सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “मायबोली रंग कथांचे” – संपादन : श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – मायबोली रंग कथांचे
संपादक – सचिन वसंत पाटील
प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
पृष्ठ संख्या – १८८
मूल्य – ३०० रुपये
नुकताच एक कथासंग्रह वाचला. ‘मायबोली, रंग कथांचे’. या कथासंग्रहाचे वेगळेपण असे, की या बोली भाषेतील निवडक कथा आहेत. बोली भाषा म्हंटलं, की आपल्याला चटकन आठवतात, त्या म्हणजे वर्हाडी, दख्खनी, मालवणी, अहिराणी, कोकणी, ठाकरी, आगरी इत्यादि. पण यात अशा काही बोली भाषेतील कथा आहेत, ज्यांची नावे मी तरी प्रथमच वाचली. उदा. तावडी, पोवारी, झाडी, लेवा गणबोली, गोंडी बोली, तडवी भिल, भीलाऊ या बोली भाषेतील कथाही यात आहेत. या कथांचे संकलक आणि पुस्तकाचे संपादक सचीन वसंत पाटील आहेत आणि प्रकाशक आहेत, शब्दान्वय प्रकाशन, मुंबई.
श्री सचिन पाटील
सचिन पाटील यांनी संपादकीयात लिहिले आहे, असे पुस्तक काढायची कल्पना मनात आल्यापासून सगळी जुळणी करेपर्यंत चार वर्षे गेली. काही मासिकातून, दिवाळी अंकातून आलेल्या कथा वाचून, काही मित्र परिवाराकडे चौकशी करून, काही त्यांचे स्वत:चेच मित्र होते, त्यांच्याशी बोलून त्यांनी कथांचे संकलन केले. गोवर्धन पर्वत उचलण्यासारखेच हे काम. त्यांनी ते लीलया केले, असे मी मुळीच म्हणणार नाही. त्यांनी त्यासाठी भरपूर परिश्रम केले. बोली भाषेशी संबंधित पुस्तके वाचली. कथाकारांशी आणि मित्रांशी चर्चा केली. गुगलवरून माहिती मिळवली. त्या माहितीवर केवळ विसंबून न राहाता, तज्ज्ञांशी त्याबाबत चर्चा केली. यातून सिद्ध झाले पुस्तक ‘मायबोली रंग कथांचे’.
पुस्तकाची मांडणी अगदी नेटकी आहे. सुरूवातीला संपादकियात बोलीभाषांचे महत्त्व विषद केले आहे. त्यांतर विविध २२ बोलीभाषांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्या भाषेत लिहिणारे महत्त्वाचे लेखक-लेखिका कोणते इ. माहिती येते. नंतर बोली भाषेतील २२ कथा आहेत. प्रत्येक कथेखाली आपल्याला अपरिचित शब्दांचे अर्थ दिले आहेत. अर्थात अनेक शब्दांचे अर्थ द्यायचे राहूनही गेले आहेत. कथांच्या शेवटी ती लिहिणार्या कथाकारांचे संक्षिप्त परिचय दिले आहेत. तिथे त्या त्या लेखकांचे फोन – मोबाईल नंबर दिले असते, तर वाचकांना त्यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया कळवता आल्या असत्या. मलपृष्ठावर मराठी अभ्यासक डॉ. संदीप सांगळे लिहितात, ‘प्रमाण भाषेला समृद्ध करण्याचे काम बोलीभाषा करतात. प्रमाण भाषा ही मुख्य रक्तवाहिनी सारखी काम करते, तर बोली भाषा या तिच्या धमण्या आहेत. आपला खास असा भाषिक ऐवज त्या मराठीला दान करतात. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्यांची विपुल अशी शब्दसंपदा आहे. भाषेला ऐश्वर्यसंपन्न बनवण्याचे कार्य ग्रामीण भागातील बोली करत आहेत. ’
पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक, वेधक, समर्पक आहे. वारली शैलीतील हे चित्र आहे. फेर धरून कथानृत्य करणार्या भाषा भगिनी वर्तुळ करून नाचताहेत आणि या वर्तुळाच्या मधे तारपा नावाचे वाद्य वाजवणारी स्त्री दिसते आहे. आदिवासी नृत्याच्या वेळी लाकूड आणि कातडे यापासून बनवलेले हे वाद्य वाजवले जाते. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर फेर धरून नाचणार्या स्त्रिया आणि तारपा वाजवणारी स्त्री पांढर्या रंगात आहे. ते वाद्य जणू म्हणते आहे, ‘आमच्याकडे बघा… आमच्याकडे बघा… ’ प्रतिकात्मक असे हे मुखपृष्ठ वाटले मला.
या कथासंग्रहातील पहिली कथा आहे, ‘डफडं’. डॉ. अशोक कोळी हे या कथेचे लेखक. ‘कोरोना’सारख्या जागतिक महामारीमध्ये खेडेगावातील आलुतेदार, बलुतेदार, पुजारी, मागतकरी यांची कशी उपासमार झाली, ते यात सांगितलं आहे. घरादाराच्या पोटासाठी डफडं वाजवून उपजीविका करणारा माणिक. या काळात काही न मिळाल्याने कसा हतबल होतो, त्याचा आक्रोश या कथेत मांडला आहे. कथाशयाबरोबरच त्या भागातील, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीची, प्रथा-परंपरांची माहितीदेखील यात होते. गावात लग्न -समारंभ, नवस फेडणे इतकंच काय मर्तिकाच्या वेळीही मिरवणूक काढायची रीत. त्यावेळी डफडं वाजवून माणिकला पैसे मिळत. तशीच अमोशा (अमावास्या) मागायची पद्धत, या चाली-रीतीही कळून येतात. कोरोनामुळे मिरवणूकीवर बंदी आली आणि माणिकचं डफडं वाजवणं थांबलं. बायकोलाही अमोशा मिळाली नाही. त्याच्या दैन्यावस्थेचं वर्णन यात आहे.
‘ह्या मातयेचो लळो’ ही मालवणी बोलीची कथा सरिता पवार यांनी लिहिलीय. जमिनीच्या कामासाठी पम्याला त्याची आई बोलावून घेते. सकाळी आपणच रुजवलेली, जोपासलेली झाडं-पेडं, त्यांची हिरवाई बघून पम्या हरखून जातो. कामासाठी कणकवलीला जाताना त्याला वड, पिंपळ, चिंचेची झाडे आठवतात. ती रस्ता रुंदीकरणात पाडलेली असतात. हा विकास की विध्वंस? पम्याच्या मनात येतं. परतल्यावर घराभोवतीची बाग- नारळी, पोफळी, वेगवेगळ्या फळांची झाडं त्याच्या मनाला आनंद देतात. कणकवली, सिंधुदुर्ग या प्रदेशातील निसर्गाचं मोठं सुरेख वर्णन यात आहे, तसेच माय-लेकरातील संवादही मोठे चटपटीत आणि वाचनीय आहेत. शेवटी पम्या मुंबईची एका चाळीतली भाड्याची खोली सोडून गावी परतायचे ठरवतो, हे मोठ्या सूचकतेने लेखिकेने सांगितले आहे.
‘लाखीपुनी’ ही अहिराणी बोलीतील कथा लतिका चौधरी यांनी लिहिलेली आहे. लाखीपुनी म्हणजे राखी पौर्णिमा. गंगू शेतात निंदताना (खुरपणी ) गाणी (लोकगीतं) म्हणते. गाणी म्हणताना तिला भावाची आठवण येते. भाऊ मोठा झालाय बंगला, गाडी… त्या धुंदीत बहिणीला विसरला, तिला वाटतं. राखी बांधायला भाऊ नाही, ती कष्टी होते. शानूर, तिची मैत्रीण. दोघी एकत्र काम करणार्या. बहिणीसारख्याच. शानूर आपल्या नवर्याला सालीमला इशारा करते. तोही शेतात कामाला आलेला असतो. शानूर त्याच्या कानात काही-बाही सांगते. ती गंगूला म्हणते, ‘गंगू मेरी बहेना, यह तेरा धरमका मुहबोला भाई. ले लाखी बांध ले. भाई की याद आ रही है ना?’ गंगू काय करावं, या विचारात पडते. तशी ती म्हणते, ‘जात, रंग, धर्म, भेद इसरी मानवता धर्म देखानी नजर हाऊ सण देस. इतली ताकद या भाऊ बहिननी लाखी बांधनमा शे. ‘ मग गंगूने हसत हसत सालीमला राखी बांधली. हसत हसत दोन अश्रू गंगूच्या गालावर ओघळले. शानूरही खूश झाली. इतक्यात फटफटीचा आवाज आला. कोर्या फटफटीवरून गंगूचा भाऊ आला. ‘गंगूताई लाखी भांद. ‘ खिशातून राखी काढत तो म्हणतो, ‘बैन, नोकरी, पैसा, सवसारना लोभमा दूर र्हायाणू, पण नातागोताशिवाय जगणं म्हंजी जगनं नै हाई समजनं नी उनू भेटाले लाखीपुनीनं निमित्त देखी. ’ एकूण काय, गोड शेवट. भाषाही मोठी मधुर आहे. त्यावर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो. भाऊ-बहीण उराउरी भेटतात. गंगू राखी बांधते आणि नंतर निंदणीच्या आपल्या कामाला लागते. काम करता करता गाते,
‘आठवला भाऊ परदेशीचा बेईमान, लाखीपुनीले आला चोयी लुगड घेवून मानियेला भाऊ जातीचा मुसलमान, सख्ख्या भावापरीस त्याचं आहे ग इमान बहिणीला भाऊ एकतरी ग असावा, पावल्याचा खण, एक रातीचा इसावा.’
‘बंधे मूठ की ताकद’ या पोवारी बोली भाषेतील कथेत लेखक गुलाब बिसेन यांनी एकतेचे महत्त्व आणि त्यामुळे मिळणारे यश अधोरेखित केले आहे. वैनगंगेच्या खोर्यातील सितेपार गावात घडलेली कथा. आमदार फंडातून गावातील मुख्य रस्ता सिमेंटचा करायचे ठरते. रस्ता होतो. आमदारांच्या हस्ते उद्घाटन होते आणि महिन्याच्या आत त्यात घातलेल्या सळ्या बाहेर येऊ लागतात. गावातील ‘युवा-शक्ती’ नावाचा समूह, सरपंच, आमदार, ठेकेदारांना जाब विचारतात. पण ते दाद देत नाहीत. आमदार उडवा-उडवीची उत्तरे देतो. सरपंच ‘युवा-शक्ती’त फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. पण ते शक्य होत नाही. त्यांना पोलिसांचा धाक दाखवतो. पण ही बहाद्दर मुले घाबरत नाहीत. पेपर, फेसबुक, ट्विटर या माध्यमांचा उपयोग करून बातमीचा प्रसार करतात. मुख्यमंत्र्यांना ई-मेल करतात. झाल्या प्रकाराची चौकशी होते. दोषी ठेकेदारावर कारवाई होते आणि ‘बंधे मूठक् ताकदको दर्शन पूर गावाला भयेव. ’ याही बोलीवर हिन्दी आणि गुजराथीचाही प्रभाव जाणवतो.
‘इंद्रधनुष्य नी एकलव्य धनुष्य ‘ या पावरा बोलीतील कथेत संतोष पावरा हे लेखक शेवटी म्हणतात, ‘लाखो आये द्रोनचार्य, समय अभी डगमगायेगा नाही. नया एकलव्य आ गया हई, दान अंगठे का अभ होगा नही!’ ते असं का म्हणाले, कथा वाचूनच समजावून घ्यायला हवं.
या संग्रहातल्या ‘आठवण’ – माणदेशी बोली- डॉ. कृष्णा इंगोले; ‘उजाले की ईद’- दख्खनी; उमाळा – कोल्हापुरी – सचीन पाटील; आशा अनेक उल्लेखनीय कथा आहेत. खरं तर सगळ्याच २२ कथा वाचनीय आहेत. त्या प्रत्यक्ष वाचूनच त्याची गोडी, नादमाधुर्य, लय अनुभवायला हवी.
यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास, प्रचार, प्रसार व्हायला हवा. ‘मायबोली रंग कथांचे’ हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. या प्रयत्नाची दखल घेऊन की काय, संपादक सचिन वसंत पाटील यांना नुकताच ‘रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार ‘ सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री. सुरेन्द्र रावसाहेब पाटील यांनी प्रदान केला आहे.
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈