सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “माणुसकी” – लेखिका : डॉ. शैलजा करोडे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक : माणुसकी
लेखिका : डॉ. शैलजा करोडे
प्रकाशक – अभिनंदन प्रकाशन
पृष्ठे – १३२, मूल्य – २९०
‘माणुसकी’ हा शैलजा करोडे यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. साधी, सोपी भाषा, छोटी छोटी वाक्ये, त्यातून आलेली गतिमानता, हे या कथासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या कथांच्या पोटात काय नाही? त्यात अनुभव कथन आहे. आपले आणि इतरांचेही अनुभव वर्णन यात आहे. यात प्रसंग वर्णन आहे. विचारमंथन आहे. व्यक्तिचित्रण आहे. प्रबोधनही आहे. यातल्या सार्याच कथा संस्कारक्षम आहेत.
डॉ. शैलजा करोडे
लेखिकेला वाटतं, की आजचं युग गतिमान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, इलेक्ट्रिकल उपकरणे, मोबाईल, कॉँप्युटर, फेस बुक, ट्विटर, इंस्टाग्रॅम यामुळे क्रांती झाली. जग हाकेच्या अंतरावर आलं, पण मनाने मैलोगणती दूर गेलं. भ्रमण ध्वनींचे मनोरे शेजारी, पण या हृदयीची रेंज त्या हृदयी मिळेना. फेसबुकवर हाजारो मित्र, फॉलोअर्स असतानाही माणूस एकटाच राहिला. पण नात्यातील, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी झाला, हा आशय त्यांच्या अनेक कथांमधून येतो.
लेखिका आपली मते, विचार व्यक्त करते, पण तिचे लेखन आग्रही नाही. तिची भूमिका तडजोडीची आहे. दुसर्या व्यक्तीला समजून घेण्याची आहे.
‘वारी’ ही यातली पहिलीच कथा. लेखिकेने यातून आजोबांचं व्यक्तिचित्र उभं केलय. त्यांची देवपूजा, त्यांचा नेमधर्म, त्यांचा स्वभाव, सुनेला मुलगीच मानणं, त्यांची विठ्ठल भक्ती या तपशीलाबरोबरच त्यांचं माळकरी असणं, दर एकादशीला पायी वारीला जाण्याचं नेम ही माहिती येते. यंदा त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे, त्यांनी वारीला जाऊ नये, असं घरच्यांना वाटतं, पण अजोबा आपला नेम मोडायला तयार नाहीत. म्हणून त्यांच्याबरोबर त्यांची शाळकरी नात मुक्ता आणि त्यांचा थोरला मुलगा सुधाकर जातात. आजोबा वारीत रमतात. आजारी पडतात. डॉक्टर त्यांना घरी परतायला सांगतात. ते ऐकत नाहीत. विठ्ठलाच्या दर्शनाने त्यांना धन्य धन्य वाटतं. पुढे काय होतं? त्यासाठी करायलाच हवी, ‘वारी’ची वारी.
‘खिडकी’ ही लेखिकेला नवनवीन भावविश्वात घेऊन जाणार्या मैत्रीणीसारखी वाटते. ‘खिडकी’तून समोर, डावी-उजवीकडे दिसणार्या दृश्याचं, रस्त्यावरील वर्दळीचं तपशीलवार, वास्तव वर्णन केलय. एकदा ती खिडकीत बसलेली असताना तिची नात तिथे येते. आजीबरोबर तीही खिडकीत बसते. त्यावेळी खालून एक वरात जात असते. ‘हे काय आहे?’ नात विचारते. ‘वरात’ आजी उत्तर देते. ‘म्हणजे काय? नातीचा प्रश्न. आणि पुढे आजीच्या प्रत्येक उत्तरावर नातीचा प्रश्न तयार असतो. शेवटी आजी निरुत्तर होते. अशीच प्रश्नोत्तरे खालून जाणार्या मोर्चाबद्दल होतात. आजीचे आणि नातीचे हे संवाद इतके बहारदार झाले आहेत, की प्रत्यक्ष वाचूनच त्यातली मजा अनुभवायला हवी. लॉक डाउननंतर मात्र समोरचा वर्दळीचा रस्ता शांत शांत होतो. पण या काळात रस्त्यावरून तुरळकपणे कामासाठी जाणार्या व्यक्तींच्या माणुसकीचेही दर्शन घडल्याचे लेखिका सांगते.
‘श्रीमंती’ ही सुनंदा आणि मानसी या दोन मैत्रिणींची कथा. एका कार्यक्रमासाठी मानसी, सुनंदाच्या गावात आलीय. कार्यक्रमानंतर सुनंदा, मानसीला आग्रहाने आपल्या घरी ठेवून घेते. तिची नातवंडे, ‘आजी… आजी.. ’ म्हणत मानसीच्या मागे लागतात. गोष्टी सांगण्याच आग्रह धरतात. त्यांचं लडिवाळ वागणं मानसीला आनंद देऊन सुखावून जातं. तिला वाटतं, सुनंदा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, कारण मानसीचा मुलगा, नातवंडे परदेशात आहेत. पण एक दिवस असा उगावतो, की मानसीला जाणवतं, आपल्यालाही सुनंदाच्या श्रीमंतीच्या पंगतीत स्थान मिळालय, ते कसं ? यासाठी ‘श्रीमंती’ ही कथाच वाचायला हवी.
माणुसकी’ ही लेखिकेची गाजलेली कथा. कथानायकाचे वडील वारलेले होते. सोसायटीच्या अपार्टमेंटच्या समूहावर त्यांनी वडलांच्या निधनाचे वृत्त टाकले. त्यावर सगळ्यांचे व्हाट्स अप ग्रूपवरून शोकसंदेश आले. प्रत्यक्ष भेटायला, किंवा अंत्येष्टीसाठी मदत करायला कुणीच आले नाही. अनेकांच्या फ्लॅट्समधे जाऊन त्यांनी अंत्येष्टीसाठी मदत करायची विनंती केली, पण सगळ्यांनी वागवेगळी कारणे सांगत आपण यायला असमर्थ आहोत, असे संगितले. दुपारी बाराच्या सुमाराला वडील गेलेले. रात्रीचे नऊ वाजत आले बाहेर मुसळधार पाऊस, पण अद्याप, अंत्येष्टीची व्यवस्था झाली नव्हती. शेवटी मनाचा निग्रह करून ते समोर भाजी विकणार्या संतोषकडे गेले. त्यांचा कापरा, आर्त स्वर आणि अवरुद्ध शब्द ऐकून संतोषने विचारले, ‘काय झालं?’ त्यांनी वडील गेल्याचे व त्यांची अंत्येष्टी करायला कुणाचीच मदत मिळत नसल्याचे सांगितले. संतोषने त्यांना धीर दिला. मित्रांना फटाफट फोन केले. अंत्येष्टीचं साहित्य घेऊन यायला सांगितलं. त्यांच्या सहकार्याने वडलांची अंत्येष्टी झाली. ते पैसे देऊ लागले, पण संतोषने ते घेतले नाहीत. म्हणाला, ‘तुमचे बाबा, आमचे बी बाबाच की! शेवटी काय असतं दादानू, माणूस मरतो हो, माणुसकी नाही. ’ आणि त्यांना प्रत्यय आला, की या आभासी जगात कुठे तरी माणुसकी अजूनही शिल्लक आहे.
‘भावबंध’मध्ये एका गोसाव्याचं वर्णन आहे. भगवी वस्त्रे घातलेला, कपाळाला, दंडाला भस्म लावलेला, एका हातात कटोरा, दुसर्या हातात मोरपीसाचा झाडू, असा गोसावी आला, की मुले त्याच्या अवती- भवती जमा होत आणि तो मुलांच्या डोक्यावरून मोरपिसाचा झाडू फिरवे. मुलांना गंमत वाटे. असेच भावबंध, दही-ताक विकणार्या सावित्रीशी आणि चिवडा विकणार्या मदनलालशी आहेत. तो मुलांना दिवाळीत चिवडा आणि फटाके देतो, तर आई त्याला फराळाचे देते. ही संग्रहातील एक चांगली कथा आहे. ‘अनोखं वाण’ मधील नायिका कोणतं ’अनोखं वाण’ देते, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं. ‘जनरेशन गॅप’ मधे लेखिका म्हणते, ‘एकमेकांना समजून घेतलं, प्रत्येकाच्या मनाचा आदर केला, नव्या-जुन्याचा मेळ साधला, तर ‘जनरेशन गॅप’ रहाणारच नाही. आपल्या सासुबाईंनी दोन्ही पिढ्यातला सांधा कसा सांधला, याचं सुरेख वर्णन यात केलय. असंच दुसर्याला समजून घेण्याचा भाग ‘पार्सल’ या कथेतही दिसतो, मात्र इथला वाद दोन पिढ्यातला नाही, तर पती-पत्नीमधला आहे. परस्परांबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करताना वाद होतो, तशी तडजोडही दोन्ही बाजूंनी होते. त्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील तणाव नाहीसा होऊन, त्यांच्या चेहर्यावर हास्य कसे फुलते, हे या कथेत वाचायला मिळेल. ‘श्राद्ध’ कथा करोना काळातली. करोनामुळे सगळीकडे मंदी भाजी विक्रेत्यांसारखे छोटे छोटे व्यवसाय करणारांना जगणंही अवघड होतं. आशा स्थितीत कथानायिका आपल्या वडलांचं ‘श्राद्ध’ कसं वेगळ्या पद्धतीने करते, हे‘श्राद्ध’ कथेत वाचायला मिळतं.
पनिशमेंट, आजी हवीय मला, काकू आई, एक आकाश अवघडलेलं या आणखी काही चांगल्या कथा. खरं तर सगळ्याच कथा वाचनीय आहेत.
या संग्रहात एकूण २० कथा आहेत. कथा वाचताना वाटतं, आपल्या घरात किंवा सभोवती घडणारे प्रसंगच आपण शब्दातून वाचत आहोत. आपले किंवा आपल्या परिचितांचे अनुभव कथांमधून वाचतो आहोत. वाचकाला यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. कधी वाटतं, ‘अरे, आपल्यालाही असंच वाटत होतं की! पुस्तकाच्या सुरूवातीला लेखिकेचा परिचय दिलाय. तो पाहून वाटतं, एवढं सगळं लेखिकेने कधी केलं असेल? लेखिकेचे ९ कथासंग्रह, ४ कविता संग्रह, २ चारोळी संग्रह, ४ कादंबर्या, खानदेशची लोकसंस्कृती व लोकधारा हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहे. हा ग्रंथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने, लोकसाहित्य एम. ए. भाग १ साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे. या शिवाय विविध वर्तमानपत्रातून सदर लेखन केले आहे. वेगवेगळ्या २२ साहित्य संमेलनातून त्यांना कविता वाचनासाठी निमंत्रित केले गेले आहे. ७-८ कविसंमेलने त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहेत. विविध आशा १३ संस्थांचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत, तर ३६ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा नामवंत लेखिकेच्या ‘माणुसकी’ या कथासंग्रहाचे चांगले स्वागत होईल, अशी आशा व्यक्त करतानाच, त्यांच्या पुढील लेखनासाठीही शुभेच्छा.
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈