सौ.अंजोर चाफेकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “द डायरी ऑफ अ यंग गर्ल” – लेखिका : ॲन फ्रॅन्क – अनुवाद : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆
पुस्तक : द डायरी ऑफ अ यंग गर्ल
लेखिका : ॲन फ्रॅन्क
मराठी अनुवाद : सौ. मंजुषा मुळे
प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर.
पृष्ठे : ३०४
मूल्य : रु.३७०/_
आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान क्रूरकर्मा हिटलरने, त्याच्या एका वैयक्तिक अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून असंख्य ज्यू लोकांचा अनन्वित छळ सुरु केला होता. त्यामुळे अनेक ज्यूंना अत्यंत असुरक्षित अवस्थेत भूमिगत होऊन कित्येक महिने कसंबसं जगावं लागलं होतं. फ्रँक कुटुंब हे त्यातलेच एक दुर्दैवी कुटुंब आणि ॲन ही त्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी — जेमतेम १३ वर्षांची…. शाळा, मित्र-मैत्रिणी, खेळ, हिंडणेफिरणे या त्या वयातल्या सगळ्या आवश्यक गरजांना मुकावं लागलेली…. पण अशाच अवस्थेत रहावं लागलेल्या इतर समवयस्क मुलींपेक्षा खूपच वेगळी असणारी….. बोलण्याची अत्यंत आवड असणाऱ्या या मुलीने त्या अज्ञातवासात मग तिला १३व्या वर्षी वाढदिवसाला मिळालेल्या डायरीला आपली मैत्रीण.. तिच्या सुखदुःखाची साथीदार बनवले. आणि ती रोज डायरी लिहायला लागली – एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशा भाषेत…. नाझींच्या तावडीत सापडू नये म्हणून १९४२ साली गुप्त घरात लपून बसलेले फ्रॅन्क कुटुंब व आणखी चार मित्र असे आठ जण, युद्ध संपेल व पुन्हा आपले जीवन सुरळीत होईल या एकाच आशेने कसे रहात होते, याचे वर्णन त्या १३ वर्षाच्या मुलीच्या शब्दात या डायरीत वाचायला मिळते.
सौ. मंजुषा मुळे
ॲनाची डायरी तिच्या सात्विक, शुद्ध मनाची साक्ष आहे. आणि म्हणूनच तिने या डायरीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. एकाच वेळी तिच्यातली एक लहान निरागस मुलगी.. आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणारी….. तरीही सगळ्या परिस्थितीकडे आणि स्वतःकडेही तटस्थपणे पाहणारी ही एक वेगळीच मुलगी …. तिने केलेल्या काही नोंदी इथे सांगायलाच हव्यात अशा आहेत….. उदा.
“ आम्ही ज्यू आहोत. ज्यू लोकांवर अनेक कडक बंधने आहेत. तरी आमची आयुष्ये पुढे सरकत होती.
डॅडी म्हणाले, आपल्याला आता लपून रहावे लागेल. असे भूमिगत होताना नेमकं काय वाटतं ते मला अजून नीटसं कळत नाही. आपण स्वतःच्या घरात राहतोय असं वाटत नाही. आपण सुट्टीत रहायला आलोय असं वाटतंय. ही इमारत एका बाजूला कललेली, कोंदट, दमट आहे. तरी लपण्यासाठी सोयीची आहे. माझी बहिण मार्गारेटला खोकला झालाय. पण तिच्या खोकल्यावर बंदी म्हणून तिला कोडेइनच्या स्ट्रांग गोळ्या चघळायला दिल्यात. “
“ आम्ही इथे लपलो आहोत हे कुणाला कळले तर ते आम्हाला गोळी घालून ठार मारतील या विचारानेच थरकाप होतो. खालच्या गोदामातल्या लोकांना ऐकू जाईल या भीतीने दिवसासुद्धा आम्ही दबकत
कामे करतो. ” — इतका थरार, इतका त्रास, इतकी मानहानी अनुभवत असताना झालेली ॲनाची ही भावनांची अभिव्यक्ती चटका लावते.
ती लिहिते, ” डॅडी कुटुंबाचा इतिहास सांगतात. ते ऐकणं हा मनोरंजक अनुभव आहे. ’ इन झाॅमर झोथेइड ‘ हे विनोदी पुस्तक आठवून मला हसायला येते. ”
“ वॅनडाॅन आन्टीची सूपची प्लेट माझ्या हातून फुटली. त्या माझ्यावर इतक्या रागावल्या. मम्मीही माझ्यावर खूप रागावली. ”
“ मोठी माणसे क्षुल्लक कारणावरून का भांडतात ?. माझी कुठलीच गोष्ट बरोबर नाही असं त्यांना का वाटतं? मला त्यांचे कठोर बोलणे, ओरडणे शांतपणे सहन करावे लागते. माझे हे सगळे अपमान मी सहन करणार नाही. सहन करायची सवय करून घेणार नाही. मीच त्यांना शिकवायला सुरवात करणार.”
“ मम्मी अतिशय चिडखोर आहे. डॅडी आणि मम्मी मार्गारेटला कधीच ओरडत नाहीत. तिला कसला जाब विचारत नाहीत. माझ्यावर मात्र प्रत्येक गोष्टीत ओरडत असतात. “
या लिखाणातून तिची बालिश निरागसता, आणि तडफ मनाला भावते.
ती सांगते … “ इथे आल्यापासून आम्ही पावट्याच्या आणि फरसबीच्या इतक्या बिया खाल्ल्यात की आता मला त्या बिया नजरेसमोर ही नकोत असं झालंय. त्या बियांच्या नुसत्या विचारानेच मला आजारी वाटायला लागतं. संध्याकाळच्या जेवणात आम्हाला ब्रेड मिळत नाही. आता माझ्याकडे बूटांची एकही जोडी शिल्लक नाही. बर्फावर चालायचे बूट आहेत पण त्याचा घरात काय उययोग? “
“ पुढच्या महिन्यात आम्हाला आमचा रेडिओही द्यावा लागणार. ज्या घरात लोक लपून राहिलेत तिथे जाणूनबुजून अधिकाऱ्यांचे रेडिओमुळे लक्ष वेधून घेणे हे धाडस कुणी करू शकणार नाही. ”
“आणि आता रेडिओवरचा कार्यक्रम अगदी नकोसा, केविलवाणा वाटतो. एका जखमी सैनिकाचे संभाषण प्रसारित झाले. ते ऐकून त्या सैनिकाची इतकी दया वाटत होती. पण त्या सैनिकांना जखमांचा अभिमान वाटतो. एका सैनिकाला हिटलरशी हस्तांदोलन करायला मिळाले या गोष्टीने गहिवरून आले. (म्हणजे त्याचे हात शाबूत होते) काय म्हणायचं या सगळयांना.“
“जर्मनीवर भयंकर बाॅम्बहल्ले होत आहेत. मात्र वाॅनडाॅन अंकल यांना पुरेशा सिगरेटी मिळत नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत.”
– – अशा छोट्या छोट्या पण मन विचलित करणाऱ्या गोष्टींच्या नोंदी तिच्या डायरीत आहेत.
कधी तिच्या स्वप्नात तिची मैत्रिण लीस येते. तिचे मोठे डोळे तिला खूप आवडायचे. पण तिला लीसचा सुकलेला चेहरा आणि तिच्या डोळयातले दुःख दिसते. ‘ या नरकातून माझी सुटका कर ना ‘ असंच जणू ती सांगते….. ॲना तिला त्या डायरीतून सांगते, ” लीस, युद्ध संपेपर्यंत तू जगशील. मी पुन्हा तुझ्याशी मैत्री करीन. देवा तू तिच्या पाठीशी उभा रहा. तिचं रक्षण कर. “….
… आणि ती मनात म्हणते, ” खरं तर मलाच काही भविष्य नाही. “
ती स्वतःचेही परीक्षण करते…… “ १९४२ साली मी काही पूर्ण आनंदी नव्हते. पण शक्य झालं तेवढा आनंद मी उपभोगीत होते. एकटं पडल्यासारखं वाटायचं पण दिवसभर काही ना काही काम करत रहायचे. मला वाटणारी निरर्थकता दूर करण्यासाठी विनोद, खोड्या करत असे…. पण माझ्या आयुष्याची गंभीर बाजूही
आता सतत माझ्याबरोबर असते. रात्री अंथरुणावर पडते तेव्हा देवाला म्हणते, ” देवा, या जगात जे जे चांगलं आहे, सुंदर आहे त्या सर्वांसाठी मी तुझी आभारी आहे.”
… “मी फक्त दुःखाचा व हाल अपेष्टांचा विचार करत बसत नाही. याउलट सौंदर्य कुठे आणि कसं टिकून आहे याचा विचार करते…. कधीतरी हे भयंकर युद्ध संपेल. आम्ही पुन्हा सर्व सामान्य लोक असू…. फक्त ज्यू नाही… कुणी लादलं हे सर्व आमच्यावर. ? कुणी ठरवलं ज्यू इतरांपेक्षा वेगळे आहेत?”
“युद्ध संपल्यावर माझी पहिली इच्छा असेल की मी परत डच व्हावं. डच लोकांवर माझे प्रेम आहे. या देशावर मी खूप प्रेम करते. ही भाषा माझी आवडती आहे. जोपर्यंत माझे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. ”
“ मी एक स्री आहे याची मला जाणीव आहे….. अशी स्री जिच्याकडे कणखर मन आहे, भरपूर धैर्य आहे. जर देवाने मला जिवंत ठेवले तर मी प्राधान्याने धैर्य, आनंद, समाधान मिळवायला शिकले पाहिजे. “
या पुस्तकाबद्दल काय आणि किती लिहू ? यातले प्रत्येक पान झपाटून टाकते. या इतक्या छोट्या मुलीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबरोबरच त्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचंही सविस्तर वर्णन तिच्या वयाला अनुसरून केलेलं आहे. एखाद्या प्रौढ माणसाच्या बाबतीतही अशक्य ठरणारे विचार ही जेमतेम १३ वर्षांची मुलगी मांडते …. अतिशय तटस्थपणे स्वतःचंच परीक्षण करते …तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेली, वयाच्या मानाने खूपच विचारी, संवेदनशील आणि त्या काळात अपेक्षित नसणारा दुर्दम्य आशावाद बाळगणारी, पण अत्यंत दुर्दैवी आणि अल्पायुषी ठरलेली ॲना या डायरीतून समोर ठाकते आणि वाचकाच्या मनाला कायमचा चटका लावते.
जगातील ३१ भाषांमधे ह्या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. कारण ही अनुभूती आहे. यात काल्पनिक काहीच नाही. जे घडत होतं ते भयंकर, थरारक असूनसुद्धा एका १३ वर्षाच्या मुलीने साक्षीभावाने ते लिहिले आहे. यात तिचा निरागस निष्पापपणा आहे. तिच्या तारुण्यसुलभ भावनाही यात व्यक्त होतात.
त्याही परिस्थितीत आनंद शोधण्याची तिची वृत्ती दिसून येते.
‘ द फ्री नेदरलॅन्डस ‘ सारख्या संस्थांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून भूमिगतांना मदत केली.. त्यांच्याबद्दलची अपार कृतज्ञता तिला वाटते. तिच्या डॅडींच्या डोळयातील उदास, दुःखी भाव ती टिपते. देशासाठी मरायचीही तिची तयारी आहे. खरंच.. त्या कोवळ्या वयातही तिचे विचार खूप प्रगल्भ होते हे प्रकर्षाने जाणवते..
तिला स्वतःत झालेला बदल जाणवतो. ती म्हणते, ” स्वर्गात राहण्याचा आनंद घेणारी मी आणि या भिंतीत कोंडून शहाणी झालेली मी खूप वेगळी आहे. मी आधीच्या त्या मजेदार पण उथळ वाटणाऱ्या मुलीकडे बघते तेव्हा आताच्या ॲनाचा तिच्याशी काहीच संबंध नाही असं वाटतं. “.
ॲना, तिची आई, आणि मोठी बहीण या तिघींनाही हिटलरच्या सैनिकांनी पकडून नेले आणि नरकासमान असणाऱ्या एका छळछावणीत कोंडले.. तिघींचाही तिथेच मृत्यू झाला. पण वडील मात्र वाचले. युद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली. ते त्यांच्या त्या गुप्त घरी गेले … सामान आवरताना त्यांना ही डायरी सापडली….. आणि ती वाचल्यावर त्यातून दिसणारे तेव्हाचे दारुण वास्तव लोकांपर्यंत पोहोचवायलाच हवे या उद्देशाने त्यांनी ही डायरी प्रकाशित केली.
या पुस्तकाचा अनुवाद करताना, ही डायरी एका जेमतेम १३ वर्षांच्या मुलीने आपले मन मोकळे करण्यासाठी लिहिलेली आहे याचे भान मंजुषाताईंनी आवर्जून राखले आहे, आणि म्हणूनच बोजड शब्द न वापरता, कुठेही अलंकारिक, क्लिष्ट भाषा न वापरता त्यांनी हा अनुवाद केला आहे. त्यामुळे हा अनुवाद जितका सहज आणि संवेदनशील आहे, तितकाच मुक्त, तरल आहे. एखाद्या बालकलाकाराने चित्र काढताना सहज रेघोट्या ओढाव्यात तसे रोज मनात आलेले विचार या डायरीत उतरले आहेत. आणि मंजुषाताईंच्या अनुवाद करण्याच्या शैलीचे हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या १३ वर्षाच्या मुलीचा निरागसपणा, चैतन्यमय, प्रकाशमय उमदेपणा, तिची सूक्ष्म निरीक्षणशक्त्ती आणि तिची संवेदनशीलता आणि वयाला न साजेशी अपवादात्मक विचारक्षमता हुबेहुब टिपली आहे.
या मुलीच्या भावना.. विचार.. आणि त्यातील परिपक्वता थेटपणे वाचकाच्या अंतर्मनाला भिडेल असाच त्यांनी हा मराठी अनुवाद केला आहे
… जोपर्यंत जगात युद्ध चालू असणार आहेत, जुलूम, अत्याचार होत राहणार आहेत, तोपर्यंत हे पुस्तक अमर आहे.
युद्ध आणि त्याचे माणसांवर होणारे सखोल परिणाम यावर नकळतपणे केले गेलेले हे भाष्य, मराठीत सहज-सोप्या भाषेत अनुवादित करून वाचकापर्यंत पोहोचवणारे हे पुस्तक आहे.
… हे पुस्तक आपण सर्वांनी जरुर वाचावे यासाठी ही तोंडओळख.
परीक्षण सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈