सुश्री त्रिशला शहा
पुस्तकावर बोलू काही
☆ मेळघाटावरील मोहर : डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे – लेखिका : सुश्री मृणालिनी चितळे ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆
पुस्तक : मेळघाटावरील मोहर : डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
लेखिका- मृणालिनी चितळे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत– 300 ₹
नागपूरसारख्या शहरात डॉ. होऊनसुद्धा तिथली भरपूर पैसे मिळवून देणारी प्रॅक्टिस सोडून मेळघाटातील आदिवासी लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी बैरागड ता. धारणी जि. अमरावती या अतिदुर्गम भागात जाऊन तिथेच स्थायिक होण्याचा निश्चय डॉ. रविंद्र कोल्हे यांनी घेतला आणि लग्न करुन आपली पत्नी डॉ. स्मिता यांना घेऊन ते बैरागड इथे दाखल झाले.
भारतामधील महाराष्ट्रातील एका कुठल्यातरी कोपऱ्यातील बैरागड गाव म्हणजे आपल्या देशात जेवढे म्हणून प्रश्न आहेत ते सर्व या गावात एकवटले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अत्यंतिक गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, हिंदू-मुस्लिम संघर्ष, जातीयवाद, भ्रष्ट सरकारी यंत्रणा, वनतस्करी अशा अनेक समस्यांचा सामना या बैरागडमध्ये अनुभवताना अनेक भलेबुरे प्रसंग कोल्हे पतीपत्नीवर आले. तरी याच गावात रहाण्याचा त्यांचा मनोदय वाचताना नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. डॉक्टर म्हणून आदिवासी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविताना या लोकांपुढील इतर समस्या जसजशा येऊन भिडल्या तसतसा त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी ‘जागल्या’ची भूमिका त्यांनी आपणहून स्वीकारली. या प्रत्येक समस्येविरुध्द आवाज उठवताना या पती-पत्नींना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण त्याचा बाऊ न करता ते अविरतपणे आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीतच राहिले. कित्येकवेळा जीवावर बेतण्याचे प्रसंगही उद्भवले.
… या सर्वच प्रसंगाचा लेखाजोखा लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. स्वतः डॉ. आणि कायद्याचे शिक्षणही घेतलेल्या स्मिताताईंनी तनमनधनाने बैरागडवासियांच्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या आपल्या पतीला पुरेपुर साथ दिली आहे. अत्यंत तुटपुंज्या कमाईवर संसार करताना त्यांचा कस लागत होता. पण एकदा हा वसा हाती घेतलाय म्हटल्यावर त्यांनी त्याचा विचारच केला नाही. अगदी गायी म्हशी पाळून गोठ्यातील स्वच्छता, धारा काढणे, ते दूध आणि घरी पिकवलेली भाजी कोणताही कमीपणा वाटून न घेता दारोदार जाऊन त्यांनी विकली,.. हे करीत असताना स्त्रियांच्या समस्या जाणून त्याविरुद्ध लढाही देत आहेत.
डॉ. रविंद्र यांनी डॉक्टर असूनही शेतीतील नविन तंत्रज्ञान आदिवासींना समजावून देताना स्वतः शेतीही केली. रेशन दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी रेशन दुकानही चालविले. वीटभट्टीचे कंत्राट घेतले. निवडणूक लढवून आपल्या अधिकारात गोंड आणि कोरकू समाजासाठी अनेक विकासाची कामे केली. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या कामासाठी परोपरीने सरकारला आवाहन करून आदिवासींच्या विकासासाठी कोल्हे पती-पत्नीने जीवाचे रान केले. त्याचाच परीपाक म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.
अत्यंत सुरेख पध्दतीने या दोघांच्या कार्याची माहिती लेखिकेने या पुस्तकातून दिली आहे.
‘मोहर’ म्हणजे कोणत्याही कामात, युध्दात पुढे असणारी व्यक्ती … मोहर म्हणजे सोन्याचे नाणे किंवा शिक्का,… मोहर म्हणजे तरुवरांवर येणारा फुलांचा गुच्छ …. म्हणूनच “ डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताताई म्हणजे या मेळघाटातील मोहर “ असे लेखिकेचे म्हणणे आहे …. आणि ते सार्थच आहे.
प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈