श्री राजेंद्र एकनाथ सरग
संक्षिप्त परिचय
संपूर्ण नाव – श्री राजेंद्र एकनाथ सरग
जन्मतारीख – 23 मे 1967
शिक्षण – बी.कॉम, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, सन 1987 पासून विविध दैनिकांत–नियतकालिकांत वेगवेगळया विषयांवर लेखन
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक – “कोपरखळ्या” – श्री बाबू गंजेवार ☆ श्री राजेंद्र एकनाथ सरग ☆
पुस्तक – कोपरखळ्या
व्यंगचित्रकार – बाबू गंजेवार
प्रथम व्यंगचित्र – साप्ताहिक गांवकरी, नाशिक (एप्रिल 1987 मध्ये प्रसिध्द)
प्रकाशक –दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 236
किंमत – 300 रुपये
मनोरंजक आणि प्रबोधनकारी ‘कोपरखळ्या’
व्यंगचित्र हा तसा लोकप्रिय साहित्य प्रकार. पण या विषयावर लिहीणारे आणि व्यंगचित्रे काढणारे खूप कमी आहेत. मराठीमध्ये तर व्यंगचित्रकारांची संख्या शंभराच्या आत आहे आणि लिहीणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके. व्यंगचित्र या विषयावरही खूप कमी पुस्तके आहेत. व्यंगचित्रकार बाबू गंजेवार यांचा ‘कोपरखळ्या’ हा व्यंगचित्रसंग्रह समीक्षक मधुकर धर्मापुरीकर, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, महेंद्र भावसार यांच्या लेखनामुळे आणि बाबू गंजेवार यांच्या मनोगतामुळे तसेच दोनशेहून अधिक व्यंगचित्रांमुळे ही उणीव काही प्रमाणात भरुन काढतो, असे म्हणावे लागेल.
गंजेवार यांची कर्मभूमी मराठवाड्यातील नांदेड जिल्हा. यापूर्वी त्यांचा ‘अक्कलदाढ’ हा व्यंगचित्रसंग्रह, ‘गुल्लेर’ हे विडंबनात्मक पुस्तक आणि ‘चाणाक्ष’ ही ऐतिहासिक कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘कोपरखळ्या’ही वाचकांना आनंददायी अनुभव देण्यात यशस्वी ठरणार, यात शंका नाही. ‘हजार शब्द जे सांगू शकत नाही ते एक व्यंगचित्र सांगून जाते’ हे घासून-घासून गुळगुळीत झालेले वाक्य असले तरी ते या व्यंगचित्रसंग्रहातील प्रत्येक व्यंगचित्राला लागू होते. हे सांगण्याचं कारण म्हणजे व्यंगचित्रकाराचा नि:पक्षपातीपणा. स्वत:ची एक विचारधारा असतांनाही व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र रेखाटतांना त्याचा यत्किंचीतही प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेतलेली दिसून येते.
‘कोपरखळ्या’ या व्यंगचित्रसंग्रहातील राजकीय व्यंगचित्रांबाबत विश्लेषण केले तरी प्रत्येक जण आपापलया कुवतीनुसार, समजानुसार अर्थ काढेल. त्यामुळे राजकीय विषयाला हात न घालता इतर विषयांवरील व्यंगचित्रांवर भाष्य करु. व्यंगचित्रकार गंजेवार यांचे चौफेर वाचन, सभोवताली घडणाऱ्या घटना, प्रसंग यावरील चिंतन आणि मार्मिकपणे केलेले रेखाटन यामुळे प्रत्येक व्यंगचित्र काही तरी संदेश देवून जाते. काही व्यंगचित्रे गालावर हास्याची कळी खुलवतात तर काही अंतर्मुख करुन जातात. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये विनोद, काव्य, नाट्य, कल्पनाशक्ती, विडंबन, उपहास या सर्व गोष्टी आढळून येतात. व्यंगचित्रांत मानवी जीवनाविषयी, समाजजीवनाविषयी निर्माण झालेली जाणीव वाचकालाही जाणवल्याशिवाय रहात नाही. काही व्यंगचित्रे वास्तवाच्या जवळ जाणारी आहेत तर काही निखळ करमणूक करणारी आहेत. काही व्यंगचित्र तत्कालिन परिस्थिती, घटनांवर आधारित असल्याने वाचकांना भूतकाळातील संदर्भ आठवावा लागू शकतो. पण त्यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद आणि ती घटना नव्याने अनुभवण्याची संधी वाचकांना मिळते.
जंगलातील सर्व वृक्षतोड करुन कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर रणरणत्या उन्हात छत्री घेवून घामाघुम होवून बसलेला माणूस, आतंकी धर्म आणि खरा धर्म या दोन पळत्या घोड्यांना आवरु पहाणारी मानवता, महात्मा गांधीजींच्या चरख्यावर चाकू-तलवारीला धार लावतांना दिसणारी छुपी हिंसावादी प्रवृत्ती, पारदर्शक व्यवहारावर विश्वास आहे हे दाखवण्यासाठी स्वत:चा एक्स-रे फोटो लावणारा महाभाग, ‘येथे कचरा टाकणारीचा नवरा मरेल’, अशी पाटी वाचून कचरा टाकणारी आशादायी विवाहित महिला, नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून बैलांना कत्तलखान्यात न पाठवण्याचे आणि स्वत:ही जीव न देण्याचे शेतकऱ्याला वचन मागणारी बैलजोडी, वटसावित्री व्रतामुळे दोऱ्यांनी जखडलेल्या वडाची सुटका करण्यासाठी कात्री हातात घेवून वडाच्या झाडाकडूनच पुढच्या जन्मी बायकोपासून सुटका मागू पहाणारा पिडीत नवरा, पन्नाशीनंतर भेटलेली बालमैत्रिण आणि बालमित्र यांची अवस्था, बायकोसाठी साडी व मोलकरणीसाठी झाडू आणणारा नवरा पण देतांना झालेली गडबड आणि त्यानंतरची त्याची अवस्था, एकही पुरस्कार न मिळणाऱ्या साहित्यिकाचा रद्दीवाल्याकडून होणारा गौरव, मंदीत लागलेला सेल म्हणजे ‘सोने पे सुहागा’ ही बायकोची भावना याउलट हा तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ ही नवऱ्याची प्रतिक्रिया, पायऱ्यांवरुन घसरुन पडलेल्या बापाला उचलण्याऐेवजी त्याची मोबाइलवर व्हिडीओ क्लीप बनवण्याची मानसिकता असलेली आजची पिढी, राज्याच्या एका भागात पाण्यासाठी आसुसलेली जनता तर दुसरीकडे पाण्यामुळे डोळ्यांत आसू असलेली जनता, ‘कोरोना’ म्हणजे मरीआईने सूया टोचून फेकलेले लिंबू म्हणून गैरफायदा उचलू पहाणारा भोंदूबुवा ही सारी व्यंगचित्रे मूळातून पहाणे एक वेगळाच अनुभव आहे.
व्यंगचित्राची ताकद काय आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. हिटलर, मुसोलिनीसारखे हुकूमशहा व्यंगचित्रकाराला घाबरत असत. जिवंतपणी असणारी ही दहशत इतकी आहे की एका राजकीय नेत्याच्या पिंडदानाच्या वेळी व्यंगचित्रकार उपस्थित असल्याने त्याच्या पिंडाला कावळाही शिवायला घाबरत आहे. व्यंगचित्रकाराबाबत दहशत वाटली नाही तरी चालेल पण त्याच्याविषयी आदरयुक्त भीती समाजाला वाटली पाहिजे, अशी आशा आहे.
एखाद्या पुष्पगुच्छामध्ये वेगवेगळ्या रंगाची, सुगंधाची, आकाराची फुले योग्य जागी मांडून सजावट केलेली असते, तशीच ‘कोपरखळ्या’ या व्यंगचित्रसंग्रहात निखळ आनंद देणारी, संवेदना जागृत करणारी, चिंतन करायला लावणारी, मार्मिक भाष्य करुन वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी, कल्पनाशक्तीच्या ताकदीची जाणीव करुन देणारी अनेक व्यंगचित्रे आहेत.
© श्री राजेंद्र एकनाथ सरग
9423245456
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈