सुश्री वीणा रारावीकर
पुस्तकावर बोलू काही
☆ चुटकीभर गंमत – लेखिका : डॉ. मृण्मयी भजक ☆ परिचय – सुश्री वीणा रारावीकर ☆
पुस्तक : चुटकीभर गंमत
लेखिका : डॉ. मृण्मयी भजक
पृष्ठ संख्या – १४७
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
किंमत – रुपये २००
जेव्हा आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो. त्याला काही खास कराण नसतं. त्यावेळी काही करायची इच्छा नसते. कोणाकडून उपदेशाचे डोस, तत्वज्ञान ऐकायचे किंवा वाचायची इच्छा नसते. फार काही मानाविरूद्ध झालेल नसतं आणि ९० च्या दशकातील तीच तीच गाणी युट्बुवर ऐकून अजून बोअर व्हायच नसतं, तर काय कराल? कोणतं पुस्तक हाती घ्याल? तर माझ उत्तर आहे “चुटकीभर गंमत”. कारण नावाप्रमाणेच चुटकी मारून गंमत आणणारे पुस्तकातील छोटे छोटे लेख. डोक्याला ताप न देणारे, हलके-फुलके लेख. कोणतेही पान उघडावे आणि एखाद-दुसरा लेख वाचून आनंद घ्यावा आणि आपल्या पुढच्या कामाला लागावे. गंमत ही भाजीतल्या मीठ-साखरेच्या प्रमाणासारखीच असते. नाही तर मग ती कुस्करीची मस्करी व्हायला वेळ लागत नाही. असो. रोज येता जाता सहजपणे दोन-चार लेख वाचून पुस्तक संपवाव असं हे पुस्तक. या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉ. मृण्मयी भजक. एकूण ५० ललित लेख यात आहेत. या लेखांत प्रामुख्याने प्रसंगचित्रे आहेत. नव्या जुन्या विचारांचा, आठवणींचा संगम आहे.
आपल्यापैकी कदाचित काही लोकांना डॉ. मृण्मयी भजक या माहित असतील. या लेखिकेला आपण डीडी सह्याद्री या वाहिनीवर ‘सखी सह्याद्री’ आणि ‘हॅलो सह्याद्री’ या थेट प्रेक्षपण असणार्या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांची मुलाखत घेताना पाहिले असेल. शिक्षणाने होमिओपॅथी डॉक्टर. काही वर्षे होमिओपथी तज्ञ म्हणून काम केले आणि आता निवेदन, सूत्रसंचालन, एकपात्री प्रयोग, आकाशवाणी पुणे येथे उद्घोषक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेल्या मृण्मयीचे लेखन क्षेत्रातही वाखाणण्याजोगे काम आहे. वृतपत्रीय लेखन आणि अमेरिका खट्टी-मीठी आणि चुटकीभर गंमत ही तिची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाची प्रतिभा, निरक्षण, आकलन आणि कल्पना शक्ती नेहमीच इतरांपेक्षा वेगळी असते. म्हणून त्यांच्या हातून साहित्याची निर्मिती होते. लेखिकेचे लेख याचा प्रत्यय आणून देतात आणि त्याचबरोबर तिने काढलेले निष्कर्ष वाचून आपण विस्मयचकीत होऊन जातो. तिला कोणत्याही गोष्टीवरून लेखनासाठी विषय सुचतात. म्हणजे घरात काढून ठेवलेले जुने कपडे, स्वयंपाकघरातील भांडी, कोणाच्या घरी गेल्यानंतर न उघडणारे बाथरूमचे दार, डोक्याला चोपडलं जाणार तेल, चहा इत्यादी इत्यादी. कदाचित लेखाचे विषय साधे असतील परंतु त्यावरून काढलेले तर्क मनात सहज रेंगाळत रहातात.
या पुस्तकाला जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेतील वाक्यांचा पुस्तक वाचताना प्रत्यय येतो आणि मनोगत वाचल्यानंतर पुस्तकाचे नाव असे का ठेवले आहे हे समजतं. सध्याच्या आयुष्यात आपण काय हरवून बसलो आहे? पुस्तक वाचल्यानंतर याची खात्री पटते. विजयराज बोधनकर सरांनी अतिशय चपखल मुखपृष्ठ काढलं आहे. एका स्त्रीच्या खिडकीतून दिसणारे जग आणि त्या खिडकीत असलेली फुलपाखरे. फुलपाखरांसारखे सुंदर, छोटे लेख, तरीही उडून न जाणारे मनात घर करून रहाणारे.
गंमत हा किती लेखांच्या शीर्षकामध्ये आला आहे, याचा गंमत म्हणून वाचकांनी एक डाव खेळावा. अशी लेखांची शीर्षके. ‘आमची खिडकी न अश्शीच उघडते’ लेखाचे असे गंमतीशीर नाव वाचून लेख नककीच वाचावासा वाटतो.
त्रिकोणी पोळी का आठवायची आणि ठिपक्यांची सममितीमधीलच रांगोळी काढायची का दुसर्या नक्षीदार आकाराची रांगोळी? असे प्रश्न समोर मांडत लेखांना सुरवात होते.
‘वाढदिवसाला स्वतःच स्वतःला भेटवस्तू द्यायची’ अशा प्रकारची एक संकल्पना तिने ‘गिफ्ट आगळंवेगळं’ या लेखात मांडली आहे.
‘नाच ग घुमा’ या लेखातील सुप्रिया ‘नाचू मी कशी?’ असं म्हणत नाचायला उठते का ते वाचकांनी वाचून बघावे.
‘तुला एवढंही कसं जमत नाही’, असं आपण लहान मुलांना बोलतो, तेव्हा गरज असते त्यांच्या जागी जाऊन पहाण्याची, त्यांच्या विश्वात जाऊन अनुभव घेण्याची.
आपण एखादी गोष्ट कोणाला तरी आवडत नाही, म्हणून त्याचा त्याग करतो का? मग त्यात आवडत्या रंगाचे कपडे किंवा एखादी आवडती डिश किंवा एखाद्या शैलीतील सिनेमा किंवा नाटक काहीही असेल. असे घडण्याचे काही खास कारण असते का? एखादी घटना घडून गेल्यानंतर काही वर्षांनी आपण ती घटना विसरून जातो आणि त्याच्या बरोबर चिकटलेल्या नकारात्मक भावना वर्षानू वर्षे मनात साचवून पुढे जात असतो. यासाठी ‘हा रंग मला शोभत नाही’ हा लेख प्रपंच.
शेवटच्या लेखाचे नाव आहे ‘शेवटचं पान’. शाळा-कॉलेजमध्ये असताना शेवटच्या बाकावर बसून वहीच्या शेवटच्या पानावर प्रत्येकाने काय केलं, ते जरूर आठवा.
आपल्याही रोजच्या आयुष्यात साधे-सुधे प्रसंग येत असतात. लेखकाच्या नजरेतून असे प्रसंग, घटना बघायला, वाचायला शिकलं पाहिजे. हे लेख वाचून दैनंदिन जीवनातील घटनांकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन लाभेल.
आता तुम्ही हे ही विचाराल की काही लेखांचा परिचय दिलात, इतर लेख कोणते आहेत? हिच तर एक गंमत आहे. तुम्ही सर्वांनी पुस्तक वाचून त्यातील आनंद घ्या.
परिचय : वीणा रारावीकर
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈