सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ मृत्युजिज्ञासा… लेखक – स्वामी विज्ञानानंद ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
पुस्तक – मृत्युजिज्ञासा
लेखक – स्वामी विज्ञानानंद
प्रकाशक – मनशक्ती प्रकाशन
मुल्य – ६०रु.
गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या व्यक्तींचे झालेले मृत्यू पाहिले तेव्हापासून मृत्यू या विषयाबाबत माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. कारण मृत्यूबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. तुमच्यापैकी अनेकांनादेखील त्या गोष्टी माहित असतीलच. अमुक एक प्रकारे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हे कदाचित अनेकदा आपल्याला धक्कादायक असतं. एखाद्या व्यक्तीचा विशेषतः प्रिय व्यक्तीचा विरह नेमका मृत्यू काळ समीप असताना होणं. व्यक्ति मृत झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार, विधी यामध्ये काही विघ्न निर्माण होणं किंवा जवळच्यांना उपस्थित न राहता येणं किंवा अगदी एखाद्या व्यक्तीनं अपरिचित लोकांमध्येच आपला देह त्यागणं अशा अनेक गोष्टींनी मृत्यूबद्दल एक प्रकारचं गुढत्व माझ्या मनात निर्माण झालं. आणि त्यामुळेच या विषयाबाबतची जिज्ञासा निर्माण झाली. थोडक्यात हे जाणवलं की मृत्यू ही गोष्ट साधी सरळ नाही. मृत्यू ही गोष्टसुद्धा काहीशी चमत्कारिक आहे. आणि मग या जिज्ञासेतूनच ‘पुनर्जन्म’ डॉक्टर वर्तक यांचे पुस्तक मी सुरुवातीला वाचलं. (त्याबद्दलचा सविस्तर लेख मी यापूर्वीच फेसबुकवर लिहिला होता. ) त्यानंतर ‘मृत्यू एक अटळ सत्य’ या सद्गुरूंनी लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बघितला. त्यामध्ये प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत केलेलं उत्तम आणि रसाळ विवेचन ऐकलं.
तसंच नुकतंच ‘मृत्युजिज्ञासा’ हे स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेलं मनशक्तीने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. या पुस्तकाच्या वाचनातून, विचारातून काही गोष्टी नव्याने कळल्या. काही गोष्टींची पुर्न उजळणी झाली, तर काही गोष्टींबाबत अधिक जिज्ञासा निर्माण झाली. आणि जे जाणवलं ते या लेखात लिहिण्याचा प्रयत्न करते आहे.
जिथे जन्म आहे तिथे मृत्यूही आहेच. मुळातच काहीतरी निर्माण होत आहे याचा अर्थ आधी ते विशिष्ट स्वरूपात अस्तित्वात नव्हतं असंच आहे. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे खरं. परंतु आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारे जन्माचं कौतुक केलं जातं, सोहळा केला जातो, स्वागत केलं जातं त्या प्रकारे मृत्यूचं स्वागत केलं जात नाही. किंबहुना त्याबद्दलचा विचार करणंदेखील आपण निषिद्ध मानतो. पण असं असलं तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे जे आपल्या मानण्या अथवा न मानण्यावर अवलंबून नाही. मग असं असताना आपण त्याचा स्वीकार करून आपला मृत्यू हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा होईल हे बघणं ही आपली एक वैयक्तिक जबाबदारी आहे असं मला या पुस्तकाच्या वाचनानंतर वाटू लागलं.
पुस्तकात सुरुवातीलाच नचिकेताची गोष्ट येते. यमाकडून मृत्यूचं खरंखुरं स्वरूप जाणून घेण्याची त्याची जिद्द आणि ज्ञानलालसा ही अचंबित करणारी अशीच म्हणावी लागेल. नचिकेतासारख्या तरुण व्यक्तीने ही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता दाखवणं इथेच आपल्या पहिल्या मृत्यूच्या कल्पनेला तडा जातो. कारण मृत्यूचा संबंध आपण वयाशी जोडतो. ठराविक एका काळानंतर वृद्धत्व येणार आणि त्यानंतर मृत्यू येणार हे पारंपारिकरित्या चालत आलेलं गणित आपण गृहीत धरतो. पण मृत्यूचं असं वयानुसार काही गणित नसतं. ते सारं काही कर्मावर आणि व्यक्तीच्या मृत्यू विषयक कल्पनेवर आधारित असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण या पुस्तकात सांगितल्यानुसार माणूस कधी मरतो तर जेव्हा त्याला मृत्यू हवासा वाटतो तेव्हाच. ‘नातलग कोणाच्या इच्छेने मरतो’ आणि ‘डॉक्टरांच्या मतानेही मृत्यू स्वतःच्या इच्छेने’ या दोन प्रकरणांत याबद्दल सविस्तर उहापोह केलेला आहे. या निष्कर्षातून मृत्यूबद्दलच्या अपरिहार्यतेच्या आणि त्याला शरणागत जाण्याच्या दीनवाण्या भूमिकेला निश्चितच तडा जातो. त्यामुळे माणसं वयानुसार आपल्या वृद्धपकाळातील समस्यांचं तसंच आर्थिकबाबींचे नियोजन करतात तसेच त्यांनी मृत्युचंही करायला हवं. हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी निरनिराळ्या पुस्तकातील निरनिराळ्या लेखांचे, जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींनी काढलेल्या निष्कर्षाचे, संशोधनाचे दाखले दिले गेले आहेत. शिवाय स्वामी विज्ञानानंद यांनी स्वतः अनेक व्यक्तींवर केलेल्या प्रयोगातून काढलेले, निष्कर्ष सोप्या पद्धतीने लहान लहान प्रकरणांमध्ये विभागून सांगितलेले आहेत. यासाठी स्वामी विज्ञानानंद यांनी फाशी दिल्या जाणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला आहे. त्यानंतर मृत आत्म्याशीदेखील संवाद साधलेला आहे आणि मृत्यूच्या क्षणी किंवा मृत्यूबद्दल निर्माण होणाऱ्या भावना जाणून घेऊन त्याचा अभ्यासही केलेला आहे. आत्मा अमर आहे ही सर्वमान्य गोष्ट या पुस्तकात पुन्हा एकदा विज्ञानाच्या साह्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अतिशय छोटेखानी केवळ 70 पानांचे हे पुस्तक आणि त्यातील विषय आपल्याला अतिशय अंतर्मुख करतात. या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश किंवा जमेची बाजू म्हणूया ती म्हणजे यामधील विज्ञाननिष्ठ विचार हे आपल्याला मृत्यूबाबतची आपली असलेली एक वैचारिक चौकट जिला खरंतर पारंपारिक म्हणता येईल ती मोडायला भाग पाडतात.
यामध्ये मृत्यूचे तीन महत्त्वाचे प्रकार दिले आहेत. एक म्हणजे बायोलॉजिकल डेथ, दुसरं म्हणजे क्लिनिकल डेथ आणि तिसरा ज्याला स्वामी विज्ञानानंद सायको डेथ असं संबोधतात. या तीनही प्रकारचे मृत्यू कसे आहेत ते दिले आहे. यापैकी बायलॉजिकल डेथ हा मृत्यूचा प्रकार मनुष्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरती कसा बदलला त्यानंतर कालांतराने क्लीनिकल डेथ याला मागं टाकणारं ज्ञान विकसित झाल्यावर निर्माण होणारा सायको डेथ हा प्रकार म्हणजे नक्की काय. ते सविस्तर उलगडून सांगितलं आहे. आणि यानंतरच मृत्यूच्या तीन तऱ्हादेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या आहेत. मनाची शरीरापासून फारकत, मनाच्या देहमुक्त अवस्थेचा जन्म, आणि मनाचे (वासनेचे) खरेखुरे मरण मोक्ष या त्या तीन तऱ्हा आहेत.
यानंतर औत्सुक्याचा विषय म्हणजे मरणोत्तर जीवन. वेगवेगळ्या जाती-धर्मांमध्ये चर्चिला जाणारा आणि अनेक समजुती गैरसमजुती प्रचलित असलेला हा विषय. त्यातील काही समजूतींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यात केला आहे. त्यातील प्रकरणांची शीर्षके सांगितल्यावर साधारण त्यातील आशय काय असावा याची कल्पना येऊ शकते म्हणून शीर्षक देते आहे. मृत्यू भूत व मृत्यूनंतर सहाय्य, मरणानंतरचे काही विलक्षण प्रयोग, मृत्यूनंतरच्या अवस्था, मृत्यूनंतर भेट प्रयत्न, भूतसृष्टी संपर्क व पुरावे, मृतासाठी यज्ञ श्राद्ध की पूजा?, शांत मरणाचा हक्क असा… अशा मृत्यूबद्दलचं आकर्षण आणि गुढ कायम ठेवणाऱ्या गोष्टींबद्दल यामध्ये चांगली चर्चा झाली आहे.
याशिवाय या पुस्तकातून नवीन मांडलेल्या गोष्टी…
मला सगळ्यात लक्षवेधक वाटलेली गोष्ट म्हणजे ‘मरण पत्रिका !’ सर्वसाधारणपणे व्यक्तीची जन्मपत्रिका असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यावर आपला विश्वास असो अगर नसो पण ही गोष्ट सगळीकडे प्रचलित आहे. परंतु मृत्यू पत्रिका हा प्रकारच अतिशय नवीन आणि अद्भुत असा मला वाटला. व्यक्तीची मृत्यु पत्रिका कशी काढावी? त्यावरून मृत व्यक्तीबद्दलच्या स्थितीचं ज्ञान कसं करून घ्यावं हे सारं काही यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. एका झटक्यात वाचून समजण्याइतकं ते सोपं नाही परंतु असं काही अस्तित्वात आहे याची जाणीव मात्र या लेखामुळे निश्चितच होते. यानंतर काही प्रसिद्ध व्यक्ती भीष्म आणि ख्रिस्त यांच्या मृत्यूबद्दलचा उहापोह केला आहे.
यामध्ये सांगण्यात आलेली आणखीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे यज्ञाचा मरण दुःखाशी संबंध, यज्ञ मरण व गीतेचे आक्षेप, मृताला सामुदायिक सविता शक्ती का? आणि थोडक्यात गायत्री मंत्र त्याचे परिणाम त्याचं सामुदायिक पठण आणि सूर्य पूजा अशा सगळ्या गोष्टी यामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगितलेल्या आहेत.
आपल्यासारख्या लोकांसाठी दोन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या ते म्हणजे मृत्यूनंतरही तुमचे भोग संपत नाहीत. आत्म्याला वासनांच्या रूपात काही भोग हे भोगावेच लागतात. त्यामुळे मृत्यूनंतरचे भोग कमी होण्यासाठी व्यक्ती जिवंत असतानाच काही सत्कर्म करणे हे नितांत गरजेचे असते. यासाठी त्यागाचे महत्त्व त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांगितलेले आहे. आणि वासनांवरती षडरिपूंवरती विजय किती महत्त्वाचा आहे हे देखील सांगितले आहे. आपले पूर्वज आपल्याला सहाय्य करतात आणि आपल्या भौतिक जीवनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. आपल्या शरीरातली आत्मशक्ती ही जिवंत असतानाही बाहेर जाऊन कार्य करू शकते त्यामुळे मृत झाल्यानंतरसुद्धा ती उत्तमरीत्या कार्यरत राहते हे सांगितलं आहे. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आशीर्वादाने आपली भरभराट होऊ शकते हे सांगण्यासाठी इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नेहरू यांच्याबाबतचा दाखला दिला आहे. आणि सर्वात शेवटी मृत्यूबद्दल भय बाळगणे हा गुन्हा आहे हे सांगून मृत्यूबद्दलची एक सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला आहे.
याखेरीज या पुस्तकाचं महत्त्व म्हणजे यातील कुठलीही गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीशिवाय मांडलेली नसून काही बाबतीत अजून अधिक प्रयोग होणे आणि अधिकाधिक अचूक निष्कर्ष निघणं हे गरजेचे आहे हे देखील प्रामाणिकपणे नमूद केलेलं आहे. मला जाणवलेली या पुस्तकाची सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे पुस्तकातील विषयांचा आवाका पाहता यातील प्रकरणे फारच अल्पशब्दांत लिहिली गेली आहेत. त्यामुळे उत्सुकता निर्माण होते परंतु अधिक काही वाचायला मिळत नाही याची चुटपुटही लागते.
मात्र मृत्यू विषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुस्तक पुरेसं आहे आणि महत्त्वाचं ही हे नक्की.
परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈