सुश्री गौरी गाडेकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “मनगाभाऱ्यातील शिल्पे” – (अनुवादित) – मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर ☆
पुस्तक : मनगाभाऱ्यातील शिल्पे (अनुवादित)
मूळ हिंदी लेखिका : डॉ. हंसा दीप
मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर.
प्रकाशक : अमित प्रकाशन, पुणे.
परिचय: सौ. गौरी गाडेकर
डॉ. हंसा दीप
हा कथासंग्रह म्हणजे डॉ. हंसा दीप यांच्या निवडक कथांचा सौ. उज्ज्वला केळकर यांनी केलेला अनुवाद आहे. डॉ. हंसा दीप यांना मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय उज्ज्वलाताईंनाच जातं.
डॉ. हंसा दीप यांचा जन्म मेघनगर, झाबुआ, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांनी आदिवासी लोकसाहित्य व लोकसंस्कृती या विषयात पीएच्. डी. मिळवली आहे. त्या विषयावरील त्यांचे ‘ सौंधवाडी लोक धरोहर ‘ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. डॉ. हंसा दीप यांनी नंतर अमेरिकेतील सुप्रसिद्ध संस्थांमध्ये हिंदीचे अध्यापन, हिंदी पाठ्यपुस्तकांचे संस्करण तसेच अनेक पुस्तकांचे, नियतकालिकांचे संपादन केले. सद्या त्या कॅनडामधील टोरॅंटो युनिव्हर्सिटीत हिंदीच्या प्राध्यापक, कोर्स डायरेक्टर आहेत. त्यांच्या साहित्याचा अनेक भारतीय भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. विदेशात हिंदी भाषेचा विकास, विस्तार व संवाद यासाठी त्यांनी केलेल्या निरंतर प्रयत्नांबद्दल, प्रवासी भारतीयांसाठी असलेला राष्ट्रीय निर्मल वर्मा सन्मान हा पुरस्कार त्यांना नुकताच भोपाळ, मध्य प्रदेश येथे प्रदान करण्यात आला.
सौ. उज्ज्वला केळकर
वेगवेगळ्या देशातील वास्तव्य, अनेक उपक्रमांमधून विविध लोकांशी संवाद यामुळे त्यांच्या अनुभवविश्वाची व्याप्ती खूपच मोठी आहे. या जीवनप्रवासात मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यापैकी काही व्यक्तिविशेषांची अभिव्यक्ती या संग्रहात आढळते.
यातील अनेक कथांची पार्श्वभूमी टोरॅंटो असली तरी या घटना भारतातही घडू शकतात. त्या अर्थाने त्या स्थलातीत आहेत.
उदा. ‘ कडब्याची आग’ मधील आयुष्याच्या उताराला लागलेल्या जोडप्यातले मतभेद. ‘शब्दही टोचत होते आणि मौनही. ‘ ‘ मग त्या रागाचं रूपांतर कडब्याच्या आगीत व्हायचं. पेटायचीही लगेच आणि विझायचीही पटकन. ‘
‘ शून्याच्या आत’ मधली निःस्वार्थ, समर्पित कुमुडी मायदेशातील भावंडांच्या जबाबदाऱ्या पेलतापेलता थकते, म्हातारी होते आणि तिला जाणवतं की तिचं जग म्हणजे भलंमोठं शून्य आहे. पण तिचा हा एकटेपणा घालवतात पशुपक्षी.
‘ समर्पण ‘ ही कथा आहे कोविडच्या महामारीत एकच व्हेंटिलेटर असताना आपल्यापेक्षा, २५-२६ वर्षांच्या डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे, म्हणून स्वतःहून मृत्यूचं आमंत्रण स्वीकारणाऱ्या ८६ वर्षांच्या रोझाची.
‘ सुहास्य तिचे मनास मोही ‘ मधली खूप शिकून उत्तम करिअर करूनही असमाधानी राहिलेली कथानायिका आणि जगण्याच्या परीक्षेत अव्वल आलेली तिची अडाणी, गरीब असूनही सुखी, प्रांजळ हसणारी मैत्रीण.
‘ दोन आणि दोन बावीस ‘ ही कथा मात्र तद्दन टोरॅंटोमधलीच. भारतातून येणारं पुस्तकाचं पार्सल २२ऐवजी चुकून २ नंबरच्या घरात डिलिव्हर केलं गेलं. ते मिळवायला लेखिकेने खूप फेऱ्या घातल्या. तर त्या घरमालकाने तिला चोर समजून चक्क पोलिसांना बोलावलं.
‘ पोपटी पान पिवळं पान ‘ हीही सहसा भारतात न घडणारी कथा. बिछान्याला खिळलेल्या आणि त्यामुळे जीवनातील रस निघून गेलेल्या एका वृद्ध डॉक्टरांना त्यांच्या शेजारची तरुणी आपल्या बाळाचं रोज तासभर बेबीसिटिंग करायची विनंती करते. त्या शैशवाच्या सान्निध्यामुळे हळूहळू ते डॉक्टर जीवनाभिमुख होतात.
‘ परिवर्तन ‘ आणि ‘ सोव्हिनियर ‘ या कथांत बालपणी विकृत पालकत्वाची शिकार झाल्यामुळे रूक्ष, कठोर जीवन जगत असणाऱ्या साशा आणि ऍना यांच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की जो त्यांना त्या ‘ काल ‘ मधून बाहेर पडून नवीन उत्साही जीवन जगायला प्रवृत्त करतो.
‘ मार्थाचे घर ‘, ‘ समांतर रेषा’, ‘ सूर्य आता चमकू लागलाय ‘ या सर्वच कथा मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे. त्यामुळे शेवटची कलाटणी धक्का देते.
याशिवायही अनेक कथा या संग्रहात आहेत.
डॉ. हंसाजींनी अतिशय कौशल्याने ही शिल्पं कोरली आहेत. आणि उज्ज्वलाताईंनी त्यांना अतिशय सुंदर फिनिशिंग दिलं आहे. हे पुस्तक वाचताना तो अनुवाद आहे, असं कुठेही जाणवत नाही. तर मराठीतच लिहिलेलं पुस्तक वाचत असल्यासारखं वाटतं.
सगळ्यांनी हे पुस्तक मिळवून मुळातूनच वाचावं, ही सर्वांना आग्रहाची विनंती.
मूळ हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817
मराठी अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
परिचय – सुश्री गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈