श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “वेध अहिल्याबाईंचा” – लेखक : डॉ. देवीदास पोटे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : “ वेध अहिल्याबाईंचा “
लेखक : डॉ. देवीदास पोटे.
प्रकाशक : परममित्र पब्लिकेशन्स
पृष्ठ : ५११
किंमत : रु. ९००/
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती देश वर्षभर साजरा करत आहे. या वर्षात आपणही निश्चित कोठे न कोठे सहभागी होणार असू, काही कार्यक्रम स्वतः घेणार असू… अशा वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा “वेध अहिल्याबाईंचा” हा ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा. ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सर्व दृष्टीनं लिहिलेला ग्रंथ… ज्यात देवींच्या चरित्रापासून त्यांच्यावर लिहिलेल्या कवनापर्यंत… समग्र ! प्रत्येकाच्या घरी असावा असा हा ग्रंथ!
“अहिल्याबाईंची तुलना रशियाची साम्राज्ञी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी होते. ” असं लॉरेन्स म्हणतो….
अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे. ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजाजनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे. अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे. अहिल्याबाईच्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख आहे. पुण्यश्लोक आहिल्याबाई यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचे आणि लोककल्याणकारी कार्याचे पैलू पुन्हा पुन्हा वाचावे, अभ्यासावे, स्मरणात ठेवावे आणि अनुसरावे असे आहेत. हा ग्रंथ आपल्या सर्वांना एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असा विश्वास आहे. *
ग्रंथात एकूण १०९ प्रकरणे, शेकडो संदर्भ ग्रंथ आणि चित्रे आहेत.
त्यातील एक प्रकरण आहे, ‘ अहिल्याबाई :मान्यवरांच्या नजरेतून ! ‘ येथे संक्षेपाने उल्लेख करतोय. जगातील अनेक कीर्तिवंत, बुद्धिवंत, साहित्यिक, विद्वानांनी, राजांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बाबत काढलेले उद्गार या पुस्तकाच्या या एका प्रकरणात आहेत…
महादजी शिंदे म्हणतात, ‘अशा महान मातेच्या पोटी जन्म घ्यावा. ‘ तर प्रथम तुकोजी होळकरांची वाक्य आहेत, ” साक्षात मार्तंड येऊन बोलला तरी मातोश्रींच्या पायाशी अंतर होणार नाही. “
जदुनाथ सरकार लिहितात, “अहिल्याबाईबद्दल माझा आदर माहेश्वरातील त्यांच्याविषयीची कागदपत्रे पाहून अमर्याद वाढला. राज्यपदारुड असता, मालकीची धनदौलत असता साधेपणाने राहणारी, धार्मिक प्रवृत्तीची महिला म्हणजे साक्षात देवी आहे. तिने देवळे बांधली, घाट बांधली, दान धर्मात पुष्कळ पैसा खर्च केला. जमिनी, गावे इनाम दिली. महेश्वरातील त्यांच्या वास्तव्यामुळे महादजी शिंदे सारख्याचा पराक्रम गाजला. तिच्या सहकार्याशिवाय महादजीस राजकारणात महत्त्व मिळाले नसते. “
या प्रकरणात इतर अनेक मान्यवरांची आदरांजली आणि उद्गार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील हा समग्र ग्रंथ प्रत्येकाच्या घरी असावा इतका सुंदर आहे.
ह्या ग्रंथाचे प्रकाशक कै. माधवराव जोशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. त्यांनी हे फार मोठे कार्य केलं आहे… त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈