सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “उलघाल ” – लेखक : प्रा. यशवंत माळी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – उलघाल
लेखक – प्रा. यशवंत माळी
प्रकाशक – साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर
पृष्ठे – १८२,
मूल्य – २५० रु.
गेल्या वर्षी मला एक पुस्तक पोस्टाने ‘सप्रेम भेट’ म्हणून आलं. ‘उलघाल’ हा कथासंग्रह. लेखक प्रा. यशवंत माळी. लेखक म्हणून प्रा. यशवंत माळी यांचं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. चकित होण्याचं कारण असं की माळीसर कथा लिहितात, हे मला माहीतच नव्हतं. मी त्यांची एकही कथा वाचली नव्हती, किंवा
कथालेखक म्हणून त्यांचं नावही ऐकलं नव्हतं. विचार केला, प्रथम त्यांना फोनवरून पुस्तक मिळाल्याचं कळवावं. नंतर कथा वाचून पुन्हा फोन करावा. प्रा. यशवंत माळी माझे एम. ए. चे सहाध्यायी. आम्ही दोघेही नोकरी करत होतो. त्यामुळे रेग्युलर कॉलेजला जाणे शक्य नव्हते. बहिस्थ म्हणूनच आम्ही एम. ए. केले.
त्यावेळी बहिस्थ विद्यार्थ्यांना सांगलीचे प्रा. व्ही. एन. कुलकर्णी दर रविवारी मार्गदर्शन करत. म्हणजे नोट्स् देत. ते सांगत. आम्ही लिहून घेत असू. त्या नोट्सच्या जिवावर आम्ही बर्यापैकी मार्क मिळवून एम. ए. झालो. माळीसरांशी तशी तोंडओळख होती. नंतर आसपास होणार्या कवीसंमेलनातून, साहित्यसंमेलनातून आम्ही भेटत-बोलत राहिलो, पण त्यावेळी त्यांनी आपल्या कथालेखनाचा कधीच उल्लेख केला नाही. त्यामुळे ‘उलघाल’ पाहून आश्चर्य वाटलं. अर्थात आनंदही झालाच. मी ‘उलघाल’ चाळलं. अतिशय देखणं पुस्तक. कागद, मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ सगळंच छान. मुद्रणदोष फारसे नाहीत. पहिलंच पुस्तक हेवा वाटावा असं. म्हणजे त्यावेळी तरी मला ते त्यांचं पहिलंच पुस्तक आहे, असं वाटलं होतं.
‘उलघाल’ वाचलं. मला कथा अतिशय आवडल्या. यात एकूण १६ कथा आहेत. प्रत्येक कथा विषय –आशयाच्या दृष्टीने वेगळा. पण काही गोष्टी सर्वत्र समान आहेत. त्या म्हणजे आशयानुकूल प्रसंगनिर्मिती, ता प्रसंगातील तपाशीलांचे नानाविध मोहक रंग, त्यातून साकार झालेल्या साजिवंत वाटाव्या, अशा व्यक्ती, व्यक्तिचित्रणाला अनेक ठिकाणी दिलेली प्रतिमा-प्रतिकांची जोड, त्यातील मनोविश्लेषण, अनेक ठिकाणी
सूचकतेने घडणारे जीवन दर्शन, कथेचा परिपोष करणारी सुयोग्य भाषाशैली, अशी अनेक वैशिष्ट्ये यातील कथांमध्ये दिसतात. या कथांबद्दल मलपृष्ठावर, श्रेष्ठ लेखक आणि चिकित्सक कै. वसंत केशव पाटील यांनी लिहिले आहे, ‘ या लेखकाचे ग्रामीण आणि नागर संस्कृतिविषयक आकलन व अन्वय, अधिकतर अव्वल आणि गंभीर प्रकृतीचा आहे. त्यामुळे मानवी जीवनातील आदिम नि अपरिहार्य रीती-रिवाजाचे एक मनोहारी
प्रतिबिंब, सर्वच कथांमध्ये उतरले आहे. हा कथासंग्रह, एक अस्सल कलाकृती म्हणून जाणत्यांना नक्कीच विचारात घ्यावा लागेल. ’
कथासंग्रह वाचला आणि प्रा. यशवंत माळीसरांना तो आवडल्याचा फोन केला. फोनवर बोलताना कळलं, हा काही त्यांचा पहिला कथासंग्रह नव्हे. ‘केकत्यांचा बिंडा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. १९९२साली तो प्रकाशित झाला. त्याच्या 3 आवृत्या निघाल्या आणि त्याला ३ पुरस्कार मिळाले. त्यानंतर’ पोटगी’, ‘किराळ’, ‘परतीचा पाऊस’, ‘उलघाल’ असे कथासंग्रह निघाले. ‘वेगळी वाट’ हा कथासंग्रह फेब्रुवारी२००५ मध्ये
प्रकाशित झालाय. ‘परतीचा पाऊस’ला विविध संस्थांचे ७ पुरस्कार, तर ‘किराळ’ला १६ पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांचा ‘सखी’ हा कविता संग्रह, ‘प्रतिज्ञा, आणि मिनीचे लग्न या बाल कादंबर्या आणि ‘माझी शाळा’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित आहे. या सार्यांनाच विविध संस्थांचे पुरस्कार आहेत. त्यांच्या एकूण पुरस्कारांची संख्या ९० होते, असं कळलं. म्हणजे माळी सरांनी पुस्तक काढावं आणि त्याला पुरस्कार मिळावा, हे ठरल्यासारखंच झालं जणू. ‘सीनातीर’ ( जामखेड – जी. अहमदनगर ) केवळ त्यांच्याच १० कथांचा २०२१ साली दिवाळी अंक काढला. ‘उलघाल’मधील ‘थायलंडची तुळस’ या कथेचा डॉ. चंद्रकांत
पोकळे यांनी कन्नडमध्ये अनुवाद केला, तर ‘किराळ’ या कथासंग्रहाचा हिंदीमध्ये अनुवाद झालाय. शब्बीरभाई बिलाल शेख यांनी तो केलाय. ‘‘केकत्यांचा बिंडा’ या कथासंग्रहाचा इंग्रजीमध्ये अनुवाद डॉ. संजय बोरूडे करताहेत. त्यांच्या काही निवडक कथांचे उडियातही अनुवाद होत आहेत.
माळी सरांची ही मिळकत ऐकून मी थक्क झाले. वाटलं, आपल्या माहितीचा परीघ किती इवलासा असतो.
‘उलघाल’ ही कथासंग्रहातील पहिलीच कथा. तिची नायिका अबोली. ती बडी माँकडे मोलकरीण आहे. एकदा बडी माँ आणि त्यांचे पती आठ दिवसांच्या टूरवर जातात. घरात तरुण मुलगा आहे. मनजीत. ती कामाला घरी यते, तेव्हा मनजीत व्यायाम करत असतो. त्याचं घामाने निथळणारं पीळदार रूप पाहून अबोलीचं मन तिकडे ओढ घेतं. मग अनेक प्रसंगातून ती त्याला निसटते –पुसटते स्पर्श करते. हे प्रसंग मुळातूनच वाचायला हवेत. मनजीतलाही तिचे आकर्षण वाटते. ती तरुण आहे. सुंदर आहे. नीट-नेटकीही आहे. तो कामाला जायला निघतो, तर त्याला गाडी चालवतानाही तीच पुढे दिसते. पण तो मनाशी निश्चय करतो, ‘तिच्या हरहुन्नरी मनाला कुठेही चुरगळू द्यायचं नाही. त्यावर कलंक लागू द्यायचा नाही. जखम होऊ
द्यायची नाही. मनात कसलीही उलघाल होऊ द्यायची नाही. ’ ओढाळ आणि आतुर मनाची अतिशय मुग्ध अशी कथा आहे ही.
‘न सुटलेले कोडे’ ही माया इनामदारची कथा. माया सुरेख आहे. सतत स्वत:ला आरशात पाहून ती स्वत:वरच खुश असते. इनामदारीचा डामडौल आता त्यांच्या वाड्याप्रमाणेच ढासळलेला आहे. आई आजारी. तिला मायाच्या लग्नाची मुळीच काळजी नाही. पुढे मायाला नोकरी लागते. कामात ती व्यवस्थित, नीट-नेटकी आहे. ती कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. पण तिच्यावर मेहेरनजर आहे, ती तिच्या
बॉसची. कारण ही अविवाहित सुंदरी आहे. तिथे येणारा प्रत्येक नवा बॉस तिच्याशी संबंध ठेवतो. या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार? आई की आपण ? याचं तिला कोडं पडतं. आता ती बरीच प्रौढ झाली आहे. केस मुळापासून पांढरे होऊ लागले आहेत. पण तरुण दिसणं, ही तिची गरज आहे.
‘थायलंडची तुळस’ म्हणजे किमी. नायक थायलंडच्या टूरवर गेला असताना तिथे ती त्यांची गाईड होती. तिला नायकाबद्दल विशेष आत्मीयता वाटते. गप्पा, जवळीक यातून ती त्याच्याशी विशेष सलगी करते. परतताना विमानातळावरून एका वेगळ्या रस्त्याने त्याला बाहेर काढते. टॅक्सीने एका जागी नेते. ती सांगते, तिचा नवरा हिजडा आहे. दोघे एकरूप होतात. ती लगेचच त्याला विमानतळावर आणून सोडते. खाऊचा पुडा म्हणून ती त्याला एक चिठ्ठीवर मेसेज पाठवते. ती म्हणते, ‘तुझ्या भेटीने माझ्या सुखाचा रंग बदलला. मी तृप्त आहे. मी लवकरच आई होईन. त्याचे नाव तुझ्या नावाचा अर्थ असलेले थायी भाषेतले नाव ठेवीन. ’ तिला नायक ‘थायलंडची तुळस’ का म्हणतो, ते कथा वाचूनच समजून घ्यायला हवं.
.. ‘न सुटलेले कोडे’ आणि ‘‘थायलंडची तुळस’ या दोन्ही कथेत शरीरसंबंधाचा केवळ उल्लेख आहे. कुठेही उत्तानता नाही, हे लेखकाचे कौशल्य. वरील तिन्ही कथांचा आशय- विषय वेगळा असला, तरी यात एक अंत:सूत्र आहे, असे मला वाटते.
‘इगत’, ‘रतीब’, ‘शुटिंग’, ‘निवडणूक’ या ग्रामीण बाज असलेल्या कथा, गावरान बोली, संवादातून लोकांचे बेरकीपण व्यक्त होणारे, परिसर, प्रसंग, व्यक्ती आपण वाचत नाही, तर डोळ्यांनी बघतोय, अशी शैली. ‘इगत’ ही कथा तानाजी आणि हणम्या या दोन चुलत भावांची. भाऊ कसले वैरीच. जमिनीवरून वाद, भांडणे, मारामारी. एकदा तानाजी मारामारी केली म्हणून तालुक्याला जाऊन हाणमाविरुद्ध केस करतो. यातू बालबाल बचावण्यासाठी हाणमा कोणती ‘इगत’ साधतो, ते प्रत्यक्ष कथेतच वाचायला हवे.
तात्यानानांच्या मळ्यात ‘शुटिंग’ होणार, अशी बातमी पंचक्रोशीत पसरते. शुटिंग बघायला अख्खं गाव लोटतं. दिवसभर वाट पाहूनही तिथे कोणी येत नाही. मग कळतं, ती अफवा होती. लोक परततात. परतताना लोक तात्यानानांच्या मळ्याचा विध्वंस कसा करतात हे लेखकाने अगदी बारकाईने, तपशीलवार दिले आहे. ही अफवा कुणी आणि का उठवली, हे कथेतच वाचायला हवं.
प्रवास, सावली, दिशाहीन, पेन्शन, सत्कार, स्थलांतर, मी पुढे पुढे कथा वाचत जाते. प्रत्येक कथा वाचून झाली, की वाटतं, याचा समावेश परिचयात करायला हवा…. करायलाच हवा…. पण किती आणि काय
काय लिहिणार?
`व्यक्तिचित्रणाचा एक नमूना म्हणून बडी माँच्या बोलण्याबद्दल ( उलघाल ) त्यांनी काय लिहिले आहे, ते बघा. ‘चावी फिरवल्याबरोबर नळातून पाणी यायच्या आधी भसा-भसा वावटळासारखी हवा यावी, आणि पाण्याच्या फवार्याबरोबर नुसताच आवाज यावा, तसं बडीमाँचं बोलणं. काही कारण असू द्या की नसू द्या, त्यांचं तोंड अखंड चालू असायचं. कुणाशीही त्या रोखून बघतच बोलायच्या. बोलताना दारातल्या पायपुसण्याला खेटरं टराटरा पुसावीत, तसं डाव्या हाताच्या वाढलेल्या नखांनी साडीवरूनच डावी मांडी खरा-खरा खाजवणं मनमुराद सुरू असायचं. ’
‘न सुटलेलं कोडं’ मधील मायाच्या आजारी आईबद्दल त्यांनी लिहिलय, ‘आयुष्याच्या महावस्त्रात नकोसं
वाटत राहिलेल्या एकेका दिवसाचे मृत्यूच्या वाटेवर ठिगळ चिकटवत पडून राहिल्या. ’
—- प्रा. माळी यांच्या व्यक्तिचित्रणात व्यक्तीच्या बाह्य रूपदर्शनाबरोबरच त्याच्या मनातील विचारही त्यांनी बारकाव्याने, तपशीलाने दिले आहेत. सर्वच कथांमधील पात्रात असे बारकाव्याने केलेले मनोविश्लेषण दिसत असले, तरी, ‘इच्छामरण’, ‘दिशाहीन’, ‘पेन्शन’, ‘प्रवास’, ‘निवडणूक’, ‘सत्कार’, ‘निर्णय’ या कथांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल.
रचना स्वामी या ‘समकालीन कथांमधील मनोविश्लेषणाचा’ प्रबंधासाठी अभ्यास करताहेत. त्यात समकालीन कथांच्या तूलनेत, प्रा. यशवंत माळी यांच्या कथेतील मनोविश्लेषणाचा प्राधान्याने अभ्यास करत आहेत.
प्रा. यशवंत माळी यांच्या कथा अधिकाधिक कसदार आणि लौकिकसंपन्न होतील याची ग्वाही ‘उलघाल’ हा कथासंग्रह निश्चितपणे देतो.
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈