श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “आवडलं ते निवडलं” – (काव्य-संग्रह) – कवी : श्री. अभिजीत पाटील ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : आवडलं ते निवडलं
लेखक :श्री. अभिजीत पाटील, 9970188661
मूल्य : रु. १२०/-
प्रकाशक : शब्द शिवार प्रकाशन, 9423060112
☆ आवडलं ते निवडलं…. चोखंदळ निवडीचा प्रत्यय ! ☆
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच भयाण काळ होता. संपूर्ण जगच जणू नजरकैदेत होतं. ‘सातच्या आत घरात ‘ नव्हे तर दिवसभर घरात अशी अवस्था झाली होती. पण या बंदीवासाचाही अनेकांनी उपयोग करुन घेतला. आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन किंवा बरेच दिवस मनात असलेली योजना पूर्ण करुन मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणारे जे होते त्यापैकी एक म्हणजे श्री. अभिजीत पाटील. चिंतेऐवजी चिंतनाला आपलेसे करुन त्यांनी या काळात एक कलाकृती निर्माण केली.
श्री. अभिजीत पाटील हे स्वतः एक कवी असल्याने त्यांना कवितेविषयी प्रेम, आकर्षण असणे स्वाभाविक आहे. कविता-रती या काव्याला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक डाॅ. आशुतोष पाटील यांनी काही वर्षांपूर्वी ‘ काव्यमुद्रा ‘ हे पुस्तक संपादित केले. हे पुस्तक म्हणजे कविता-रती या त्यांच्या नियतकालिकातील निवडक कवितांचा संग्रह आहे. या ‘काव्यमुद्रा ‘ मधील विशेष आवडलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे श्री. अभिजीत पाटील यांचे ‘ आवडल ते निवडलं ‘ हे कोरोना काळानंतर प्रकाशित झालेले पुस्तक.
प्रथम ‘कविता-रती’, नंतर ‘काव्यमुद्रा’ अशा दोन वेळेला निवडलेल्या कवितांतून श्री. अभिजीत पाटील यांनी पुन्हा आपल्या आवडीनुसार निवड केली आहे. त्यामुळे साहजिकच या संग्रहात दर्जेदार, निवडक कविता वाचायला मिळतात. पण केवळ कविता न निवडता त्यांनी प्रत्येक कवितेवर भाष्यही केले आहे. त्यामुळे प्रत्येक कवितेचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ, त्यातील सौंदर्य त्यांनी उलगडून दाखवले आहे. त्यामुळे कविता समजून घेणे, त्या कवितेबद्दल त्यांचे मत काय आहे ते जाणून घेणे शक्य होते.
या संग्रहासाठी त्यांनी चाळीस कविता निवडल्या आहेत. यामध्ये वा. रा. कान्त, शंकर रामाणी, शंकर वैद्य, कुसुमाग्रज, शांता शेळके यांसारख्या मागील पिढीतील कविंच्या कविता निवडल्या आहेत. त्याबरोबरच कल्पना दुधाळ, नागराज मंजुळे, प्रशांत असनारे, केशव सखाराम देशमुख, दासू वैद्य, महेश केळुसकर अशा आजच्या पिढीतील नामवंत कवी कवयित्रींच्या कविताही निवडल्या आहेत. त्यामुळे विचारांची आणि विषयांची विविधता अनुभवायला मिळते.
कविता, हायकू, रुबाया, गझल अशा विविध प्रकारातील कविता आपण यात वाचू शकतो. त्यावरील श्री. अभिजीत यांनी केलेले भाष्य वाचताना त्यांचे कविता या साहित्य प्रकाराविषयी काय चिंतन झाले आहे व ते कवितेविषयी किती गंभीरपणे विचार करत आहेत याची कल्पना येते. ‘ कवितेकडे आपल्याला डोळसपणे बघायला हवे. एखादी कविता जीवनाकडे वेगळ्या नजरेतून बघायला शिकवते ‘ असे त्यांचे मत आहे. दुस-या एका ठिकाणी ते म्हणतात ‘ काव्य निर्मिती वेदनेची बाजू मांडणारी असू शकते किंवा कवितेच्या निर्मितीमागे जळजळणारी वेदना हे कारण असू शकते. ‘ अशा पद्धतीने प्रत्येक कवितेचा विषय आणि आशय लक्षात घेऊन त्यांनी त्या कवितेविषयीचे स्वतःचे मत व्यक्त केले आहे. हे करत असताना नकळतपणे कविता या साहित्य प्रकाराविषयीच प्रकट चिंतन झाले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘ कविता या विषयावर अनेक कविता, कवितेच्या व्याख्या व व्याख्याने आपण ऐकतो, त्या संबंधातील लेखन वाचतो, कविता म्हणजे नेमकी काय याचा शोध घ्यावाच वाटतो. ‘ हे पुस्तक म्हणजे हा शोध घेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
अन्य कविंच्या कविता वाचून त्या लोकांसमोर ठेवणे, त्यावर आपण भाष्य करणे हा वेगळा प्रयोग या पुस्तकाद्वारे श्री. पाटील यांनी केला आहे. त्यांनी हाती घेतलेल्या साहित्य चळवळीतील तो एक महत्वाचा टप्पा ठरेल. अन्य कविंच्या कविता वाचून त्यावर चिंतन करावे अशी प्रेरणा सर्वांना या पुस्तकामुळे मिळेल अशी आशा आहे…. त्यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈