☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार ☆ परिचय – श्री विनय माधव गोखले ☆
पुस्तकाचे नाव : शोध
लेखक : श्री मुरलीधर खैरनार
पृष्ठ संख्या : 515
मूल्य : रु 510
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
अमेज़न लिंक >> ‘शोध’ – श्री मुरलीधर खैरनार
शोध – एक ऐतिहासिक रहस्यकथा
“१६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली तेव्हा त्या खजिन्याचा एक मोठा भाग गोंदाजी नारो ह्या त्यांच्या सरदाराने परतीच्या वाटेत असताना मोंगलाच्या हाती सापडू नये म्हणून बागलाण प्रांतातील डोंगराळ भागात लपवून ठेवला होता. त्याचा एक नकाशा त्याने बनवला पण तो स्वत: मोगलांच्या हाती सापडून मारला गेला व तो नकाशा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचूच शकला नाही. गेली ३५०+ वर्षे अनेक पिढ्या ह्या अब्जावधींच्या खजिन्याचा शोध घेत आहेत पण तो अजूनपर्यंत कुणाला सापडलेला नव्हता.
हा धागा पकडून सुरू झालेली कथा वेग पकडते ते क्लारा ग्रेंजर ह्या ब्रिटिश इतिहास संशोधिकेचा मुंबईतील आलिशान हाॅटेलात खून होतो त्यानंतर… आणि तिथून सुरू झालेली ही रहस्यमालिका आपल्याला कसारा, नाशिक, दिंडोरी, कळवण, बांद्रा, सातमाळ्याच्या पर्वतरांगांतील, अहिवंत, अचला, कोळदेहर, सप्तश्रुंग आदि गडदुर्ग, तिथले आदिवासी व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथा अशा विविध प्रांतांतून फिरवत राहते.
कूटनीती, राजकारण, पैसाकारण, पाठलाग, खून ह्यांचे एकापाठोपाठ एक सत्र सुरू होते आणि ही वेगवान कथा वाचकांस अक्षरश: खिळवून ठेवते.
खजिन्याच्या गुप्त रहस्याचा भेद करताकरता लेखकाने जवळजवळ ५०० पानी पुस्तक लिहीले आहे.
त्याआधी पुस्तकामधूनच आपल्याला थोडे सुरतेच्या इतिहासात डोकवावे लागते. त्याकाळी हिंदुस्तानातील ८० टक्के निर्यात त्याकाळी एकट्या सुरतेच्या बंदरातून होत असे. म्हणूनच इंग्रज, पोर्तुगीजांनी, गुजराती व्यापार्यांनी सुरतेमध्ये स्वत:च्या मोठाल्या वखारी उभ्या केल्या होत्या. त्यांची सुरक्षेची जबाबदारी होती मोगलांकडे आणि त्याबदल्यात मोगलांना घसघशीत धनप्राप्ती होत असे. ही सर्व माहिती हेरांमार्फत शिवाजी महाराजांना समजली होती.
पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांनी पुढील जवळपास दीड वर्षे मोहिमेची आखणी हेरांमार्फत सुरू ठेवली होती. सर्व मोठमोठे व्यापारी खजिना कुठे दडवीत होते ही बित्तंबातमी हेरांनी मिळवली होती. सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेच्या आजुबाजूच्या खेड्यांमधील वाड्यांत काहींनी संपत्ती दडवली होती, तीही माहिती काढली होती. सुरतेची दुसरी लूट अवघ्या तीन दिवसांत उत्तम नियोजन पद्धतीने पार पाडली गेली आणि सुरत जवळपास रिकामी झाली होती. खजिन्यामध्ये मुख्यत्वे शुध्द सोन्याच्या लडी, ठोकळे, विटा, सोन्याचांदीची बहामनी, अरबी, फारसी, युरोपियन नाणी, दागिने, हिरे-माणके, पाचू आदींचा समावेश होता.
शिवाजी महाराजांनी परतीचा मार्ग वेगळा आखला होता आणि सैन्याचे व लुटीचे दोन-दोन भाग केले होते… एक भाग मोरोपंत पिंगळे आणि स्वत: बरोबर तर दुसरा गोंदाजीच्या तुकडीकडे दिला.
मोगलांशी लढत देत महाराज स्वत: राजगडावर सुरक्षित पोहोचले.
परंतु सुमारे ७००० घोड्यांच्या पाठीवर खजिना लादून आणताना गोंदाजीचा परतीचा मार्ग बराचसा मोगलांच्या ताब्यातील प्रदेशातून जात होता. त्यामुळे तो सुरक्षित आणणे गोंदाजीला जिकिरीचे आणि धोक्याचे होते. त्यातच सुरतेमधील मोगली सरदाराने साल्हेर किल्याच्या मोगली किल्लेदारास पुढे येणार्या खजिन्याची वर्दी धाडली होती आणि स्वत: खजिन्याचा पाठलाग सुरू केला. एवढी लूट हातातून सहजासहजी जाऊन कोण देईल? पिछाडीकडून आणि दोन्ही बाजूंनी हल्ले करून गोंदाजीचे सर्वच्या सर्व सैन्य कापून काढले. पण त्याआधीच गोंदाजीने सर्व खजिना लपविण्यात यश मिळवले होते. मोगलांना सर्व ७००० घोडे माळरानावर रिकामे साडून दिलेले मिळाले पण पाठीवरील सर्व लूट गायब होती.
तात्पर्य म्हणजे, मोरोपंत पिंगळे ह्यांच्या कडील १/३ लूट लोहगड-राजगडावर पोहोचली पण गोंदाजीकडील २/३ भागाचा अजिबात शोध लागला नाही; ना सुरतेतील व्यापार्यांना, ना मोरोपंत पिंगळ्यांना, ना पुढच्या पिढीतील मराठ्यांना, ना मोगलांना, ना पेशव्यांना, ना इंग्रजांना. पुढेपुढे मग लोकांनी हा शोध घेणेच सोडून दिले. काहींचे असेही म्हणणे पडले की असा काही खजिना नव्हताच, गोंदाजीची केवळ दंतकथा आहे वगैरेवगैरे.
तीन वर्षांच्या अभ्यासानंतर जुलै २०१५ साली प्रकाशित झालेली ही भन्नाट खजिनाशोध कथा आहे. गडदुर्ग आणि इतिहासाची आवड असलेल्यांनी वेळ काढून जरूरजरूर वाचावी.”
सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून अभ्यासवृत्ती देण्यात आली होती. ही अभ्यासवृत्ती प्रतिष्ठानने जाहीर केल्यानंतर ती मिळविणारे मुरलीधर खैरनार हे पहिले मानकरी होते.
© श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈