? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘गावठी गिच्चा’ – श्री सचिन वसंत पाटील ☆ श्री राजेंद्र भोसले ☆ 

पुस्तकाचे नाव: ‘गावठी गिच्चा’ (कथासंग्रह)

लेखक :             श्री सचिन वसंत पाटील

प्रकाशक:           तेजश्री प्रकाशन, पुणे

प्रकाशन:             प्रथमावृत्ती- 16 नोव्हेंबर 2020

पृष्ठे:                     144

किंमत:                रु 200/—.

ग्राम जिवन चित्रित करणारा कथासंग्रह: गावठी गिच्चा ~ श्री राजेंद्र भोसले.

सचिन वसंत पाटील यांचा ‘सांगावा’ व ‘अवकाळी विळखा’ हे दोन कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत.  आता त्यांचा ‘गावठी गिच्चा’ हा तिसरा ग्रामीण कथासंग्रह नुकताच साहित्य दरबारात रुजू झाला आहे.

प्रत्येकाला आपला गाव म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. सचिन पाटील यांनीही गावगाड्यातील आपले अनुभव कथेत शब्दबद्ध केलेले आहेत. शेतकरी हा घटक केंद्रस्थानी लिहून सचिन पाटील यांनी अनेक समस्यांची डोळसपणे कथेत गुंफण केली.

‘उमाळा’ या कथेत पुष्पाअक्का ही रामभाऊंची सावत्र बहीण. तोंडाने फटकळ, शीघ्रकोपी परंतु मनाने मात्र निर्मळ अशी व्यक्तिरेखा रेखाटली आहे. ती एकदा माहेरी भावाकडे येते त्या वेळी भावालाही हक्काने भांडते. त्या वेळी रामभाऊंचे विहिरीचे काम चालू असते. विहिर प्रमाणापेक्षा जास्त खोदूनही पाणी लागत नाही. अनेकांनी विहिरीला ‘उमाळा’ म्हणजे ‘झरा’ लागणार नाही, असा अंदाज व्यक्त केलेला असतो.  रामभाऊंनीही अपेक्षा सोडलेली असते. बहीण मात्र भावाचे शुभ चिंतते. तिच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात, ‘तुला पाणी लागणारऽ… चांगल्या गोड्या पाण्याचा उमाळा लागणारऽ…’ रामभाऊंना हे खरे वाटत नाही. परंतु विहिरीला पाणी लागल्याचे समजताच आपल्या भोळ्याभाबड्या बहिणीने केलेली भविष्यवाणी आठवून रामभाऊंच्या डोळ्यांत पाणी येते.  विहिरीच्या उमाळ्याबरोबर आपल्या बहिणीच्या मायेचा उमाळाही त्यांच्या मनी दाटून येतो.

‘कोयता’ या कथेत सुलूच्या मनाची घालमेल मांडलेली आहे. आपले शिलरक्षण करण्यासाठी ती हातात कोयता घेते.  ‘डोरलं’ या कथेत सवी या विधवेची अवस्था लेखकाने चपलखपणे मांडली आहे. आपले चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी ती अखेर आपलं डोरलं विकण्याचा निर्धार करते. शीर्षक कथा ‘गावठी गिच्चा’ या कथेत शिवा व त्याची बायको लक्ष्मी यांच्यातील एकमेकांचा घेतला जाणारा सूडही ग्रामजिवनातील विसंगती टिपताना दिसतो. विनोदी अंगाने लिहिलेल्या या कथेत ग्रामीण भागातील बेरकीपणा अधोरेखित झाला आहे. ‘दंगल’ या कथेत जातीय दंगलीतही गावातील विविध धर्माचे लोक माणुसकीचे कसे दर्शन घडवतात हे दाखवले आहे. याशिवाय ‘करणी’, ‘चकवा’, ‘तंटामुक्ती’, ‘टोमॅटो कॅचप’ अशा एकापेक्षा-एक सरस डझनभर कथा या संग्रहात आहेत.

पाटील यांच्या कथेतील काही वाक्ये ग्राममनाचा अस्सलपणा दर्शवतात. जसेकी- ‘अंधार अस्वलाच्या पावलांनी आला’, ‘काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं’ ‘एका मापाचं लंब-गोलाकृती कॅप्सुलसारखं उसाचं बारीक-बारीक तुकडे’, ‘ज्ञानूच्या तोंडाला चळाचळा पाणी सुटायला लागलं’, ‘पायरी आंब्याचा आमरस म्हटलं की मेल्याली उठंल’ इ.   

काही इंग्रजी शब्दही ग्रामीण भागात रूढ झाले आहेत. त्या शब्दांचा वापर लेखकाने कुशलतेने केल्यामुळे कथानकाला नैसर्गिकता प्राप्त झाली आहे. उदा.- ‘पॉलिश’, ‘स्टँड’, ड्रायव्हर’, सेकंडहँड’,‘विक पॉइंट’, ‘कॅप्सूल’, ‘पब्लिक’, ‘फर्मान’ इ.

गावगाड्यात येणार्‍या समस्यांबरोबरच लेखकाने विनोदी शैलीत काही समस्यांचे निराकरण केलेले आहे, हे या कथासंग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लेखकाची शैली प्रवाही असून अस्सल गावरान भाषा त्यांच्या लेखणीतून पाझरते. त्यांच्या कथा वाचनीय असून आसू व हसू याच सुरेख मिश्रण त्यांच्या कथांत पाहावयास मिळते.              

ज्ञानेश बेलेकर यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ बोलके व समर्पक आहे. ‘गावठी गिच्चा’ चे रसिक वाचक नक्कीच स्वागत करतील, यात संदेह नाही. सचिन पाटील यांच्या साहित्यप्रवासात या निमित्ताने शुभेच्छा.

© श्री राजेंद्र भोसले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments