सुश्री गौरी गाडेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा” – लेखिका : डॉ. तारा भवाळकर ☆ परिचय – सुश्री गौरी गाडेकर

पुस्तक: लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा

लेखिका: डॉ. तारा भवाळकर

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ हा डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेल्या ‘ पुण्यनगरी ‘ च्या साप्ताहिक पुरवणीत व अन्यत्र प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे.

प्राचीन ते आधुनिक मानवी जीवनाला व्यापून राहिलेल्या समूहमनाच्या संचितात काळानुसार बदल होत असले, तरी त्यात आदिमतेपासूनच्या खुणाही शिल्लक असतातच. या बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे.

डॉ. तारा भवाळकर

ताराबाईंचं बालपण शहरी व ग्रामीण वातावरणात गेल्यामुळे चूल-पोतेरे, दळणकांंडण, ओव्या-शिव्या वगैरे ग्रामीण जीवनाचा, तसेच पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये, भजने-कीर्तने वगैरे पुण्यातील जीवनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीविषयी अकारण भक्तिभाव न ठेवता तटस्थपणे, चिकित्सकपणे त्यांनी या विषयांचा अभ्यास केला. समाजाच्या स्थितीगतीचा शोध घेताना लोकपरंपरांचा खूप मोठा खजिना त्यांना सापडला. त्याची ही ओळख.

माणूस म्हणजे देह, संवेदनशील व विकारशील मन आणि विचारशील मेंदू. या भावना, विकार, विचार आणि इतर वस्तुरूप पसारा म्हणजे संस्कृती. निसर्गाने अनुकूल व्हावे, म्हणून एक अज्ञात शक्ती निर्माण झाली, जी कल्पना पुढे विस्तारून देव निर्माण झाले. त्यांना अनुकूल करून घेण्यासाठी विधि- विधाने, उपासना प्रकार, गाणी, कथा, वाद्ये आली. त्यातून लोककलांचा उगम झाला.

पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची.

बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक मुद्दा असा की, शिक्षण म्हणजे केवळ लिहितावाचता येणे या धारणेला हादरे देणाऱ्या अनेक कथा, गीते, म्हणी, उखाणे, लोकसमज या अनक्षर समाजस्तरात विखुरलेले आहेत. स्त्रीच्या स्थितिगतीवर तथाकथित शिक्षित स्त्रीपेक्षा अधिक थेट व परखड भाष्य या अनक्षर स्त्रियांनी केले आहे.

जात्यावरची ओवी म्हणजे शुद्ध, प्राकृतिक, सहज, आपोआप मन मोकळं करण्यासाठी ‘झालेलं’ (‘केलेलं’ नाही) गाणं. बाईंच्या मते ‘चित्ताच्या विविध प्रबळ भावभावनांचा एकांतात अचानक झालेला उद्रेक म्हणजे कविता ‘ ही वर्ड्स्वर्थने केलेली काव्याची व्याख्या ओवीला तंतोतंत लागू पडते.

पुरुषप्रधान व्यवस्थेत मुलाला वरचा दर्जा असला तरी आईसाठी दोघं सारखीच. हे सांगताना एक अनक्षर बाई म्हणते,

“लेकापरीस लेक कशानं झाली उणी

एका कुशीची रत्नं दोन्ही. “

भारतीय परंपरेत स्त्रियांची प्रतिष्ठा पुरुषसापेक्षतेनेच मोजली जाते. त्यातूनच ‘अहेव मरण’, पुरुषांच्या सोयीसाठी देवदासी वगैरेंचा जन्म झाला.

सांगलीतील एका महिला संघटनेने साजरा केलेल्या विधवांच्या हळदीकुंकू समारंभाविषयी बाईंनी लिहिले आहे.

सौभाग्याची व्रते साजरी केली जात असताना एका समाजात ‘रांडाव पुनव’ साजरी केली जाते. यल्लम्माच्या जोगतिणी ‘वैधव्याचे व्रत’ करतात.

माघी पौर्णिमेला (रांडाव पुनम) त्या विधवा होतात. पुढे चार महिन्यांनी ज्येष्ठी पौर्णिमेला (अहेव पुनव) त्या पुन्हा सौभाग्यवती होतात. कारण त्या जिचं मानवी प्रतिरूप आहेत, त्या रेणुकामातेचा पती जमदग्नी याचा कार्ताविर्याने वध केला. पुढे चार महिन्यांनी पुत्र परशुरामाने त्याचा सूड घेऊन पित्याला जिवंत केले. म्हणून हे व्रत. पित्यासाठी एवढा आटापिटा करणाऱ्या परशुरामाने आईच्या पातिव्रत्यभंगाच्या नुसत्या संशयावरून पित्याच्या आज्ञेनुसार आईचा वध केला होता. ही कथा स्त्रीजीवनाच्या स्थितिगतीची आणि पितृप्रधान व्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याची सूचक आहे.

या वैधव्याच्या व्रताचे सांस्कृतिकदृष्ट्या मानववंशशास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे मातंगी (रेणुका) ही मूलतः भूदेवता. पिकांच्या कापणीनंतर वरील चार महिन्यांच्या काळात जमीन उजाड होते, नवनिर्मिती करू शकत नाही, म्हणजे विधवा होते. म्हणून तिचं प्रतिरूप असलेल्या जोगतिणी हे वैधव्याचं व्रत पाळतात.

या संदर्भात बाईंनी एक विचारप्रेरक प्रसंग सांगितला आहे. नागपूरच्या मातृमंदिर या स्त्रीसंस्थेच्या संस्थापक श्रीमती कमलाबाई हॉस्पेट यांनी आपल्या वैधव्याचा पन्नासावा वाढदिवस जाहीरपणे ‘साजरा’ केला. कारण त्यांना बालपणीच वैधव्य आल्यामुळे त्या इतक्या स्त्रियांना, अनाथ मुलांना आयुष्यात उभं करू शकल्या.

बहुपत्नित्व ही बायकांनाच बायकांचा शत्रू करणारी; पण पुरुषांना फायदेशीर अशी व्यवस्था होती. या संदर्भात बाईंनी, वेदांचे भाषांतरकर्ते म. म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या ऋग्वेद ग्रंथातील ‘सपत्नीनाशनसूक्तां’विषयी लिहिले आहे.

त्या लेखात बंगालमधील ‘सेंजुती व्रता’चाही उल्लेख आहे. त्या व्रताचा उद्देश ‘सवतीचं वाट्टोळं व्हावं’ हाच. ओवीप्रमाणेच स्त्रियांच्या व्रतातूनही स्त्री आपापसातच बोलते. ती कुटुंबातही व्यक्त होऊ शकत नाही.

‘पाऊस : साजिवंत सखा’ हे लेखाचे शीर्षकही अर्थपूर्ण, नादमय आहे. बाईंनी म्हटले आहे की ‘येरे येरे पावसा|तुला देतो पैसा|| ‘ हे लोकपरंपरेतले आणि लोकभाषेतले आद्य पर्जन्यसूक्तच आहे.

बाई म्हणतात की या लोककवयित्रींनी निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी मानवीपण बांधले आहे. उदा. ‘ईजबाईचं नर्तन’, ‘जिमिनबाई भरदार’,

‘धरतीच्या कुशीमधी, बीय बीयाणी रुजली|

वऱ्हे पसरली माटी, जशी शाल पांघरिली ||’

बाईंच्या मते लोकपरंपरेतल्या प्रकृतिसंवादी जगण्यातच चेतनगुणोक्ती ( अचेतनावर चेतनाचा आरोप करून केलेली रचना) असते. उदा. ‘जात्या तू ईसवरा, नको मला जड जाऊ|’

पण कविता म्हणून स्त्रियांच्या या साहित्याचा विचारच फार झाला नाही. त्या निसर्गाकडे आपल्याच अस्तित्वाचे प्राकृतिक रूप म्हणून नाते जोडतात.

यात नागपंचमीविषयी एक लेख आहे. नाग हे आदिपुरुषतत्त्व. बाप, भाऊ, पती-प्रियकर, पुत्र या नात्याने तो रक्षणकर्ता असतो. कधी तो कुळाचा, धनाचा रक्षक असतो. प्रियकर-पती म्हणून तो सर्जक पुरुषतत्त्व असतो.

गिरीश कर्नाड ‘नागमंडल’ या नाटकातून, शंकर पाटील ‘भुजंग’ या कथेतून नवीन अन्वयार्थ लावून, स्त्री-पुरुष संबंधांची गुंतागुंत उकलण्याचा प्रयत्न करतात.

दिवाळीच्या संदर्भात बाई लिहितात : पूर्वी धनत्रयोदशीला बायकांची अभ्यंगस्नानं असत. ती आता डिलिट झालीत. पुरुषांची नरकचतुर्दशी, भाऊबिजेची अभ्यंगस्नानं चालू आहेत. बायका फक्त इतरांची कौतुकं करण्यासाठी, ही धारणा पक्की.

हल्ली सजावट ‘रेडीमेड’ वस्तूंनी होते. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यापेक्षा आपण उत्तम दर्जाच्या, स्वस्त, आकर्षक वस्तू का निर्माण करू नयेत?

ऐतिहासिक दंतकथा व लोककथांविषयी बाई म्हणतात : भक्तिभाव बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे चिकित्सा केली, मानवशास्त्रीय वा पूरक अभ्यासशाखांच्या आधारे मागोवा घेतला, तर इतिहास संशोधनाच्या वाटाही समृद्ध होतील.

लोकप्रतिभा आपापला अनुभव देवादिकांवर, त्यांच्या स्थितीवर आरोपित करते. देवाला आपल्या जगण्याशी जोडून घेते. म्हणूनच

‘हळदीचं‌ जातं जड जातंया म्हाळसाला|

 संग आणली बाणाईला ||’

घरात कष्टाची कामं करायला हक्काचं माणूस म्हणजे लग्नाची बायको, हा परंपरेचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

जात्यावरची ओवी आपल्या जगण्याचे कालसंवादी आशय देव-देवतांच्या चरित्रात पाहते. एका काळाच्या सामाजिक स्थितीगतीचा, संस्कृतीचा, धारणांचा, देवतांचा, श्रद्धेचा, उपासनांचा मोठा पट या मौखिक साहित्यातून शोधता येतो.

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लोकसांस्कृतिक बैठकीवरून लोकदेवतांच्या संशोधनाच्या वाटा समन्वित अभ्यासपद्धतीने दाखवल्या आहेत. एका आदिम दैवताच्या उन्नतीकरणाची कथा त्यांनी त्यांच्या लोकसांस्कृतिक प्रातिभ दृष्टीने मांडली आहे. त्यांच्या मते देवताविषयक शोध हा त्या देवतेचा शोध नसून देवताविषयक मानवी -सामाजिक धारणांचा, मानवी श्रद्धाविश्वासाचा शोध असतो.

आदिम अवस्थेत पुरुष -देव व स्त्री -देवता स्व-तंत्रपणे नांदताना दिसतात. उपासनेत त्यांच्या नैमित्यिक भेटी उत्सवातून भक्त घडवीत असतात. मानवी जीवनात विवाहसंस्था स्थिर झाल्यावर आता त्या दूरस्थ देवतांचे विवाहसोहळेही भक्त साजरे करतात. लोकदेवतांच्या चरित्रांतून, ते ज्या समाजाचे देव आहेत, त्या समाजाच्या स्थित्यंतराचा सामाजिक/सांस्कृतिक इतिहास कळतो.

डॉ. ढेरे यांच्या सगळ्या ग्रंथरूप सांस्कृतिक शोधयात्रा या समाजाच्या सर्वांगीण स्थित्यंतरांचा शोध घेणारे, अंतर्दृष्टी देणारे प्रकल्प आहेत.

बडबडगीतांविषयी बाई म्हणतात : ‘अडगुलंs मडगुलं’पासून सुरू झालेल्या प्रवाहात नाच, गाणं, संवाद, चिऊ-काऊच्या गोष्टी, त्या सादर करण्याची नाट्यात्मक शैली यांचं अजब रसायन अनुभवत कित्येक पिढ्या वाढल्या. मायबोलीचा नाद ताल-लयीसह अवघ्या व्यक्तिमत्त्वात मुरत असे. मग आताच इंग्रजी ऱ्हाईम्स मुलांच्या माथी का मारल्या जातात?

‘इतिहासाचे जागले’ असलेल्या शाहिरांनी पोवाड्यांमधून, लोकगीतांतून वस्तुनिष्ठ नोंदींसह इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. समकालीन लोकमन, चालीरीती, रूढी, क्रिया-प्रतिक्रियांतून व्यक्त केलेले लोकमन आणि लोकमत प्रवाही ठेवले.

लोककथा हा माणसांच्या चित्रविचित्र वृत्ती-प्रवृत्तींचा सतत वाहता प्रवाही खजिना आहे. काळ, प्रदेश, भाषा कोणतीही असली, तरी मानवी जीवनाचे नमुने सर्वत्र समान असतात. त्यामुळेच देशविदेशातील कथांतून सारखेपणा आढळतो.

‘सहा शब्दांच्या कथा’ या लेखात बाईंनी, बोलीभाषेतील म्हणी म्हणजे अल्पाक्षरी कथाच आहेत, हे सांगितलं आहे. उदा. ‘अग अग म्हशी, मला कुठे नेशी |’, ‘अति झालं देवाचं, कपाळ उठलं गुरवाचं|’, ‘ कोडग्याला हाणलं पिढं (पाट), म्हणतं बसायला दिलं|’, ‘ काग बाई अशी?, तर शिकले तुझ्यापाशी|’ वगैरे. परंपरेतल्या अनुभवांचं खूप मोठं संचित यांत साठलेलं आहे.

”अशी’ ही एक ‘सती’ ‘ : १८६४ साली ‘थोरले माधवराव पेशवे ‘ या नाटकाचे प्रयोग होत असत, तेव्हा गावातल्या स्त्रियांच्या झुंडीच्या झुंडी नाटकास येऊन ‘सती’ जाणाऱ्या रमाबाईंची (स्त्रीपार्टी नट विष्णू वाटवे) ओटी भरत असत. हे ओट्या भरणं आणि नंतर खण, तांदूळ, नारळ साठवणं, यातच तास – दोन तास जात असत. याचा निष्कर्ष सांगताना बाई म्हणतात, ‘लोकसंस्कृतीच्या प्रवाहात असेही एखादे श्रद्धेचे डबके लोकमनात साचून राहतेसे वाटते. ‘

‘असे प्रेक्षक, अशा जाहिराती’ या लेखात १८५३ ते १८७३ या काळातील नाटकांच्या जाहिरातींविषयी बाईंनी लिहिले आहे.

त्यात नाटकात ‘उत्कृष्ट सिनरी’, ‘सूर्य, चंद्र, तारे, ‘ ‘बागेचा देखावा, व्याघ्राने धरलेली स्त्री, विमान, वारांगनांचा ताफा, ‘ तसेच ‘नारायणरावाच्या वधाचा फार्स’ दाखवताना त्याचे पोट फाडून साखरभात व आतडी हुबेहूब दाखवू’ वगैरे आमिषे असत. त्याबरोबर, ‘ खेळाच्या जागी तंटा करायला, विडी ओढायला, पान खाऊन थुंकायला मनाई आहे’, ‘कमी प्रतीचे तिकीट घेऊन जास्त प्रतीचे जागी जाणाऱ्यास पैसा न देता बाहेर घालवले जाईल’ असा सज्जड दमही असे. याचं तात्पर्य बाई सांगतात : ‘जाहिरात हे केवळ प्रसिद्धीचे साधन नसून सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितिगतीचा वेध घेण्याचे साधनही होऊ शकते. ‘

‘इडिपस कॉम्प्लेक्स’विषयीच्या लेखात बाईंनी इतिहास संशोधक श्री. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे. या सखोल, संशोधनपर ग्रंथात शतरूपा आणि तिचा पिता वसिष्ठ, मनू आणि त्याची कन्या इला, जह्नू आणि त्याची कन्या जाह्नवी, सूर्य आणि त्याची कन्या उषा ऊर्फ सरण्यू यांच्यात पतिपत्नीसारखे संबंध होते. नैसर्गिक नर-मादी आकर्षणाचा हा भाग होता. पुढे संस्कृतीच्या प्रवासात नर-मादीचे मुक्त लैंगिक संबंध प्रतिबंधित केले गेले. माता-पुत्र, पिता-कन्या, सख्खे भाऊ-बहीण या नात्यांत लैंगिक संबंध निषिद्ध मानले गेले.

मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’ या पुस्तकात डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसंस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांवर अभ्यासपूर्ण, तरीही सोप्या भाषेत विवेचन केलेले आहे.

वाचकांनी ते मुळातूनच वाचल्यास, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नक्कीच विस्तारित होतील.

परिचय –  सुश्री गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments