श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ इन्शाअल्लाह… श्री अभिराम भडकमकर ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

पुस्तकाचे नाव – इन्शाअल्लाह

प्रकाशक – राजहंस प्रकाशन

लेखक  – अभिराम भडकमकर

पृष्ठ संख्या – 325

मूल्य – रु 350

इन्शाअल्लाह (एक आस्वादन) : पुस्तक परिचय

अलीकडेच एक नवीन चांगले पुस्तक वाचनात आले. “इन्शाअल्लाह.” लेखक अभिराम भडकमकर. तळा- गाळातल्या मुस्लीम समाजातील लोकांच्या स्थिती-गतीचे, दु:ख-दैन्याचे प्रातिनिधिक म्हणता येईल असे दर्शन यात घडते. अल्लाह, महजब, कुराण आणि शरीयत या चौकटीत हा समाज बंदिस्त आहे. शरीयतचे कायदे, कयामताचा (अंतीम न्याय-निवाड्याचा दिवस), त्यानंतर मिळणार्‍या जन्नतचे( स्वर्ग) स्वप्न किंवा दोजख (नरक) या पलीकडे त्यांच्या विचाराची धाव जात नाही. किंबहुना, तशी ती जाऊच नये असा समाजातील काही पुढार्‍यांचा प्रयत्न आहे. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी त्यांचं आयुष्य जखडून ठेवलय. जन्नतची कल्पना करता करता आपलं सध्याचं वास्तव आयुष्यच दोजख होऊन गेलय, याची त्यांना गंधवार्ताही नाही. स्त्रियांची परिस्थिती तर त्याहूनही करूणाजनक. त्या बुरख्यात कैद. ना विद्या. ना सन्मानाने जगण्याची संधी. ती खतावन.. .. बाई जात. सतत पुरुषी वर्चस्वाखाली तिने राहायचं. तीन तलाकाची टांगती तलवार सारखी डोक्यावर. पोटगी नाही. स्त्री म्हणजे मुलं जन्माला घालणारं आणि मरद जातीसाठी राबणारं मशीन अशीच समाजाची धारणा आहे.

या कादंबरीतील मुमताजचं चित्रण हे सर्वसामान्य मुस्लीम स्त्रीचं प्रातिनिधिक चित्रण आहे, असे म्हणता येईल. मुमताजचा नवरा उस्मान मुमताजच्याच घरात काही काम-धंदा न करता राहतो आहे. दारू, पत्ते यात वेळ घालवतो आहे आणि नवरा म्हणून मुमताजवर आरडा-ओरडा करतो आहे. तिला मारहाण करतो आहे, पण त्याला तलाक देण्याचा तिला अधिकार नाही. पुरुष मात्र कधीही मनात आलं की तलाक देऊ शकतो.    

वरील परिस्थिती बदलली पाहिजे. शिक्षणाची कास धरली पाहिजे. समान नागरी कायदा झाला पाहिजे, असं म्हणणारी रफिकसारखी सुधारणावादी तरुण मंडळी यात आहेत. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या कायद्याचा आज उपयोग नाही. “मी अल्लाह, मजहब, कुराण, शरीयत, काही मानत नाही. मी अल्लाहची पैदाश नसून निसर्गाची पैदाईश आहे,” असं म्हणणारा रफिक  मुसलमानांच्या दृष्टीने काफीरच आहे, पण तो आणि त्याची ‘फतेह’ संस्था मुस्लीम समाजाच्या  उन्नतीसाठी तळमळीने कार्य करते आहे. त्याच्या विचाराने झुल्फीसारखे अनेक तरुण भारलेले आहेत. त्यांनाही सुधारणा व्हाव्यात असं वाटतय, पण त्या धर्माच्या चौकटीत राहून व्हाव्यात, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना विरोध करणारेही कट्टर मुसलमान यात आहेत. मुसलमानांचा हक्क आणि अधिकार याविषयी जागरूक असणारी उदारमतवादी सेक्युलर मंडळी यात आहेत. हिंदूंच्या अंधश्रद्धेवर टीका करणार्‍या, पण मुसलमानांच्या अंधश्रद्धेबाबत ब्रही न काढणार्‍या या सेक्युलर मंडळींची कुचेष्टा करणारी कडवी हिंदुत्ववादी मंडळी आहेत. मुसलमानांनी आपला वेगळेपणा न राखता मुख्य प्रवाहात सामावून जायला हवं, असं मनापासून वाटणारे मोकळ्या मनाचे तरुण हिंदू युवक यात आहेत.

रहीमनगर वस्तीत ही कथा घडते. वस्तीतला तरुण मुलगा जुनैब गायब असतो. पोलीस त्याला पकडण्यासाठी येतात. बॉम्बस्फोट घडवून स्टेशन उडवून लावण्याच्या कटात तो सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. आपला साधा सरळ मुलगा असं कधीच करणार नाही, याची त्याच्या अम्मीला म्हणजे जमिलाला खात्री आहे. जुनैब सापडत नाही, पण वस्तीतल्या काही तरुण मुलांना पोलीस घेऊन जातात. त्यांना सोडवण्यासाठी मोमीन वकिलांना बोलावलं जातं. मोमीन सल्ला देतो, की पोलिसांविरुद्ध तक्रार करायची, की गेले सहा महीने, मोहल्ल्याची जागा बिल्डरला लिहून द्या, असं पोलीस धमकावताहेत. अल्लाहच्या नावाने टाहो फोडणारे, अल्लाहला खोटं चालत नाही म्हणणारे मूलतत्ववादी, मोमीनचं म्हणणं मान्य करतात. सगळा मोहल्ला त्याच्या बाजूने होतो. एकटी जमीला कणखरपणे नकार देत म्हणते. ‘ऐसा कुछ हुवाच नही. क्या ऐसा सच अल्लाह कबूल करेगा?’ ती कणखरपणे म्हणते.

‘छोकरोंको छुडाना है तो ऐसा करनाच पडेगा’,  ते म्हणतात. ती तक्रार अर्जावर सही करायला नकार देते. मोर्चा निघतो. तक्रार अर्ज दिला जातो. पण कादंबरीच्या शेवटापर्यंत जुनैदचा शोध लागत नाही की मुलं सुटत नाहीत. या घटनेकडे वेगवेगळ्या संघटना कसं बघतात, एकाच घटनेचे वेगवेगळे अर्थ कसे लावले जातात, याची छान मांडणी या पुस्तकात केली आहे.

रहीमनगरच्या वस्तीत झुल्फी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यांसारखी झालेली लोकांची मने आणि मेंदू– त्याला वाट काढून प्रवाहीत करण्याचा तो प्रयत्न  करतो. रक्तदान शिबीर, गप्पा-संवाद-चर्चा यासारखे कार्यक्रम, उपक्रम सातत्याने राबवतो. वस्तीतील लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यांनी विचार केला पाहिजे, यासाठी तो प्रयत्नशील आहे. धर्माच्या चौकटीत राहून तो हे करतोय, त्यामुळे त्याला वस्तीतल्या सामान्य लोकांचा पाठिंबाही आहे. कोल्हापुरात होणार्‍या साहित्य संमेलनासाठी तो वस्तीत कार्यालय सुरू करतो. यात रफिक भाईंच्या विचारांवर आधारित चित्ररथ काढायचे  ठरवतो. असे अनेक उपक्रम तो आयोजित करतो. त्या निमित्ताने चर्चा होते. लोकं विचार करू लागतात. आपली मतं मांडू लागतात. कादंबरीच्या शेवटी त्याने तिथे जे पेरलं, ते उगवून आलेलं दिसतं. कट्टर मुसलमानांचा त्याला विरोध होतो. अडथळे आणले जातात, पण वस्तीतील सगळे तरुण, बायका, मुले त्यांना विरोध करत चित्ररथ पुढे नेतात. बायका-मुलींनी बुरखा काढलेला आहे. चित्ररथ पुढे नेताना घोषणा दिल्या जातात,

‘नये दौरके साथ चलेंगे

इन्शाअल्लाह—अल्लाहकी यही मर्जी है॰

हम जिहादी आमनके

इन्शाअल्लाह

सब पढ़ेंगे सब बढ़ेंगे

इन्शाअल्लाह’

चित्ररथ पुढे जातो. कादंबरी संपते. विचारप्रधान, वास्तववादी अशी ही सामाजिक कादंबरी आहे. कादंबरीमधे संवादासाठी कोल्हापुरात बोलली जाणारी बगवानी बोली वापरली आहे. मूळ  आशयाशी ती अगदी समरस झाली आहे. लेखकाची मीडियावर चांगली पकड असल्याने त्यातले विचार, वाद-विवाद आपण प्रत्यक्ष त्या त्या टोळक्यात जाऊन, तिथे बसूनच ऐकतो आहोत, असं वाटतं. तसेच झुल्फी, जमिला, मुमताज, रफिक, फिदा, शिखरे यासारख्या सार्‍याच व्यक्तिरेखाही प्रत्यक्षदर्शी झाल्या आहेत.

प्रत्येकाने एकदा तरी वाचून आनंद घ्यावा, असं म्हणण्यापेक्षा सध्याची परिस्थिती समजून घ्यावी, यासाठी ही कादंबरी वाचावीच असं मी म्हणेन.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments