सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लेखननामा’ – माधुरी शानभाग ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
पुस्तकाचे नाव :लेखननामा
लेखिका :माधुरी शानभाग
पृष्ठ संख्या : 175
मूल्य : रु 210
प्रकाशक : सुप्रिया शरद मराठे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
‘लेखननामा’ हा माधुरी शानभाग यांनी स्वतःच्या लेखनप्रवासाचा तटस्थपणे घेतलेला मागोवा आहे. तरुण भारत अक्षरयात्रेत प्रसिद्ध होणाऱ्या ‘लेखननामा’ या सदरातील लेखांचा हा संग्रह आहे.
माधुरी शानभाग यांनी वाङ्मयाचे अनेक प्रकार हाताळले आहेत आणि हात लावला, त्या प्रकाराचे सोने केले आहे. उदा.कथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या, ललित लेख, चरित्रं, बालसाहित्य, पुस्तकपरिचय, अनुवाद, एवढंच नव्हे, तर ‘फ्रॅग्रन्स ऑफ द अर्थ -पोएम्स ऑफ बहिणाबाई चौधरी’ हा बहिणाबाईंच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद वगैरे. केवळ सतरा वर्षांत त्यांची चव्वेचाळीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
सायन्सच्या प्राध्यापिका (आणि नंतर प्राचार्यही)असल्यामुळे ‘लेखननामा’ मधील लेखन पद्धतशीर, मुद्देसूद, शिस्तबद्ध झाले आहे. प्रत्येक प्रकाराविषयी लिहिताना, त्या प्रकारच्या लेखनाची सुरुवात कशी झाली, इथपासून ते वापरलेली लेखनाची पद्धत, पायऱ्या यांचे व्यवस्थित विवेचन त्यांनी केले आहे.त्या त्या संदर्भातील पारिभाषिक शब्दांचाही (उदा. अनुवादाची स्रोत भाषा व लक्ष्य भाषा )सामान्य वाचकांसाठी खुलासा केला आहे.
थोडक्यात सांगायचं, तर हे पुस्तक म्हणजे नवलेखकांसाठी उत्तम मॅन्युअल आहे. हे वाचून कोणाला आपली लेखनउर्मी शोधण्याची इच्छा झाली, तर या लेखनचरित्राचे सार्थक झाले, असे खुद्द माधुरी शानभाग यांनीच म्हटले आहे.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈