श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘तिफण’ – श्री दयासागर बन्ने ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तकाचे नाव : तिफण
कवी : श्री दयासागर बन्ने
प्रकाशक : अक्षरवाड्मय प्रकाशन
मूल्य : रू 120/-
तिफण:भावभावनांची गुंफण
अनुभवांच्या विविधतेने नटलेले आणि विविध भावनांनी ओथंबलेले असे अनुभूतीचे पाचशेअकरा क्षण म्हणजे कविवर्य श्री दयासागर बन्ने यांचा ‘तिफण’ हा पाचशेअकरा हायकूंचा संग्रह.नुकताच वाचून झाला. त्यानिमीत्ताने…
शाळेत असताना पाठांतरासाठी अनेक श्लोक असत. दोन किंवा चार ओळींचे. नंतर आठवी ते अकरावी या वर्गात शिकताना संस्कृत भाषेतही दोन किंवा चार ओळींची सुभाषिते असत. हे श्लोक किंवा सुभाषिते त्यांच्या अर्थ पूर्णतेमुळे सहज पाठ होऊन जात. पुढे त्याचा अनेक ठिकाणी उपयोग ही झाला. त्याची आठवण यायचे कारण म्हणजे या ‘तिफणी’ तून बाहेर पडलेले हे टपोरे हायकू!
जपानी साहित्यातून आलेला हा काव्य प्रकार मराठीत रूढ केला तो ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी. त्यानंतर अनेक कवींना हायकू ने आकृष्ट केले. त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे श्री दयासागर बन्ने. आपल्या संग्रहात त्यांनी या काव्य प्रकाराविषयी
माहिती दिलीच आहे. शिवाय संग्रहाचे शेवटी ‘मराठी हायकूंची चौदाखडी’ या लेखात हायकूच्या रचनेचे तंत्र आणि गुपीत सर्वांसाठी उघडे केले आहे. ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल . या लेखात ते म्हणतात, “हायकूतून दृक्-श्राव्य-स्पर्श- गंध संवेदना येणे हे अनुभवांच्या गहिरेपणावर अवलंबून आहे.” या विधानाचा प्रत्यय ‘तिफण’ वाचल्यानंतर येतो.
या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा काव्य प्रकार मूळचा जपानी भाषेतील. पण आपल्या मराठी भाषेत तो रूजवताना शिरीष पै यांच्याप्रमाणे श्री बन्ने यांनीही रचनेमध्ये काही बदल केले आहेत. जपानी भाषेत असलेले पाच सात पाच असे शब्द रचनेचे बंधन न पाळता, अर्थाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे शब्द वापरले आहेत. त्यामुळे वाचकाला कविच्या भावना निःसंदिग्धपणे समजून येतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विषयांचा सर्वस्पर्शीपणा! जपानी हायकू कारांप्रमाणे ते निसर्ग पुरते मर्यादित न ठेवता मानवी जीवनाच्या सर्व अंगांची नोंद घेतात. त्यात निसर्ग तर आहेच पण नात्यागोत्यापासून अगदी ग्लोबलायझेशनपर्यंत सर्व विषय हाताळले गेले आहेत.
काव्यसंग्रहाच्या ‘तिफण’ या नावाचा अर्थ स्पष्ट करणारे श्री विष्णू थोरे यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणिअक्षरवाड्मय प्रकाशनच्या श्रीबाळासाहेब घोंगडे यांनी त्याचे आत्मियतेने केलेले प्रकाशन यामुळे समकालीन मराठी काव्यात मोलाची भर पडली आहे यात शंकाच नाही.
हा संग्रह त्यांनी लहान लहान चौदा विभागात आपल्या समोर ठेवला आहे. कविमनाचे,दुष्काळाचे, नात्यांचे, निसर्गाचे, असे विविध विषय हाताळले आहेत.यापैकी कोणत्याही विभागतील हायकू वाचल्यावर त्यांच्या भावनाशील मनाचे दर्शन होते.
नात्यांच्या हायकू इतकेच गावशिवाराचे हायकू मनातलं बोलून जातात. पाखरांचे आणि निसर्गाचे हायकू वाचताना नजर पुस्तकावर आणि मन खिडकीबाहेर असते. पावसाच्या हायकूत मन चिंब होते तर पडझडीचे हायकू डोळ्यातून पाणी काढतात.सर्वच विभागातील हायकू वाचनीय व स्मरणीय आहेत यात शंकाच नाही.
काव्यसंग्रहाविषयी लिहीताना कविच्या काव्यपंक्ती थोड्या प्रमाणात तरी वाचकाला वाचायला मिळाल्या पाहिजेत असे मला वाटते. त्याशिवाय कविप्रतिभेची लज्जत कशी चाखणार ? त्यामुळे मला इथे काही हायकू उद्धृत करावेसे वाटतात. पण गोंधळ असा होतो की नेमके कोणते तुमच्या समोर ठेवू? एक निवडला तर तो दुसरा का नको असे वाटते. कारण सगळेच चांगले वाटतात. मग ‘लकी ड्रॉ’ करावा लागतो.
काही हायकू नमुन्यादाखल :
कवी मेल्यावर पाऊस येतो
आयुष्यभर पेटला क्रांतीने
त्याला विझवू म्हणतो .
फुटले नाहीत
मेघांना पान्हे
पोरकी राने.
गालावरची खळी
मातीची का खुलली
पावसाची स्वारी आली.
झाडांना वाटतं पाखरांनी
फांद्यावर वसवावं गाव
त्यांची क्षितिजाकडे धाव.
आठवणींचे
साचून दवबिंदू
काळीज सिंधू.
टेबलाखाली
जुळून आले सूत
यंत्रणा भूत.
मेंदू गहाण पडला
जीभ अभिव्यक्तीची गळाली
पुरस्काराची रसद मिळाली.
असे किती सांगू? यावर उपाय एकच. संपूर्ण संग्रहाचे वाचन. अवघ्या तीन ओळींत बरच काही व्यक्त करणारा, सांगून जाणारा हा काव्य प्रकार आपल्या समोर आणल्या बद्द्ल श्री दयासागरजी बन्ने यांना धन्यवाद. त्यांच्या पुढील कसदार साहित्य शेती साठी त्यांना शुभेच्छा!
© श्री सुहास रघुनाथ पंडित, संपादक, ई-अभिव्यक्ति (मराठी)
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुहासराव,
दयासागरांच्या प्रसिद्ध”तिफण”वर आपण खूपच
अभ्यासपूर्ण, योग्य सुंदर भाषेत,प्रभावशाली आणि
महत्वपूर्ण असे खूपच चांगले परिक्षण/समीक्षण केला
आहात.खूप आवडले.आपल्या दोघांचेही अभिनंदन.