सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “स्पंदने मनाची” – काव्यसंग्रह – कवयित्री : सुश्री ऋचा पत्की ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक परिचय
पुस्तक : स्पंदने मनाची (काव्यसंग्रह)
कवयित्री : सुश्री ऋचा पत्की
प्रकाशक: मुक्तरंग प्रकाशन, लातूर.
प्रथम आवृत्ती: १० मे २०२३
मूल्य: १५० रुपये.
मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेला माननीय ऋचा पत्की यांचा स्पंदने मनाची हा पहिलाच कवितासंग्रह. मात्र यातल्या सर्व ७५ कविता वाचल्यानंतर असे वाटले की काव्यशास्त्र क्षेत्रातला त्यांचा हा संचार कित्येक वर्षांपूर्वीचा असावा इतकी त्यांची कविता परिपक्व आहे. संवेदनशील, भावुक तरीही वैचारिक. जीवनाची विविध अंगे अनुभवून मनात दाटलेली ही कागदावरची स्पंदने वाचकाच्या मनावर राज्य करतात.
मनोगतात ऋचाताई म्हणतात, “ पुस्तक हेच माझे खरे मित्र या त्यांच्या एका वाक्यातच त्यांची वैचारिक बैठक किती सखोल आणि परिपूर्ण असेल याची खात्री होते. ”
या ७५ कवितांमधून त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. यात निसर्ग आहे, भक्तीभाव आहे, जीवनात घेतलेले निरनिराळे अनुभव आहेत, सुख आहे, आनंद आहे आणि वेदनाही आहेत तशीच नवी स्वप्नेही आहेत. जीवनाबद्दलचा आशावादही आहे. आठवणीत रमणं आहे आणि भविष्याची प्रतीक्षाही आहे.
काव्यसंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणे खरोखरच ही मनातली स्पंदने आहेत. मनातले हुंकार आहेत पण या हुंकारात फूत्कार नाहीत. यात भावनेचा हळुवार, मनाला सहज जाणवणारा एक संवेदनशील स्पर्श आहे. या कविता जेव्हा मी वाचल्या तेव्हा मला प्रथम जाणवला तो कवयित्रीच्या विचारातला स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा. जे वाटलं, जे डोळ्यांना दिसलं, जे अंतरंगात लहरलं ते तसंच्या तसं शब्दात उतरवण्याचा सुंदर आणि यशस्वी झालेला प्रयत्न आहे.
यातल्या कविता मुक्त आहेत. शब्दांचा, अलंकाराचा, व्याकरणाचा उगीच फापटपसारा नाही. खूप सहजता आहे यात. काही कविता अष्टाक्षरी नियमातल्या आहेत, काही अभंग आहेत, वृत्तबद्ध गझलाही आहेत. सारेच सुंदर ओघवते आणि प्रवाही आहे.
त्यांची बाबा ही कविता वाचताना मला सहजच, “ कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलात “
या काव्याची आठवण झाली.
तुमच्या नंतर तव कष्टांची
आता होते आहे जाणीव
तुमच्या एका प्रेमळ हाकेची
फक्त आहे उणीव…
संपूर्ण कविता खूप सुंदर आहे पण या शेवटच्या चार ओळीत पित्याविषयीची ओढ आर्ततेने जाणवते.
चांदणशेला हा शब्दच किती सुंदर आहे !
चांदणशेला पांघरतो
मंदिर कळसावरती
गाभारी लख्ख प्रकाश
चमचमती सांजवाती ।।
मंदिरात जात असतानाच त्या भोवतीच्या वातावरणात भक्तीमय झालेल्या मनाला गाभाऱ्यातला देव कसा तेजोमय भासतो याचं सुंदर वर्णन कवयित्रीने या कवितेत केले आहे. ही कविता वाचताना वाचकही सहजपणे त्या अज्ञात शक्ती पुढे माथा टेकवतो.
‘तू‘ ही अल्पाक्षरी कविताही हळुवार पण तितकीच मनाला भिडणारी आहे. एक अद्वैताची ही स्थिती आहे. अद्वैत परमेश्वराशी वा प्रियकराशी पण त्यातला एकतानतेचा भाव महत्त्वाचा…..
देह मी अन
प्राण तू
प्रेम मी अन
विश्वास तू
तुझ्यातही तू अन
माझ्यातही तू
या एका कवितेसाठी माझे ऋचा ताईंना सहस्त्र सलाम !
भांडण या कवितेत कविता आणि लेख यांचा एक गमतीदार वाद आहे आणि शेवटी या वादातून उतरलेला समंजसपणा टिपलेला आहे.
कविता आणि लेख बोलले
तू मी नसू मोठे आणि छोटे
आपण ज्यात गुंफले जातो
ते शब्दच असतती मोठे।।
शब्दांची महती वर्णन करणारी ही कविता खूप करमणूकही करते आणि बरंच काही सांगून जाते.
‘माणूस ‘ या कवितेत ऋचाताईंनी जगताना त्यांना माणूस जसा दिसला, जसा जाणवला, समजला त्याविषयी सांगितले आहे.
मदार नसते श्वासावरती
माझेपण कुरवाळतो माणूस..
एका वास्तवाचा त्यांनी सहजपणे उच्चार केलेला आहे.
मी या कवितेत त्या सांगतात
बसेन तेथे समाधीस्थ व्हावे
तरीही दूरवर भरकटते मी..
या कवितेत घेतलेला आत्मशोध नक्कीच वाचनीय आणि प्रशंसनीय आहे.
‘सारे कबुल आहे ‘ ही एक सुंदर गझल आहे,
माझ्याच जीवनी काटे पसरले जे
ते दररोजचे टोचणे मजला कबुल आहे…
…जीवनाविषयीची स्वीकृती या गझलेत प्रकर्षाने जाणवते. आणि आयुष्याचा एक खोल अर्थ लागतो.
‘दिंडी‘ हा विठ्ठल वारीचा काव्यसाज ही मनात टाळ मृदुंगासारखा दुमदुमतो.
सगुण निर्गुणाचा नाद
तुळशी माता डोईवरी
अन वाट सोपी होते
चालताना घाट वारी ।।
ही कविता वाचताना खरोखरच प्रत्यक्ष आपण वारीत असल्याचा अनुभव मिळतो.
स्पंदने मनाची ‘ ही शीर्षक कविता वाचताना त्यातला नितळपणा जाणवतो. मन या विषयावर कविता करण्याचा मोह कुठल्याही काव्यरचनाकाराला टाळता आलेला नाही. बहिणाबाईंची तर मन खसखशीचा दाणा अशा शब्दवेल्हाळ काव्याचा पगडा मराठी रसिकांच्या मनावर अढळ आहेच.
ऋचाताईंनी या मनाविषयी तितकेच सुंदर भाष्य केलेले आहे.
मन व्यासंग व्यासंग
जशी पुस्तकाची खूण
मन निसंग निसंग
वाजे अंतरीची धून…
या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे भाषेचं, विचारांचं, कल्पनांचं भावभावनांचं धन आहे.
स्पंदने मनातली वाचकांच्या मनःप्रवाहातही नैसर्गिकपणे झिरपत जातात. या कवितांचे वाचन हा एक सुखानंद आहे, एक सुरेख अनुभव आहे. माझ्या मते जे लेखन वाचकाचं लिहिणाऱ्याशी नातं जुळवतं ते सकस लेखन. ऋचाताईंच्या कवितेत हा सकसपणा निश्चितच जाणवतो.
या कवितासंग्रहाला प्राध्यापक डॉक्टर गोपाल बाहेती यांची सुरेख प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ” निर्मितीचे स्वप्न पूर्ण करते, वेदनेचेही ज्याला गीत करता येते, त्यालाच जगण्याची रीत समजलेली असते. ” … हे अगदी सत्यात उतरल्याची साक्ष ऋचाताईंचा स्पंदने मनातली हा काव्यसंग्रह करून देतो.
अशी ही भावसमृद्ध शब्दांची लेणी ! प्रत्येकानी वाचावी, संग्रही ठेवावी आणि शब्दप्रवाहाच्या सुखद लाटांचा स्पर्श अनुभवावा असेच मी म्हणेन.
पुस्तकाचे मुखपृष्ठ ही अतिशय सुंदर आहे. *मुक्तरंग क्रिएशन*ने केलेले हे मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. अरुणोदयाच्या वेळी त्या अस्फुट नारंगी प्रकाशात झोपाळ्यावर झोके घेत असलेली एक मुलगी, हाताच्या बोटावर बसलेल्या पक्ष्याशी जणू काही मनातल्या गुजगोष्टीच करत आहे. तिच्या मनातली स्पंदनं त्या विहगालाही जणू काही जाणवत आहेत…. फारच सुंदर असे हे मुखपृष्ठ !!
“ऋचाताई काव्य प्रवासातलं तुमचं हे पहिलं पाऊल अतिशय दमदारपणे पडलं आहे आणि या शब्दांच्या सागरात नाहताना ज्या ब्रह्मानंदाचा अनुभव यामुळे मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद!! तसेच तुमच्या पुढील काव्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! “
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈