प्रा. भरत खैरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ हुंदक्यांचा गाव (कविता संग्रह) – कवी : श्री नरेंद्र वानखेडे ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆
पुस्तक : हुंदक्यांचा गाव ( कवितासंग्रह )
कवी : नरेंद्र सीताराम वानखेडे
साधा भोळा भाव “हुंदक्याचा गाव”…
“अनुभवाचा वेचा” ह्या पहिल्या काव्यसंग्रहानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी “हुंदक्याचा गाव “हा नरेंद्र सिताराम वानखेडे ह्या कवीचा काव्यसंग्रह आपल्या भेटीस आला आहे. पहिल्या काव्यसंग्रहाच्या वेळी थोडीशी बाल स्वरूपात असलेली कविता दुस-या संग्रहात पोक्त झाल्यासारखी वाटत आहे.
“हुंदक्यांचा गाव” मध्ये एकूण ८६ कविता आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला मित्रवर्य भरत खैरकर यांनी “अनुभवाचा वेचा”साठी लिहिलेला छोटेखानी अभिप्राय आहे.. त्यानंतर गजानन दिगंबर संगेकर ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना व कवीचं मनोगत आहे.
महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणात काम करणारा हा कवी.. वेळ मिळेल तसा आपला गाव.. तिथली माणसं.. परिसर.. ऑफिस.. व्यक्ती.. नातेवाईक.. श्रध्दास्थानं.. इत्यादी सह जगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.. त्यामध्ये जे काही त्याला सुचतंय.. दिसतंय.. किंवा रुचतंय.. ते सारं त्यानं जमेल तसं कवितेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
भौतिक सुखाला सुख समजण्याच्या वृत्तीमुळे माणसाला सुख मिळत नाही त्यातून तो प्रचंड निराशेच्या आहारी गेला आहे. असं कवीच ठाम मत आहे. मनुष्य हीच जात मानणारा हा कवी आहे. त्याला “वसुधैव कुटुम्बकम” असावं असं वाटतं. माणसाला काय हवं हे सांगत असताना तो प्रेमाचा भुकेला आहे. पाहुण्याला गडवाभर पाणी.. भिक्षुकाला भाकरी चटणी.. घायाळाला घोटभर पाणी.. एवढं “हवं आहे” असं त्याचं म्हणणं आहे.
अलीकडे रात्रीला अंगणात चांदणं पडत नाही ,ही खंत कवीची आहे. संग्रहातला कवी एकदम प्रामाणिक साधा भोळा सोबतच देवभोळाही आहे. इथेच करा इथेच भरा हा निसर्गाचा न्याय असं त्याचं म्हणणं आहे.. नव्हे ती वाचकाला समज आहे. स्वप्न आणि कष्टाचं नातं सांगताना स्वप्न आनंदी ठेवतात व कष्ट जिवंत ठेवतात असं त्यांचं म्हणणं आहे.
काव्यसंग्रह वाचताना ‘ चार कडव्याचीच कविता असते. ‘असं जणू कवीचं मत असावं असं वाटून गेल्याशिवाय राहत नाही.. कारण बऱ्याचश्या कविता ह्याच पठडीतल्या आहे.. जास्त कविता लिहिण्याच्या नादामध्ये.. एका विशिष्ट चाकोरीत अडकल्याचे आपण कवीला बघतो..
बहिणाबाईची जवळीक साधू पाहणारी “अरे संसार संसार.. कधी चढ कधी उतार” ही कविता आपण येथे वाचू शकतो. पैशामागे लागलं तर काय होऊ शकतं हे सांगताना “खूप धावू नको पैशासाठी.. समाधान ठेव काही सुखासाठी” असा सल्ला कवीचा आहे. १९८०च्या दशकातलं ग्रामीण जीवन ” जुनी श्रीमंती ” ह्या कवितेतून कवीने मांडली आहे. दिव्याखाली अभ्यास करणाऱ्यांचा तो जमाना आणि ती श्रीमंती किती मस्त होती! हे कवी या ठिकाणी दाखवून देतो. “बाप बोलतो” ही कविता बापाचं कुटुंब.. मूल.. पोरंबाळ.. त्यांचं शिक्षण.. त्यांची सुरक्षा.. त्यासाठी धडपडणार जीवन मांडत. तर “मुलास उद्देशून” ही कविता मुलाने बापजाद्याची परंपरा चालविली पाहिजे.. हे सांगताना “बापाच्या धनाभोवती मारू नको गुंडाळी”… तुझं जगणं तू जग.. असा सल्ला मुलाला देतो.. वाचकाला मिळतो. आई.. बाबा.. मुलं.. गाव.. नातेवाईक.. ऑफिसचे कर्मचारी.. इत्यादींमध्ये रमणारा कवी कुटुंब वत्सल वाटतो.. आईच्या व बापाच्या कष्टाची कदर असलेला कवी आपल्याही मुलाने तोच वारसा सांभाळावा ही आशा बाळगतो..
कवी जलसंधारण विभागात काम करत असल्याने थेंब थेंब पाण्यासाठी त्याचा जीव तळमळतो आहे.. त्यातून जलबचतीचे भान कुणालाही उरलं नाही आणि गाय व माय कशी पाण्यासाठी रानोरान भटकते आहे. हे वाचून वाचकाच्या डोळ्यात पाणी येत!
“आठवणीतले दिवस “जगत असताना कवीला बाल मैत्रिणी आठवते.. अजून मुलाबाळासाठी झटू नकोस.. स्वतःसाठी जग.. कशाला धरतेस पंख पाखरांचे.. उडू दे त्यांना.. त्यांच्या आकाशात.. कशाला बघतेस जुनी राजा राणीची चौकट असलेला फोटो.. जिंदगी फक्त चार पावले शिल्लक आहे.. हे लक्षात ठेव.. हे सांगणारा कवी अजूनही बालमैत्रिणीला विसरला नाही हे दिसतं! आपल्या सजनासाठी सजलेल्या “नवल परी”ला चार प्रश्न कवी विचारतो,तिही कविता फार छान झाली आहे.
आपल्या चिमुकल्या मुलीचं.. लेकीचं हळूहळू किलबिलत.. प्रौढ होणं.. तिचं बापाला लळा लावणं.. हे सारं आठवून कवी लेकीचं महत्त्व विशद करतो. संकटाच्या काळी कोणीच मदतीला येत नाही, ही लोक त-हा कवी लागोपाठच्या “हात सैल होताच” व “नजरेत आले “ह्या कवितेतून मांडतो.
मधेमध्ये गझल सदृश कविता लिहिण्याचा प्रयत्न कवीने केला आहे. मात्र अभ्यास कमी पडल्याने कवितेला पाहिजे तसा उठाव दिसत नाही.. तुत्यारी मधून बैलाच दुःख मांडणारा कवी प्राणीमात्रावर प्रेम करा हे शिकून जातो. निवृत्तीच्या वयात आलेला कवी ऑफिस मधील पीएफ आणि निवृत्तीनंतरची उलघाल दोन-तीन कवितेत मांडताना दिसतो. ” युद्धावर उत्तर फक्त बुद्धच आहे. ” असं ठाम मत कवीच आहे. सोबतच बाबासाहेब.. गौतम बुद्ध.. रमाई.. महात्मा फुले.. प्रजासत्ताक.. संविधान आणि देशप्रेम.. यांच महत्त्वही कवीने इतर कवितातून विशद केलं आहे.
कवीच्या गावाजवळ असलेल्या पारडसिंगा येथील सती अनुसया मातेचे महात्म्य कवीने नेमक्या शब्दात मांडलेल आहे. सोबतच सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित मृत्यूनंतरचा विरह ” सिंधुमाई ” कवितेत कवीने मांडला आहे.. केवळ “मुठभर फुलांचा धनी” व्हावं एवढीशी आशा कवीला आपल्या जगण्यातून आहे… कवी स्वतःला खूप मोठा मान्यवर किंवा थोर समजत नाही.. ह्यातूनच.. कवीच साधं जगणं आणि आजूबाजूच्या भोवतालाशी समरसून जाणं लक्षात आल्यावर ” हुंदक्यांचा गाव “मधली कविता इतकी साधी.. सहज.. सोपी.. आणि भोळीभाबळी कां आहे ? हे वाचकाला समजून येतं.. थोडा इतर कवितांचा अभ्यास वाचन व वैचारिक व्याप्ती वाढवल्यास पुढच्या कविता अधिक चांगल्या व वाचकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. कवीला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा..
परिचय – प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈