? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘काव्यमनीषा’ – सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆ परिचय – श्री आनंदहरी ☆ 

 

कवितासंग्रह – काव्यमनीषा

कवयित्री – सौ. मनीषा रायजादे-पाटील(९५०३३३४२७९)

प्रकाशन – साहित्य संपदा मुबंई

पृष्ठे –९६

किंमत – १३० रू .

——मातीशी, माणुसकीशी नाळ जपणारी कवयित्री मनीषा रायजादे यांची कविता

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुका म्हणजे खऱ्या अर्थाने आजही साहित्य पंढरी आहे.. ज्येष्ठ साहित्यिक चारुतासागर आणि ज्येष्ठ कवी गो.स. चरणकर यांच्या भूमीतील अनेक साहित्यिकानी आपला वेगळा ठसा उमटवून स्वतःच्या आणि या दोन साहित्यिक दिग्गजांच्या नावाची ध्वजा मराठी मुलखात  उत्तुंग फडकत ठेवलेली आहे.. कविवर्य गो.स.चरणकर यांनी कवितेत आपले अनेक वारस मराठी कवितेला दिले आहेत .. त्यातील एक नाव म्हणजे कवयित्री मनीषा रायजादे. मनीषा रायजादे देशिंग-हरोली येथील श्री महालक्ष्मी विद्यालय येथे शालेय शिक्षण घेत असताना तेथे कविवर्य कै.गो स.चरणकर हे त्यांना शिक्षक होते. चरणकर सर स्वतःच्या घरी संस्कार वर्ग घेत होते.. त्यातून विद्यार्थ्यांची आवड पाहून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करीत असत.. त्यांनी कविता लेखनाचे बीज रायजादे यांच्यासह अनेकांत रुजकले, फुलवले, जोपासले.. साहित्यिक प्रा. यशवंत माळी सर यांचेही मार्गदर्शन मनीषा रायजादे यांना मिळत राहीलं.

कवयित्री मनीषा रायजादे या छत्रपती शिवाजी विद्यालय, मिरज येथे शिक्षिका असून त्यां सातत्याने गेली  वीस वर्षे काव्यलेखन करीत आहेत. त्यानी विविध विषयांवर काव्यलेखन केलेलं असून..अनेक काव्यस्पर्धेमध्ये त्यांच्या कवितांना पारितोषके प्राप्त झालेली आहेत.. त्यांचा साहित्यिक मित्र परिवार खूप मोठा आहे.. शब्दांशी आणि साहित्यिकांशी मैत्र जोडणे हा त्यांचा स्वभावच आहे. त्यानी अनेक साहित्य संमेलनामधून, कविसमेलनातून आपली कविता सादर करून उपस्थित साहित्यिक व काव्यरसिकांकडून दाद मिळवली आहे. यवतमाळ येथे संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात  निमंत्रित कवयित्री म्हणून त्यां सहभागी होत्या. त्यांच्या कवितांची दखल अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेली दिसून येते.

कवयित्री मनीषा रायजादे यां शब्दांवर कधी आईच्या ममतेने माया करतात, कधी सखी होऊन प्रेम करतात तर कधी त्यांच्यातीक शिक्षिकेच्या काहीशा आग्रही, कडक तरीही मायाळू वृत्तीने वागताना दिसून येतात. त्याची नाळ ही गावातील कृषीपरंपरेशी, निसर्गाशी माणुसकीशी जोडलेली आहे ती त्यांच्या कवितेतून , गझलांतून जपताना दिसतात.. त्यांची कविता त्यांची स्वभावसाक्षी होऊन प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यलेखनात विविध विषयावर त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे.. त्याची कविता सकारात्मक, आशावादी असून ती अनेकदा संत. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाशी, जगतगुरु संत तुकोबारायांशी, संत जनाबाई, बहिणाबाई, यांच्याशी आपलं नाते जोडते..

ग्रामीण आणि नागर जीवनातील भवताल , अनुभवविश्व त्यांना लाभलेले आहे ते त्यांच्या कवितेतून प्रकट होताना दिसून येते.. 

निसर्ग आणि मातीशी, कृषिपरंपरेशी त्यांची असणारी नाळ त्यांच्या अनेक कवितांमधून शब्दबद्ध होताना दिसून येते.. कविता बोलू लागली  या कवितेत त्या म्हणतात,

ओल्या गंधित मातीच्या गर्भात

अंकुरल्या बीजांच्या मायेची बहार

अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांमुळे आजचे वर्तमान हे मन व्यथित करणारे, मनात चिंता निर्माण करणारे आहे पण त्याची कविता ही निराशवादी नाही..नित्य आसमानी आणि सुलतानी संकटाशी तोंड देत असतानाही सकारात्मकता आणि आशावाद मनात रुजवून जगणाऱ्या बळीराजाच्या घरात त्याचा जन्म झाल्याने तिच वृत्ती त्यांच्या धमन्यांतून आणि कवितेतून वाहताना दिसून येते ..

रात्र काळोखी जरी ही दाटते आहे

पेटणारे दीप आता आठवावे तू

                       ( आठवावे तू …) 

किंवा

थकली जरी पाऊले ही

वाट जोमाने चालायची

                    ( जीवनाच्या वाटा )

असा सकारात्मक भाव घेऊन त्यांची कविता येते..सकारात्मकता, आशावाद हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे.

ग्रामीण कृषी जीवनात अजूनही माणूस माणसाशी जोडला गेलेला आहे.. धर्म, जात, पंथ यातील राजकारणामुळे, जाणीवपूर्वक पसरवल्या जात असलेल्या विद्वेषामुळे माणूस माणसापासून दुरावत चाललाय यामुळे त्या व्यथा होतात.. पण तरीही मानवतेचा ध्वज उत्तुंग फडकवत ठेवण्याची त्यांची मनीषा त्यांच्या कवितेतून ठायी ठायी दिसून येते.

आज जो तो म्हणतोय

माझा धर्म, माझी जात

माणूसच करतोयमाणसाचा की हो घात

                           ( हरवली माणुसकी)

 जन्म मानवाचा । लावावा सार्थकी

धर्म माणुसकी ! जोपासावा ।।

                                       (जनसेवा )

अशा शब्दांत माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे आणि तो जोपासायला हवा असे प्रतिपादन त्या आपल्या कवितेतून  करतात.

माणसाच्या वृत्ती -प्रवृत्तीवर लिहिताना त्या आपल्या ‘माणसे ‘ या गझल मध्ये म्हणतात,

तोडून सर्व नाती छळतात माणसे

दुसऱ्यावरी सदा ही जळतात माणसे

असे असले तरी निराश न होता त्या मनात आशावाद जोपासताना दिसून येते.. हाच आशावाद माणसाचा स्थायीभाव आहे.. त्याच्या जगण्याचे कारण आहे. हा आशावाद आपल्या गझलरचनेतून व्यक्त करताना , शब्दबद्ध करताना कवयित्री मनीषा रायजादे लिहितात,

आशेवरी सुखाच्या जगतात माणसे

स्वप्नांत मोरपंखी रमतात माणसे

                                   ( माणसे )

वैविध्यपूर्ण आणि सातत्याने कवितालेखन- गझल लेखन करणाऱ्या कवयित्री मनीषा रायजादे पाटील यांचा ‘ काव्यमनीषा ‘ हा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रकाशित झाला असून त्यांचा गझल संग्रह ही लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.. कवयित्री मनीषा रायजादे-पाटील यांचे त्यासाठी अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छाही !

 

प्रस्तुति – श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments