सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “निर्वासित” – लेखिका : डॉ. उषा रामवाणी – गायकवाड ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तक – निर्वासित 

लेखिका – डॉ. उषा रामवाणी –गायकवाड

प्रकाशक – उष:काल पब्लिकेशन 

पृष्ठे – 430 

मूल्य – 400 रुपये

‘निर्वासित’ हे डॉ. उषा रामवाणी यांचे आत्मकथन. त्यांच्या जीवन-संघर्षाची कहाणी. प्रस्तावनाकार डॉ. राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ) लिहितात, ‘हे आत्मकथन वाचनीय, प्रांजळ आहे. यात उषाच्या ‘धाडस करण्याला हाक देऊ आणि पुढे जाऊ’ या वृत्तीचा परिचय येतो. अंगावर कोसळलेले प्रसंग धाडसाने टिपताना आणि त्यातून मार्ग काढण्याची पायरी ओलांडताना त्यांना पदोपदी झगडावं लागलं. प्रस्थापित जीवनशैली झुगारून आत्मशोधनाचं धाडस ही त्यांची या आत्मकथनाचा ‘हीरो’ म्हणून प्रमुख भूमिका. ’ ते पुढे लिहितात, ‘आत्मकथा म्हणजे, आपल्याला समजलेल्या जीवनातील, स्वत:ला भावलेल्या अनुभवांचं कथन असतं. ’ 

आपलं ‘मनोगत’ व्यक्त करताना लेखिका म्हणते, ‘मी आत्मकथन लिहिणार असल्याचं शाळेत असल्यापासून ठरवलं होतं. आजवरचं माझं जगणं वाचनीय आहे, असं मला आणि अनेकांना वाटतं, म्हणून मला ते ग्रंथबद्ध करावसं वाटलं. ती श्वासाइतकी उत्कट गरज वाटली. या आत्माविष्काराला सार्वजनिक स्वरुपात ‘न्याय’ दिल्याशिवाय घुसमट थांबणार नव्हती. या लिखाणातून मला जे आत्मिक सुख मिळाले, ते अमूल्य आहे’.

‘हे आत्मचरित्र नाही. उत्कटतेने, उत्स्फूर्तपणे तुमच्याशी मारलेल्या या गप्पा, हितगुज आहे’, असंही लेखिका म्हणते.

आजवर मी मूलभूत गरजांसाठीच जीवघेणा संघर्ष केला आहे. घर, पैसा, प्रेम, आधार वगैरे…   जगण्याच्या मूलभूत प्रश्नाशी इतर प्रश्न भिडत राहिले. जगावंसं वाटत नव्हतं. मी आयुष्याला कंटाळले होते. अस्तित्व टिकवण्यासाठी अखंड लढाई चालू होती. लहानपणापासून मी टोकाची अलिप्त, तटस्थ, स्थितप्रज्ञ बनले होते. स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होता आणि माझीच मी मला नव्याने आकळत गेले.

तिने आपली संघर्षगाथा 2016मध्ये फेसबुकवर पोस्ट केली. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अविनाश धर्माधिकारी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फादर फ्रान्सिस दिब्रिटो इ. अनेक जाणकार साहित्यिकांनी कौतुक केले. तिच्या या कहाणीला 5000 तरी लाईक्स आणि कमेंटस मिळाले असतील. मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा, सतीश बडवे यांनी खालील शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय, ‘या लेखनात खूप जागा आशा आहेत, की त्यातून आपली घर नावाची संस्था, विद्यापीठ नावाची संस्था आणि भोवतालचा समाज यातील ताणे-बाणे उलगडले जातात. त्यातही मुलीच्या वाट्याला येणारे संघर्षाचे प्रसंग फारच तीव्र होत जातात. तुम्ही सगळ्यात चांगली निभावलेली गोष्ट म्हणजे लेखनात कुठल्याच गोष्टीचे भांडवल केलेले नाही. घराची श्रीमंती, सामाजिकदृष्ट्या मागासलेले असणे, स्त्री असणे, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे वगैरे…   वगैरे…   निखळ माणूस म्हणून तुम्ही हे सलग सांगत जाता. कोणताच अभिनिवेश न बाळगता. संवादी शैलीतील हे प्रभावी निवेदन म्हणूनच भावते. खोलवर रुतते. ’ पुढे असेच काही अभिप्राय लेखिकेने दिले आहेत.

‘मी का लिहिते?’ या पुढील प्रकरणात लेखिका म्हणते, ‘लिहिणं, व्यक्त होणं ही माझी शालेय वयापासूनची श्वासाइतकी प्राथमिक गरज आहे. ती जगण्याचं एक उद्दिष्टच बनली. ’ ललित, कल्पनारम्य लेखनाची लेखिकेला आवड नाही. ती म्हणते, ’माझा पिंड वैचारिक, सामाजिक लेखनाचा. ’ ‘निर्वासित’ हे त्यांचे आत्मकथन, याच दृष्टिकोनातून लिहिले आहे.

नंतरचे प्रकरण लेखिकेने आपल्या सिंधी समाजावर लिहिले आहे. फाळणीनंतर सिंधी लोक भारतात आले. जमेल तिथे, जमेल तसे स्थिरावले. रुजले. या समाजाची वैशिष्ट्ये तिने दिली आहेत. कुशल, व्यवहारी, सरळमार्गी, उदार, दिलदार, पापभीरू असे हे लोक दैववादी नाहीत. मिठास वाणी हा या समूहाचा विशेष गुणधर्म. श्रमांची त्यांना लाज वाटत नाही. सामाजिक आणि वैचारिक मागासलेपण, रूढीप्रियता, उत्सवप्रियता, चंगळवाद यांसारख्या दोषांबद्दलही तिने लिहिले आहे. ती म्हणते, यांना ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल. परांपरागत व्यवसाय करण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. नोकरी करणार्‍यांचं प्रमाण 1%ही नाही. स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प. आपलं शाश्वत सुख, स्वातंत्र्य, आत्मभान याची जाणीव असणार्‍या स्त्रिया अभावानेच आढळतात. आपला जन्म ‘लासी’ नावाच्या तळागाळातल्या जमातीत झाल्याचे ती सांगते. सिंधी समाजाबद्दल बरीच माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने वाचायला मिळते. फाळणीनंतर सिंधी भारतात आले. सिंधी समाजाला आपण निर्वासित म्हणतो. उषाने आपल्या घरातच इतके भोगले आहे, की विनीता हिंगे म्हणतात, ‘’उषा तिच्या स्वत:च्या घरातच ‘निर्वासित’ होती’’. अर्थात, अधूनमधून वडिलांनी तिला किरकोळ आर्थिक मदत केल्याचेही तिने लिहिले आहे. पण तिला पुरेशी आणि हवी त्यावेळी तिला ती मिळालीच असे नाही.

‘बालपण आणि शाळा-कॉलेज’ व ‘माहेरवास’ प्रकरणांत उषाने आपल्या कुटुंबाची माहिती दिली आहे. आई- वडील, चार बहिणी, एक भाऊ, वहिनी, आजी, नानी, एक व्यंग असलेले गतिमंद काका यांची सविस्तर माहिती दिली आहे. आई सत्संगात, गुरूंमध्ये रमलेली. पुढे ती साध्वी झाली. वडील श्रीमंत, पण मुलाच्या म्हणजेच उषाच्या भावाच्या चैनी, उधळ्या स्वभावामुळे पुढे त्यांना खूप कर्ज झाले. मुले-मुली यांना समान वागणूक नाही. घरात शिक्षणाचे महत्त्व तिच्याशिवाय कुणालाच नाही. समाजालाही नाही. शिकावं, स्वाभिमानाने जगावं, आत्मभान जागवावं याची जाणीव कुणालाच नाही, याबद्दल ती खंत व्यक्त करते. तिची धाकटी बहीण 16व्या वर्षी साध्वी झाली. तिला अध्यात्मातलं त्या वयात काय कळत असेल? पण परतीचे मार्ग नाहीत. याबद्दल समाजाने, कायद्याने काही तरी करायला हवं, असं तिला वाटतं. तिच्याही मागे साध्वी होण्याबद्दल तगादा लागला होता, पण पुढे शिकण्याबद्दल ती ठाम होती. दहावीला चांगले मार्क्स असूनही वडिलांनी कॉलेजमध्ये घातले नाही. दोन वर्षांनंतर तिला गुरूंच्या सूचनेनुसार ती परवानगी मिळाली. दोन वर्षे वाया गेली, म्हणून ती हळहळली.

पुढल्या कॉलेजच्या जीवनातील निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नानाविध उपक्रम यांत ती रमून गेली. ती लिहिते, ‘कॉलेजमध्ये वाङ्मयीन जाणिवा विस्तारल्या. अभिरुची संस्कारित झाली. प्रतिभेला वाव मिळाला. ’ कॉलेजच्या जीवनातील आनंदक्षणांबद्दल तिने मनापासून लिहिले आहे. ती पदवीधर झाली, पण एम. ए. होऊ शकली नाही, याबद्दलही तिने विस्ताराने लिहिले आहे. विद्यापीठाच्या 0. 763 क्रमांकाच्या नियमानुसार तिला पीएच. डी. साठी रजिस्ट्रेशन मिळाले. विषय कोणता घ्यावा, कसे काम करावे, याबद्दल मार्गदर्शन करणारे तिला कोणीच भेटले नाही. ‘एकोणिसाव्या शतकातील निबंधवाङ्मयातून व्यक्त होणारे स्त्रीजीवनविषयक चिंतन’ हा तिचा प्रबंधाचा विषय. तिच्या वैचारिक आणि गंभीर प्रकृतीला साजेसाच हा विषय, पण संदर्भ शोधायला कठीण. त्यासाठी खूप भ्रमंती करावी लागली. या काळात नोकरी करणंही अत्यावश्यक होतं. 17 वर्षे अथक परिश्रमानंतर, चिवटपणे परिस्थितीशी झुंज देत, 2006मध्ये तिला पीएच. डी. मिळाली. इतकंच नव्हे, तर उत्कृष्ट प्रबंधाचं प्रा. अ. का. प्रियोळकर पारितोषिकही मिळालं. जीवनातले एक मोठे ध्येय साध्य झाले.

बी. ए. पासून उषा घर सोडून हॉस्टेलमध्ये राहू लागली. वर्किंग वुईमेन्स, हॉस्टेल, विद्यापीठाचे हॉस्टेल, पेईंग गेस्ट इ. अनेक ठिकाणचे अनुभव, त्याचप्रमाणे नोकरी, अर्थार्जन करत असताना आलेल्या प्रसंगांचेही सविस्तर वर्णन तिने केले आहे. यावेळी नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. त्यांचे नाना प्रकारचे स्वभाव, विचित्र, विक्षिप्त वागणं, स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्ती या सगळ्याशी तिला जुळवून घ्यावं लागलं. तिची वर्णनशैली इतकी प्रत्ययकारी आहे, की हे सारे प्रसंग आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत आणि त्यांच्यातील संवाद प्रत्यक्ष ऐकतो आहोत असे वाटते. ‘माहेरवास’, ‘मुंबई विद्यापीठ आणि माझी पीएच. डी. ’, ‘माझ्या नोकर्‍या वगैरे आणि अर्थार्जन’, माझी घरघर’, ‘माझे मित्रमैत्रिणी’ अशी काही प्रकरणे एखाद्या कादंबरीसारखी झाली आहेत. ती स्वत:च वाचून समजून घ्यायला हवीत.

कधी वाटतं, हे लेखन एकतर्फी तर नाही? पण लगेच जाणवतं, ज्याचं जाळतं, त्यालाच कळतं. अर्थात, काही चांगली माणसेही तिला भेटली. त्यांच्याबद्दल तिने कृतज्ञतेने लिहिले आहे. तिच्यावरील एका परीक्षणाला माया देशपांडे शीर्षक देतात, ‘उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा’.

‘माझं लग्न : माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी‘ हे या पुस्तकातील शेवटचे प्रकरण. ती लिहिते, की जीवनाचा जोडीदार शोधण्याचे काम तिलाच करावे लागले. वयाच्या 21व्या वर्षापासून तिने जाहिराती, वेगवेगळी वधू-वर सूचक मंडळे यांच्याशी संपर्क साधला. याही बाबतीतला तिचा संघर्ष दीर्घकालीन आहे. अनेक ठिकाणी तिला नकार आला, तर काही स्थळे तिने नाकारली. तिचं ’अमराठी’ असणं, तिची पत्रिका ‘चांगली’ नसणं, चष्मा, बेताचं रूप, कमी उंची, थोडासा लठ्ठपणा इ. तिला नकार मिळण्याची कारणे होती. तिच्या नकारामागे, लग्न न करता नुसतीच मैत्रीची अपेक्षा, चुकीची माहिती, फसवणूक, आधीच सेक्सची अपेक्षा इ. कारणे होती. पुढे जाहिरातीद्वारेच दीपक गायकवाड यांच्याशी भेट झाली. तीन-चार भेटी-गाठींनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती 53 वर्षांची होती, तर दीपक 58 वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी तेजस्विनी ही लग्न झालेली मुलगीही होती. ते BPCLमधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी होते. पहिल्या पत्नीशी वैचारिक मतभेदांतून घटस्फोट झाला होता. उषाचे व त्यांचे लग्न रजिस्टर पद्धतीने 28 मे 2015ला झाले. आता उषा सुखात नांदते आहे. बर्‍याच वर्षांनी जीवनात, कदाचित प्रथमच, मानसिक स्थैर्य ती अनुभवते आहे. उषाच्या जीवनसंघर्षाची ही साठा उत्तरीची काहाणी, सुखी सहजीवनाच्या पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली आहे.

परिचय –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments