सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ मोठी तिची सावली – श्रीमती मीना मंगेशकर खडीकर ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकावर बोलू काही 

पुस्तकाचे नाव –‘मोठी तिची सावली’

लेखिका- श्रीमती मीना मंगेशकर खडीक

शब्दांकन-प्रवीण जोशी

आवृत्ती पहिली- २८ सप्टेंबर २०१८.

‘मोठी तिची सावली’

श्रीमती मीना मंगेशकर खडीकर लिखित ‘मोठी तिची सावली’ हे लतादीदींवर लिहिलेले पुस्तक अप्रतिम आहे! लतादीदींनी विषयी आपल्या मनात आदर, कुतूहल, कौतुक अशा असंख्य भावना आहेत, त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्यांचं बालपण, त्यांना पडलेले कष्ट, कुटुंबासाठी त्यांनी केलेला त्याग अशा सर्व गोष्टी समजू लागतात, तरीही मीना ताई म्हणतात त्याप्रमाणे’ दीदी समजणे अवघड आहे’ वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांची सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

लतादीदींच्या गाणं कारकीर्दीविषयी आपण थोडाफार तरी ऐकलं वाचलं आहे पण मीनाताईनी लता दीदीं चे बालपण फार सुंदर रेखाटले आहे. डोळ्यासमोर खोडकर, खेळकर लतादीदी उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर असताना या भावंडांचे बालपण अतिशय समृद्ध तेत गेले होते तिथे त्यांनी अनुभवलेला पहिला काळ आणि  ते वैभव गेल्यानंतर अनुभवलेले दिवस दोन्ही वाचताना खरोखरच भारावून जायला होते. प्रथम सांगली, नंतर पुणे, कोल्हापूर आणि मास्टर विनायक यांच्या कुटुंबाबरोबर मुंबई असे चार कालखंड या पुस्तकात वाचायला मिळतात.

वयाच्या तेराव्या वर्षी घराची जबाबदारी लतादीदींच्या अंगावर पडली पहिली मंगळागौर या चित्रपटाने लतादीदींनी भूमिका केली पण चेहऱ्याला रंग लावून सिनेमात काम करणे त्यांना आवडले नाही. 42 /43 च्या दरम्यान लतादीदी आणि मीनाताई प्रफुल्ल पिक्चर च्या लोकांबरोबर मुंबईला गेल्या. आणि त्यांच्या गायन कारकीर्दीला खरी सुरुवात ‘महल’ आणि ‘बरसात’या सिनेमातील पार्श्वसंगीतामुळे झाली. त्यानंतर दीदींनी मागे वळून पाहिलेच नाही. सर्व भावंडे एकमेकांना धरून ठेवण्यात दीदींचा मोठा वाटा होता. त्या खोडकर, मोकळ्या स्वभावाच्या, पत्ते खेळण्याची आवड असणाऱ्या, नकला करणाऱ्या, फोटोग्राफी आणि क्रिकेटमध्ये रस घेणाऱ्या

आहेत. या विविध पैलूंचे या पुस्तकातून आपल्याला दर्शन होते.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान अढळ आहे.तसेच कोळी गीते, भक्तीगीते, भावगीते आणि विविध प्रकारची गाणी यात दीदींचा स्वर आपल्या ला कायमच आनंद देतो.शांता शेळके यांची अनेक गाणी दीदींच्या स्वरात आहेत.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांना लतादीदींनी संगीत ही दिले आहे.संगितकार म्हणून ‘आनंदघन’ नावाने त्यांनी संगीत दिले.दिनानाथांच्या चीजांची वही

ही त्यांची खरी इस्टेट त्यांनी जतन केली आहे.

जिथे दु:ख भोगले त्याच सांगलीत मंगेशकर कुटुंबियांचा सत्कार केला तेव्हा  मागील सर्व दु:ख मागे सारून त्यांनी सांगलीकरांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून मनाचा मोठेपणा दाखवला!

दिनानाथांच्या नावे पुण्यात मोठे हाॅस्पिटल सुरू केले.तसेच माई मंगेशकर हाॅस्पिटलही उभारले.

लंडन च्या अल्बर्ट हाॅलमध्ये त्यांनी परदेशात पहिला जाहीर कार्यक्रम केला.

या पुस्तकात लतादीदींविषयी खूप छान माहिती प्रत्यक्ष त्यांच्या बहिणीकडून मिळत आहे.

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments