सौ. स्वाती सनतकुमार पाटील
पुस्तकांवर बोलू काही
☆ “स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)” – कवयित्री- सुश्री आसावरी काकडे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆
पुस्तक – स्त्री असण्याचा अर्थ (काव्यसंग्रह)
कवयित्री- आसावरी काकडे
प्रकाशनवर्ष – 2006
पृष्ठ संख्या -87
मूल्य -100/
मराठी व हिंदीत कथा, कविता, ललितलेख, पुस्तक परीक्षणे लिहिणाऱ्या सिद्धहस्त अनुवादिका, तत्त्वचिंतक, भाष्यकार, लेखिका कवयित्री आसावरी काकडे यांचा मोठा लेखनप्रपंच आहे. त्यामधील “स्त्री असण्याचा अर्थ ” हा एक छोटा काव्यसंग्रह.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रस्थापित चौकट मोडून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या (स्त्रीसदृश्य) प्रतिकृतींचे पेंटिंग दिले आहे. त्या पुसट असंख्य रेखांमध्ये साध्यासुध्या जगणाऱ्या असंख्य स्त्रिया घडल्या आहेत. मलपृष्ठावर “स्त्री असणं म्हणजे” ही कविता दिली आहे. शीर्षक “स्त्री असण्याचा अर्थ” त्यातून उलगडून दाखवला आहे.
त्या लिहितात,
“स्त्रीचा देह असणं म्हणजे स्त्री असणं नाही.
स्त्री असणं म्हणजे
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा,
टिकून राहणं तुफानी वादळातही,
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश- रेखांश
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं.. सहवेदना.. प्रेम.. तितीक्षा. “
या प्रस्तुत काव्यसंग्रहात 21 कविता आहेत. सुरुवातीला “देता यावी प्रतिष्ठा” या कवितेत त्या उद्देश बोलून दाखवतात. स्त्रीचे दुःख वर्णन करताना त्या लिहितात,
” दुःखावर दुःख, दुःखापुढे दुःख,
दुःखापाठी दुःख, चमकते. “
तिच्या या दुःखास ” भूकंप, महापूर, दुष्काळ, ढगफुटी, उल्कापात, दंगली, उन्हाळे पावसाळे, वादळ वारे इत्यादी उपमा दिल्या आहेत.
सर्वात श्रेष्ठ नाते- आईचे वर्णन करताना, सर्व काही सोसून ती आपले अस्तित्व वटवृक्षासारखे ठेवते हे सांगताना त्या लिहितात,
” वरचा विस्तार सांभाळण्यासाठी,
मूळ घट्ट रोवून धरलीस,
जीवाच्या आकांताने. ”
शिकलेल्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,
” तरी अजूनही आई प्रश्न विचारला की मोडतात घर,
ज्यांना आवरत नाही आतला आवेग, त्यांना पडावं लागतं घराबाहेर,
त्यांची घरं मोडतात
आणि त्यासाठी
जबाबदार धरलं जातं त्यांनाच”.
या काव्यसंग्रहात अशा अनेक स्त्रिया भेटतात. स्वतःच्या स्वप्नांना बंदिस्त करून सर्वमान्य सुखाची कवाडे त्या उघडतात हे सांगताना त्या लिहितात,
” दर श्रावण मासात पूजेला एक व्रत जुन्या स्वप्नांच्या वरती रचायची एक वीट”.
एका क्षणी तिला पडलेली भूल नी त्यातून जन्मास आलेले मुल या वास्तवाचा स्वीकार करून जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,
” दिस उगवला नवा, स्वप्न नव्हते शेजारी,
डोळे उघडले तेव्हा, पिस गळालेली सारी”.
नवऱ्याच्या अवगुणांमुळे त्याला सोडून स्वतःच्या मुलासहित संसार थाटणारी आणि मुलांमध्ये पुन्हा नवऱ्याचेच आलेले अवगुण सहन करणार्या स्त्रीची घुसमट सांगताना त्या लिहितात,
” आकांताने सारे करतीच आहे,
टक्क जागी आहे, आत आत”.
परिस्थितीशी झगडणाऱ्या स्त्रीचे वर्णन करताना त्या लिहितात,
“बुडत्याचा पाय खोलातच जाई
कुठे काठ नाही आधाराला “.
स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या स्त्रियांसाठी त्या लिहितात,
“कर्तव्याचे माप पुरे भरलेले,
बाकी उरलेले तिचे तिला”.
प्रेमात फसवणूक झालेली, माहेर तुटलेली स्त्री जिद्दीने ठामपणे उभी राहते. व तिच्याकडे पुन्हा सारी नाती नव्याने परत येतात हे सांगताना त्या लिहितात
” सोसण्याचे झाले लकाकते सुख वळाले विन्मुख, जुने दुःख. “
लहान भावंडासाठी आई बनून जिने स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही ती मुले मोठी होऊन गेल्यानंतर तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी दोन मुलांच्या बाबांशी संसार थाटण्यासाठी घेतलेला निर्णय चित्रीत करताना त्या लिहितात,
“पंख फुटता भावंडे गेली सोडुन घरटे मागे उरले उन्हात उभे आयुष्य एकटे, पुन्हा प्रसूतीवाचून तिची झाली आई, त्याला सार्थक म्हणू.. की संभ्रमात आहे बाई”.
नवऱ्या बायकोचे नाते तसेच ठेवून मुक्तपणे वेगवेगळं आयुष्य जगणाऱ्या स्त्रीबद्दल त्या लिहितात,
” मने जुळलेली त्यांची, छत नाही एक तरी,
लय साधलेली छान, तारा तुटल्या तरी”
समलिंगी विवाहातील समान अधिकार हा त्यांना ‘शकुनाचा क्षण’ वाटतो त्या लिहितात,
” कुणी ना दुय्यम कुणी ना मालक, दोघींचा फलक, दारावर. “
संसाराचे दोर कापून माणुसकीने सर्वांना मदत करणार्या स्त्रीबद्दल तिच्या स्त्रित्वाचा अर्थ उलगडून दाखवताना लिहितात,
“ओलांडले तिने बाईपण छोटे,
मनही धाकटे पार केले. “
शेवटी शीर्षकगीत लिहिताना, स्त्रीत्वाचा अर्थ सांगताना त्या लिहितात,
“कुणी भांडले भांडले तरी उभ्या ताठ घट्ट धरूनी ठेवती जगण्याचा काठ”.
प्रस्तुत पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगताना मला असं वाटते कि आसावरी काकडे यांच्या कविता अनुभवातून, चिंतनातून व अभ्यासातून आलेल्या आहेत. यामध्ये अनेक छंद, वृत्तांचा, अलंकारांचा वापर करण्यात आला आहे. सर्वत्र स्त्रियांच्या अस्तित्वाची नवीन वाट शोधण्याची भावना अधोरेखित आहे. त्या समाजाभिमुख आहेत. स्त्रियांच्या वास्तवाचे भान, त्यातील सूक्ष्मता, त्यांची व्याप्ती व घुसमट त्यांना कळते. एक संवेदनशील कवयित्री व समाजाभिमुख स्त्री म्हणून त्यांचा परिचय आपल्याला होतो. यामधील पात्रे प्रातिनिधिक आहेत.
प्रस्तावनेत विद्या बाळ यांनी म्हटल्याप्रमाणे, “स्त्रीच्या धडपडीला डोळ्यात साठवून ते सहज पाझरताना त्याची कविता झाली आहे “. चौकट मोडून नव्या वाटा चोखाळणाऱ्या या स्त्रिया आपल्यालाही अंतर्मुख करतात. स्त्रीचा देह आहे म्हणून स्त्री आहे हा समज गळून पडतो.
कवयित्रीने स्त्री असण्याचा लावलेला अर्थ खोलवर समजून घेण्यासाठी हा काव्यसंग्रह नक्की वाचायला हवा…
परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.
मो 9921524501
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈