प्रा. भरत खैरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ बालमनाचा शोध घेणाऱ्या नाट्यछटा – लेखिका : सुश्री रेश्मा संतोष चव्हाण ☆ परिचय प्रा. भरत खैरकर ☆
पुस्तक : बालमनाचा शोध घेणाऱ्या नाट्यछटा
कवी : सुश्री रेश्मा संतोष चव्हाण
नुकतचं एक छोटेखानी पुस्तक वाचण्यात आलं.. “मलाही काही सांगायचयं… ” सौ. रेश्मा संतोष चव्हाण ह्या शिक्षिकेचं हे नाट्यछटेचं पुस्तक.. हाती घेतल्यावर वाचकाला त्याच्या बालपणात घेऊन जातं.. एका दमात वाचून काढल्याशिवाय राहवत नाही..
दिवाकरांची “बोलावणं आल्याशिवाय नाही.. ” ही नाट्यछटा वाचून प्रोत्साहित.. प्रेरित.. झालेल्या लेखिकेने अशा अनेक छोट्या छोट्या नाट्यछटा लिहून वाचकाला अगदी खिळवून ठेवले आहे.. छोट्या वीस नाट्यछटा ह्या पुस्तकात आपण वाचू शकतो..
” फ्रेंडशिप डे” मधून लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखविलं आहे.. मित्रांबद्दलचे लहान मुलांचे विचार आणि मोठ्यांमधला फ्रेंडशिपडेचा उत्साह याची छान तुलना ह्या नाट्यछटेत आहे.. “घरातला भ्रष्टाचार” नावाची नाट्यछटा, छोट्या मोठ्या कामासाठी आपण कसे पॉकेट मनी मागतो किंवा हलक्याफुलक्या कामासाठी कशी घरातली मंडळी एकमेकांना वापरते.. लहानांना वापरतात.. हा एक भ्रष्टाचारच आहे. असं काहीसं मजेशीर वर्णन आपण ह्यात वाचू शकतो..
पंढरपूर आळंदी सारख्या ठिकाणी गेल्यावर मंदिराच्या बाहेरील गंध लावणारी मुले आणि त्यांचे भाव विश्व “देवाचं गंध” ह्या नाट्यछटेत आपण वाचू शकतो..
ह्या मुलांचा प्रामाणिकपणा आणि अगतिकतेतून आलेली गंध लावायची वेळ आपणास हेलावून सोडते.
“कचरा उचलणारी मुलं” बघितल्यावर त्यांच्याहीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं सांगत त्यांचं बालमन कसं शाळेच्या गेटवर उरलेल्या छोट्या पेन्सिलचे तुकडे.. रबराचे तुकडे.. डब्यात ही मुलं जमा करतात व शाळेशी संबंध प्रस्थापित करतात असं काहीसं मन हेलावणार “मलाही खूप शिकायचं” ही नाट्यछटा सांगून जाते.
“मी बोलतोय डोमकावळा” ही नाट्यछटा तर मनुष्याच्या जीवनात असलेलं कावळ्यांचं महत्व वाचकाला समजावून देते. वर्षश्राद्धांच्या दिवसांमध्ये पितृपक्षात कशी आमची मौज असते हे कावळ्यांच्या तोंडून ऐकण्याची मजा औरच आहे.. ” दाराचे कुलूप” ही नाट्यछटा आधुनिक कुटुंब व त्यात होणारी मुलांची घुसमट आपणांसमोर मांडते.. कॉम्प्युटर गेम आणि कॅंडी क्रश मध्ये अडकलेल्या मुलांना.. कुलूप बंद दाराआड पालक कसे गुंतवतात.. हे वाचून मन विषण्ण होते.
” मुलीसारखं जगू दे” या नाट्यछट्टेमध्ये एका मुलीनंतर आपल्याला मुलगा पाहिजे होता तरी मुलगीच झाली म्हणून अट्टाहासापोटी त्या मुलीला मुलाचा पेहराव आणि मुलांसारखं चालचालन शिकविणारी आई व ती मुलगी यांचा संघर्ष दाखविला आहे..
” समजूतदार” असण्याचे किती तोटे असतात हे सांगताना छोटी मुलगी आपला सगळेजण कसे वापर करतात तरीही ते आपणास किती छान वाटतं! हे तिचं बालमन वाचकांशी बोलतं. ” मोर नाचतो मनी” ही पौगंडावस्थेत असलेल्या.. आलेल्या.. मुला-मुलीचं भावविश्व सांगणारी सुंदर अशी नाट्यछटा आहे. ह्यामधून लेखिका विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जपणारी.. जाणणारी.. आहे हे लक्षात येतं.
” मधली सुट्टी” मध्ये बाईसोबत डबा खाण्याची कशी मज्जा असते.. शिवाय त्याक्षणी बाई.. वर्गातल्या बाई पेक्षा कशा वेगळ्या असतात! हे विद्यार्थी- शिक्षिकेचं नातं.. शब्दापलीकडचं आहे हे सांगून जातं. ” वृद्धाश्रम” ही अजून एक नाट्यछटा.. ज्या मुलांना अनाथाश्रमातून आणलं.. त्यांनीच आपल्या बापाला वृद्धाश्रमात ठेवावं हे दुर्दैव मांडणारी आहे..
” लग्नाला नको ग बाई” मधील मुलगी मोठ्यांच्या मध्ये फसल्यावर तिला तिच्या आवडीच्या.. बाजूच्या गोष्टी करता येत नाही.. ते दुःख याठिकाणी व्यक्त करते. ‘हे नको करु.. ते नको करू’ असे सांगणारे पालक तिच्या मनाचा विचार करत नाही हे मांडलेले आहे.
” येळ नाय मला” मधल्या एका कामवालीचा तोरा बघण्याजोगा आहे.. ती किती बिझी आहे हे फारच छान पद्धतीने लेखिकेने वर्णन केलेला आहे.. तिचा बाज आणि ठसका व्यवस्थित सांभाळण्यात आला आहे. ” सायंटिस्ट व्हायचं मला” ह्या नाट्यछटेत ‘काड्या करणाऱ्या मुलाचं’ वर्णन आहे.. कुकरच्या शिट्टीला फुगा लावून तो फुगवायचा.. अशी अफलातून सायंटिफिक आयडिया त्याच्या डोक्यात येते.. ती वाचून वाचक चकित होतात!
” माऊली” नावाची शेवटची सायकल रुपी नाट्यछटा मुलांना आपल्या वस्तूची देखभाल कशी करावी.. हे शिकून जाते..
एकूणच ह्या पुस्तकांमध्ये आलेल्या सर्वच नाट्यछटांची भट्टी एकदम मस्त जमली आहे.. लेखिकेने पंधरा ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा विचार करून लिहिलेल्या ह्या नाट्यछटा खरंच वाचनीय आहे.. वाचकाला त्या आपल्या बालपणामध्ये फिरवून आणतात.. बालपणात घेऊन जातात.. हे पुस्तक सर्व प्राथमिक.. माध्यमिक शाळांमध्ये असावे इतके सुंदर आहे.. मुलांकडून जर ह्या नाट्यछटा करून घेतल्या तर.. बऱ्याच अंशी “संस्कार” व “शिकवण” देण्याची ताकद ह्यात असल्याचं लक्षात येईल.. लेखिकेला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
परिचय – प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈