प्रा. भरत खैरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “मन में है विश्वास” – लेखक : विश्वास नांगरे पाटील ☆ परिचय प्रा. भरत खैरकर 

i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodr...

पुस्तक : “मन मे हैं विश्वास”

लेखक : विश्वास नांगरे पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

मूल्य – 300  रु

तरुणपण घोडचुकामधे, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात जावू नये असं वाटत असेल तर बालपणापासूनच आयुष्याची इमारत उभारायला, मजबूत करायला सुरुवात झाली पाहिजे. न थांबता,न थकता, न हरता पेकाट मोडेपर्यंत व बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला पाहिजे. मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची जिद्द व त्यासाठी अविरत संघर्ष करण्याची तयारी आजच्या तरुणांमध्ये असली पाहिजे. ज्या दिव्यांमध्ये खैरातीच तेल आहे, त्या दिव्याचा उजेडही मला नको अशी भावना त्यांच्या मनात हवी.

“अभ्यास करून मोठा साहेब हो.” असं सांगणार्‍या बाबांसाठी जिद्दीने पेटून उठलेला विश्वास पुढे मोठा पोलीस अधिकारी झाला. कोणतीही गोष्ट गुद्धयांनी नाही, मुद्दयाने सोडवायची शिकवण बालपणीच विश्वासला मिळाली होती. ‘ दुखायचं दुखतं कळ काढ ‘, निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करतो.

तारुण्याच्या काळात संपत्ती व सत्ता एकत्र आल्यावर अनर्थ घडू शकतात, म्हणून विद्यार्थ्याने अभ्यास काळात संयम, विवेक आणि धीर सोडू नये.

संपत्तीचा मोह आणि सत्तेचा माज कधीही चढू द्यायचा नाही ! ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे,देहामध्ये शक्ती आहे,मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीत विवेक आहे, हृदयामध्ये करूणा आहे, मातृभूमी वर प्रेम आहे, इंद्रीयांवर संयम आहे. माणूसपण स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे,इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय उच्च आहे. व्यसनमुक्त जीवन आहे, जीवनात शिस्त आहे,निती आहे, ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे, असा आदर्श युवक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे. रस्ता कठीण असला तरी ध्येय गाठण्यासाठी हा एकच मार्ग आहे. ह्याच मार्गाने मनात दीर्घ “विश्वास” ठेवून जर एखादा युवक मार्गक्रमण करतो तर यश निश्चितच आहे.

काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. बचतीची व काटकसरीची सवय लहानपणापासून असणे चांगले आहे. वेगवेगळी आत्मचरित्रे वाचून आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी तर त्यांचा गाव म्हणजे एक विद्यापीठच

असतं! जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेणार नाही, ही खूणगाठ मनाशी बांधणे गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षांबाबत कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता प्रत्येक क्षणाची,प्रत्येक कणाची आणि मनाची चाचणी घेणे गरजेचे आहे. पेनाने ” पेन” होईस्तोवर लिहिलं तर यश तुमचेच आहे. पराकोटीचा संयम आणि मनावर कठोर नियंत्रण ह्यामुळे कोणतेही यश आपण मिळवू शकतो,असा विश्वास लेखक या पुस्तकात मांडत आहे.

” इस दुनिया में आप किसलिए आए हो? ” ह्या प्रश्नाचं दिलेलं हे उत्तर मिळवण्यासाठी “मन में है विश्वास” हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेच आहे. जसं घोड्यावर मांड टाकली की स्वार किती दमाचाआहे हे कळतं. तसंच विद्यार्थ्यांचे असतं. त्याची बैठक किती आहे, ह्यावर त्याचं स्पर्धा परीक्षेचे यश अवलंबून असतं. आयत्या मिळालेल्या घबाडाला बळी पडायचं नाही, लढायचं, उठायचं, दोन द्यायचे,दोन घ्यायचे, तरच यश तुमचेच आहे. स्वतःच्या नजरेतून स्वतः कधी उतरायचं नाही हा गुरुमंत्र ह्या पुस्तकातून लेखकाने दिला आहे. प्रत्येक घरी हे पुस्तक असणं गरजेचे आहे.

परिचय –  प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments