सुश्री सुमती जोशी

☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’  – डॉ शंतनू अभ्यंकर ☆ सुश्री सुमती जोशी  ☆ 

फादर टेरेसा आणि इतर वल्ली

पुस्तकाचे नाव : फादर टेरेसा आणि इतर वल्ली

लेखक  : डॉ शंतनू अभ्यंकर

प्रकाशक : समकालीन प्रकाशन

मूल्य : रू 160/-

पृष्ठ संख्या – 130 

ISBN13: 9789386622662

पुस्तक परिक्षण  : सुश्री सुमती जोशी 

‘फादर टेरेसा आणि इतर वल्ली’ हे डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेलं समकालीन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. ‘फादर टेरेसा’ हे शीर्षक ऐकल्यावर वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. मदर टेरेसा माहितेय, पण फादर तेरेसा ही काय भानगड? डॉक्टर त्याचं स्पष्टीकरण देतात. खाष्ट, उंच, धिप्पाड नर्स. आवाज आणि बोलणं सारं पुरुषी. ‘नर्स कसली, नरसोबाच तो! म्हणून फादर टेरेसा’ असं सांगून ते तिचं व्यक्तिमत्त्व शब्दांच्या माध्यमातून साकार करतात. भुलेश्वर अनॅस्थटीस्ट प्राणसख्याविषयी इतक्या तळमळीनं लिहिलंय की कोणत्याही ऑपरेशनमध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व डॉक्टर प्रांजळपणे कबूल करतात. प्रसू ही गरोदर महिला आपल्या डॅनिष नवऱ्याबरोबर येते. बाळंत होईपर्यंत वरचेवर भेटायला येते. तिचे प्रश्न, मनातल्या शंका, हक्क याविषयी चर्चा करते आणि डॉक्टरांना पेशंटच्या हक्कांची जाणीव करून देते. कोणताही आडपडदा न ठेवता डॉक्टरांनी हे नमूद केलंय. असा हा अनोखा पेशंट प्रत्यक्ष भेटलाय, असा भास वाचकांना होत राहतो. महाडचे पेशंट चाफेकर बंधू, पण त्यांची नावं दाऊद, बशीर, रहीम. कोकणी मुसलमान. त्यांची भाषा आपलीच भाषा असल्याच्या थाटात डॉक्टर त्यांची कथा आपल्याला सांगतात. सय्यद गलाह हा अफगाणिस्तानातून आलेला, इंग्रजीचा गंध नसलेला विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि डॉक्टरांचा मित्र बनतो. नियतीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्याच्या जीवनाची कशी फरपट होते हे त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने साकार दिलंय. जीवनात नाटक आणि नाटकाच्या अनुषंगानं येणारे इतर विषय हेच जीवनसर्वस्व असणारे ‘मास्तर’ म्हणजे एक अवलिया. हे सदाहरित मास्तर सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. ‘नाटक संपल्यावर गप्पांचा फड जमतो आणि हा चौथा अंक कधीकधी नाटकापेक्षा रंगतदार होतो’, असं लेखक म्हणतात तेव्हा आपण त्या आनंदाला मुकलोय, अशी हुरहूर वाचकांना वाटत राहते. गर्भपात करून घ्यायला आलेली कुंती, डॉक्टर च्यायला, चक्रधर, कुलीओ अशा एकापेक्षा एक सरस व्यक्ती आणि वल्लींचा परिचय डॉक्टर अचूक शब्दात करून देतात. ‘नाना’ हे त्यांच्या आजोबांचं व्यक्तिचित्र वाचल्यावर मला माझे आजोबा आठवले. त्यांचं धारदार बोलणं, तिरकस विनोद, पुण्याचा चालता बोलता शब्दकोश असलेल्या नानांचं शब्दचित्र अतिशय ह्रदयस्पर्शी झालंय.

अशी चित्रविचित्र माणसं आपल्यालाही भेटतात. पण ती शब्दबद्ध करायला भाषेवर विलक्षण प्रभुत्त्व असावं लागतं. त्या माणसाच्या मनात शिरता यावं लागतं. भाषा हवी तशी वळवता यावी लागते. इंग्लिश मिडीयममध्ये शिकूनही त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मराठीची गोडी लावली. टी.व्ही. नसलेल्या त्या काळात आपलं वाचनवेड जोपासत त्यांनी सर्वस्पर्शी वाचन केलं. त्याचाच परिपाक आणि प्रचीती या पुस्तकाच्या पानोपानी येत रहाते. अवश्य वाचावं असं हे पुस्तक.

 

सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments