☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “अमिबा” – श्री श्रीकांत सिंधु मधुकर ☆ श्री ओंकार कुंभार ☆
पुस्तक – काव्यसंग्रह – अमीबा
कवी – श्रीकांत सिंधु मधुकर
प्रकाशक – अंतर्नाद पब्लिकेशन
प्रथम आवृत्ती – 15 आँगस्ट 2018 (रायगड)
मूल्य – 100 रुपये
पृष्ट संख्या – 76
पुस्तक परिक्षण
श्री श्रीकांत सिंधु मधुकर या नवोदित कवीने एका वेगळ्याच नावाने लिहलेला हा सुंदर काव्य संग्रह आहे. काव्यसंग्रहाला अमिबा हे नाव का ठेवावस वाटले ते मलपृष्ठावर सांगितलेले कवीच्याच शब्दात सांगायचे झाले तर कवी म्हणतात, “माणसाचं आयुष्य अमिबासारखं हवं. एकपेशीय, तरीही स्वच्छंदी. हवा तसा आकार घेऊनही सार्यांच्या नजरेत बरोबर असणार्या साध्या आणि सोप्या अमिबासारखं! ज्याच्या नावात आईचा अ, माझा मी आणि बाबांचा ब आहे, तो जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणून या काव्यसंग्रहास अमिबा म्हणावसं वटतं.”
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर इंद्रधनू कडे कौतुकाने पाहणारे आई, वडील आणि मुलगा यांची छायाकृती आपणास पहावयास मिळते. मुखपृष्ठाद्वारे मुखपृष्टकार मधुरा जोशी यांनी आपणास एक छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे आयुष्यातील काळोखाच्या समयी इंद्रधनू च्या रंगांनी जीवन बहरुन जाते, जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त होते.
कवी श्रीकांत हे पट्टीचे गिर्यारोहक आहेत आणि एक उत्तम कवीही. अमीबा या काव्यसंग्रहात 69 कविता आहेत आणि कवितांना आशयघन करणार्या चित्रांचीही खूप सुंदर रेलचेल आहे. हा पूर्ण कवितासंग्रह मुक्तछंदात लिहला आहे. सगळ्याच कविता या सुंदर आहेत. कवितेत कवीने वेगवेगळे विषय खूपच छान व वेगळेपणाने हाताळले आहेत व मांडणीही वेगळेपणाने केली आहे.
मित्र या कवितेत शेवटी मित्राची छान व्याख्या करताना कवी म्हणतो,
“एक मित्र असावा असा सुचणार्या कवितांप्रमाणे श्रीमंत
एक असला तरी भासावा असा शंभराहूनी मूर्तिमंत !!”
पहिला पाऊस या कवितेचा शेवटही कवीने असाच सुंदर केला आहे.
“मनात त्यांच्या भिजविणारा
मज थेंब भेटला होता
दारावरी ज्यांच्या असा तो
पाऊस दाटला होता.”
सूर्यपुत्र या पहिल्याच कवितेत कवी कर्णाची भावना आपल्या शब्दात व्यक्त करताना म्हणतो,
“नियतीने मारलं तरी
मरण मला कधी आलच नाही
जे तत्वांसाठी जगतात एकनिष्ठ
ते मरूनही कधी मरत नाहीत.
शरीरं जाळली जाऊ शकतात
आणि कपडेलत्ते संपत्तीही
जाणिवा कधी जळत नाहीत
काळ पलटून गेला तरीही.”
आपल्या रायबा कवितेही तरुण पिढीच्या डोळ्यात रसरशीत अंजन घातले आहे. त्यातील काही ओळी…
“राबाकडे बुलेट नव्हती
रायबा नव्हता नाचत डिजेवर
रायबाला नव्हती माहीत मदिरा
नव्हता झिंगला तो कधी वेशीवर
रायबाला दिसलच नव्हतं
परस्रीचं ते खणी रुपडं कधी
असायचं लक्ष ज्याचं तिच्या पैजणावर”
शेवटी किन्नरांच्या व्यथा किन्नर या कवितेतून मांडताना कवीचे सामाजिक भान किती प्रगल्भ आहे ते जाणवते. त्यामध्ये कवी मांडतो…
कवितेतील काही ओळी अश्या…
ते स्पष्ट बोलत नाहीत,
ते एकमेकांना फसवतात!
ते दंगली घडवून आणतात,
ते बाईला नाचवतात!
ते मढ्यावरचही मिळून खातात!
‘ते’ म्हटलं की तुम्हाला ‘ते’ आठवत नाहीत
कारण काय तर त्यांना लिंग आहे
आम्ही शरीरानं नपुंसक असू;
पण मनानं ते खोल अपंग आहेत
उपेक्षु नकोस मला किन्नर म्हणून
विचार माझे तुझ्याहून स्वच्छ आहेत,
परिस्थितीनं डावललं जरासं तरी
या सर्वांहून मी उच्च आहे!
शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावेसे वाटते. ते म्हणजे सर्वांनी हा कवितासंग्रह मुळातून पूर्ण वाचायला हवा. आवर्जून विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावयास हवा.
असा हा अप्रतिम काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला आणि त्याचा पुस्तक परिचय मला आवर्जून द्यावासा वाटला. कारण, या कवितासंग्रहाची शैली होय. श्रीकांत सिंधू मधुकर यांचा हा काव्यसंग्रह वाचकाला भरभरून काही तरी अलौकिक देतो म्हणूनच. कविंना व काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!
©️ श्री ओंकार कुंभार
श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.
मो.नं. 9921108879
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈