सुश्री त्रिशला शहा
पुस्तकावर बोलू काही
☆ बापू, तुम्ही ग्रेटच – लेखिका : सुश्री नीलम माणगावे — परिचय : सुश्री आशा धनाले ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : “ बापू, तुम्ही ग्रेटच ! “
लेखिका–नीलम माणगावे
प्रकाशक : शब्दशिवार प्रकाशन
पृष्ठे ११८
किंमत–रु. १५० / –
‘बापू, तुम्ही ग्रेटच ‘ …. लेखिका नीलम माणगावे यांचं हे ७५ वं पुस्तक. याचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
ही एक दीर्घ कविता आहे. याचे लेखन एका वेगळ्याच पद्धतीने करण्यात आलं आहे. राग, लोभ, मद, मत्सर हे मानवी स्वभावाचे कंगोरे लेखिकेने बापूंच्या चरखा, चष्मा व लाठी या जवळच्या वस्तूंना बहाल करुन त्यांचा बापूंशी संवाद घडवून आणला आहे. बापूंचे जीवनकार्य व मूल्ये या तीन वस्तूंच्या तोंडून समजतातच.
शिवाय त्यांच्या नंतरच्या काळात जे घडले आहे, घडत आहे त्या प्रसंगी बापू कसे वागले असते हेही दृग्गोचर होते. त्यावेळी त्यांना कारस्थानाने मारले. पण खरेतर ते अजूनही मरत नाहीत, अशा बापूंची वेगळी ताकद आजही विरोधकांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या मानगुटीवर बसली आहे हे लेखिकेचे म्हणणे पटते.
बापूंच्या स्मारकाला भेट देण्याच्या प्रसंगी राजकारण्यांद्वारे चरखा उलटा फिरवला गेला यावरून देश उलट्या दिशेने म्हणजे सतराव्या शतकात मनुवादात नेऊन ठेवायचा आहे की काय? अशा संभाव्य स्थितीची इथे वाच्यता करण्यात आली आहे. थोडक्यात, गांधी जयंती दिवशीसुद्धा सत्य, अहिंसा, संयम, त्याग या गांधीमूल्यांना अडथळे निर्माण करणारे विषाणू समजून मारुन टाकले जाते.
…. असे असले तरी बापूंचे आचारविचार संपणार नाहीत हे प्रतिपादन करताना चरखा, चष्मा, लाठी या प्रतिकात्मक पात्रांनी बापूंच्यावरचा अन्यायही इथे जोरदारपणे व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या क्षोभाला बापूंनी आपल्या नेहमीच्या संयमित उत्तरांनी शांत करताना ‘ वाणीतून विवेक हरवला तर ती हिंसाच ठरते ‘ हे सांगितले आहे.
अशी ही आगळीवेगळी दीर्घ कविता म्हणजे सध्याच्या सरकारी प्रणालीला दाखविलेला एक आरसाच आहे. गांधी-प्रेमींना ‘ बापू तुम्ही ग्रेटच ‘ हे पुस्तक वाचून एक वेगळी अनुभूती मिळणार हे नक्की.
परिचय : सुश्री आशा धनाले,
मो ९८६०४५३५९९
प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈