, भीषणता दाखवते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्राचीन मंदिरावरील शिलालेखाचे शब्दांकन केले आहे की जे आयुष्यातील कटू वास्तव शब्दबद्ध करते.

प्रस्तुत कादंबरीत एकूण अकरा ग्रामीण कथा दिल्या आहेत. यातील पहिली “ऑफिसर्स” ही आहे. तंतुवाद्य वाजवताना संपूर्ण निसर्ग सजीव, चैतन्यपूर्ण करणारा ऑफिसर्स मृत झालेली प्रेयसी युरिडीसीच्या शोधात सर्व संकटे पार करीत देवापर्यंत पोहोचतो पण तिला परत घेऊन येताना आयुष्यातील प्रकाशाची व अंधाराची अर्थात जीवन व मृत्यू या दोन बाजूंची वास्तविकता प्रकट होते व शेवटी देव मान्य करतात की आयुष्यात मृत्यू ने आलेला एकटेपणा हा स्वीकारून आयुष्याची किंमत करता आली पाहिजे व भरभरून जगता आले पाहिजे. ” स्वामी” कथेतील महंत अनोळख्या व्यक्तीस स्वामी बनवून समाधी मरण घेण्यास भाग पाडणाऱ्या तपोवनभूमीत फसवून नेतो. त्या दगडी शिळा, हाडाचे सांगाडे, सरपट जाता येईल अशी गुफा, त्या फटीतून उगवणारा कारंजाचा वेल, अफूची गोळी खाऊन त्याने स्वीकारलेला मृत्यू व त्यावेळी गायलेले गाणे, ” तू असाच वर जा” हे दांभिकता चे प्रतीक आहे. “कैरी” या कथेत अडाणी तानीमावशी बहिणीच्या मृत्यूनंतर, पतीचा विरोध स्वीकारून, तिच्या पोराला शिकायला घेऊन येते व मास्तरांनी त्याला “भिकार्डे” म्हटल्यावर, शिवलीलामृताचा अध्याय म्हणून दाखवते. “मी काय शेनामातीची, पांडवपंचमीची गवळण न्हाय. ” असे ठणकावून सांगणारी तानीमावशी शेवटी विषाची पुडी खाऊन आत्महत्या करते. आणि लेखकाच्या मीठ तिखटाच्या कैरया खायचे राहून जाते. यातील “कैरी” हे अपुऱ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. “वीज”या कथेत, रद्दीची प्रत्येक ओळ वाचणारा, बळवंत मास्तर ला एका सर्कसवाली च्या सोनेरी केसाची भुरळ  पडते व एक दिवस विमानाची गोष्ट सांगताना, फांदीवर चढून तीच दोरी स्वतः भोवती गुंडाळून तो आत्महत्या करतो. यामध्ये विजे सारखे स्वप्नामागे धावून, आयुष्य जाळून घेणाऱ्या लोकांच्या जीवनाचे वास्तव उघडे पडते. “तळपट” या कथेत, सिदधनहळ्ळी तील ग्रामीण जीवन, तिथल्या प्रथा परंपरा, ( कडकलक्ष्मी, नागपंचमीला नाग दाखवून पूजा करणारे व त्यावर उदरनिर्वाह करणारे) कळतात. उपाशीपोटी भूक भागत नाही म्हणून शेवटी दानय्या सर्पदंशाने आपल्या वंशाची तळपट करून घेतो अर्थात वंशाचा नाश करून घेतो. “मुक्ती” या कथेत, उजव्या हाताचा अंगठा देणारा तो, घेणारे व रक्तपितीचा शाप देणारे आचार्य, बैरागी, अंध तरुणी इ. ऐतिहासिक पात्रांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या जल स्पर्शाने  डोळस होणार होती पण त्यासाठी लागणारा त्याचा उजवा अंगठा च नसतो. असे नियतीने ठरवून ठेवलेल्या आणि मुक्तीसाठी जगणार्या त्या जीवांना कधीच मुक्ती मिळणार नसते. उर्वरित कथांमध्ये देखील दारिद्र्यामध्ये कुटुंबासाठी धडपडणारी लक्ष्मी, यमनीचे मढे पाडणारा संगा इ. पात्रे  दिलेल्या क्षमतेनिशी नियतीला टक्कर देताना दिसतात. पण नियती जिंकते.

एकंदरीत, लेखकाच्या भाषाशैली बद्दल बोलताना स्पष्ट दिसून येते की त्यांच्यावर कर्नाटक व महाराष्ट्रातील संस्कृतीचा पगडा खोल आहे. पौराणिक उल्लेखा बरोबरच ग्रामीण प्रांतातील शब्द यात आहेत. यामध्ये दानय्या, सिदधनहळ्ळी, हुच्च म्हातारी असे शब्द आढळतात. यातील पात्रे विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. पण त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत नसल्याने शेवटी स्वतःचे अस्तित्वच नव्हे तर वंशावळ (तळपट) संपवताना दिसतात. त्यांच्या पुढील संघर्ष हा भावनिक, सामाजिक, पारंपारिक, धार्मिक असा आहे. या  कथांमध्ये प्रकाशाचे गीत गाणारी पात्रे आहेत पण त्यांना शेवटी अंधार सहन होत नाही व ते मृत्यू स्वीकारतात. लेखकाने त्यांना नियतीच्या हातातील बाहुले झालेले दाखविले आहे व त्यांच्या आयुष्यातील निर्णयाच्या क्षणी अशुभ वेळांमुळे ते शरणागती पत्करताना दिसतात.

(ऑफिसरला जसे तंतुवाद्य वाजवण्याचे वरदान आहे तसे) लेखकाला शब्दांचे वरदान आहे. त्यांच्या अचूक भाषाशैलीमुळे डोळ्यांसमोर हुबेहूब दृश्य जिवंत होते. घरबसल्या सृष्टी दर्शन घडते. लेखकाने खूप बारकावे टिपलेले आहेत. अगदी फुटलेल्या टाचातील वाळूचे कण काढणारी तानी मावशी सुद्धा नजरेतून सुटत नाही. कथा वेगवेगळ्या असल्याने कोणतीही आधी आपण सुरू करू शकतो. या कथा मोठ्या असल्या तरी, एकदा त्या प्रवाहात पडलो की भावनिक तल्लीनता साधते आणि लेखक आपल्याला इप्सितापर्यंत घेऊन जातो. लेखकाच्या पोतडीतून अनेक नवीन शब्द आले आहेत. उदाहरणार्थ, झपाटसंगत, जाळानं जीभ दाखवली, आयुष्याची निरी सुटली, बिनआतड्याचे ऊण, भुरका रेडा निर्लज्ज साठी निलाजरा, वंशाचा नाश करणारा तळपट, फुका म्हणजे झटका फांदीला पान न उरणे, जाते उपाशी असणे, वादाच्या प्रसंगात घातलेल्या शिव्या इत्यादी. गावरान भाषेत बोलणारी जरी ही  सामान्य पात्रे असली तरी, तत्त्वज्ञान सांगतात, ” उत्कट आशेला क्षितिज नसते, एकाच वस्तूकडे ध्यान देणारा डोळस असून आंधळा असतो, जिवंत माणसाचा आनंद ओल्या पावलांनी येतो नी भिजल्या डोळ्यांनी संपतो, सुख म्हणजे अटळ तडजोड असते. “असे अनेक, जीवनाला समरूप तत्त्वज्ञान वाचायला मिळते. या कथांतून लेखक जीवन- मृत्यू यांचा संघर्ष, सूर्यप्रकाशाचे -अंधाराशी नाते आशावादी- निराशावादी दृष्टिकोन इत्यादी समांतर सांगताना दिसतात. पण शेवटी नकारात्मकता ठळक होते. लेखकाचा जन्म एकसंबा मधील असल्याने मराठी व कन्नड भाषेच्या प्रांतातील लोकांना त्यांनी जवळून अभ्यासले आहे. सर्व कथा अंगावर शहारे आणतात, विचार सुन्न करतात व काही अंशी त्यांनी स्वीकारलेल्या मृत्यूचे समर्थन करतात. अशा या कथा वाचताना, नवीन वातावरणात नवीन व्यक्तीं भेटतात, वर्तमानाचा विसर पडतो, मात्र त्यांचा मृत्यू वाया जात नाही. आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करतात. व आपल्याला जीवनाची खरी किंमत कळते; असा हा कथासंग्रह नक्की वाचायला हवा !  

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments