सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘प्रवाहाविरुद्ध पोहताना’ – डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव : प्रवाहाविरुद्ध पोहताना. (आत्मकथन)

लेखिका……..    डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी

प्रकाशक..         दिलीपराज प्रकाशन

पहिली आवृत्ती   फेब्रुवारी २०१५

पृष्ठे                    २४३

किंमत                २८०/—

प्रवाहा विरुद्ध पोहताना–हे लेखिका डाॅ.स्नेहसुधा कुलकर्णी यांचे आत्मकथन आहे..

पुस्तकाच्या शीर्षकावरुनच लक्षात येते की एका संघर्षाची कहाणी आहे.जीवन जगताना विलक्षण जिद्दीने ,मनाशी स्वप्ने बाळगून संकटांना कणखरपणे तोंड देत जगलेल्या एका स्वप्नाळु मुलीची ही काळीज चिरणारी ,पण धडपडीची जीवनकहाणी आहे.एक लांबलचक हर्डल रेसच..

लहान वयातच पितृछत्र हरपले.अकरा भावंडांचं कुटुंब,

अठरा विश्व दारिद्र्य.ऊपासमार. आजारपण.समाजाकडून  झालेली उपेक्षा.अवहेलना.सगळ्याच  आघाडीवरची अस्थिरता.या सार्‍यांशी वेळोवेळी लढून मात करुन ही मुलगी टिकून राहिली.

शाळेची सलग तीन वर्षे आजारपणामुळे बुडाली.त्या आजारपणाचे वर्णन वाचताना  मन अक्षरश: पिळवटते.

खाटेला खिळलेली ,भविष्यात कधी पायावर उभं राहून चालता तरी येईल का हाही प्रश्न असताना ,तिची जगण्याची धडपड आश्चर्यकारक वाटते.त्याविषयी लिहीताना लेखिका म्हणतात,

“रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर मी आईच्या आधाराने उभी राहू लागले.पंधरा दिवसांनी काॅटला धरुन दहा पंधरा पावले चालून झाली आणि आशेला पालवी फुटली…मी बरी होऊ शकते असा विश्वास मिळाला..”

एकीकडे त्या असंही म्हणतात,माझ्यासारखी सामान्य माणसे दूरदृष्टीने वागत नाहीत.भावनेत वारंवार गटांगळ्या खातात.श्रद्धेवर व भावनेवर जगतात.कधी दैवाचे अनुकुल दान पडले की मूठभर ज्वारीचे दाणेही सुवर्ण मोहरा वाटू लागतात….”

त्यांच्या आयुष्याची सारी जडण घडण त्यांच्या या लेखनातून वाचायला मिळते.आयुष्याचा टप्प्या टप्याने आढावा घेताना लेखनातील सुसूत्रता कुठेही तुटलेली नाही…

प्रवाहा विरुद्ध आयुष्य घडवत असताना,सुरवातीला त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या.आणि  शिक्षिका ,लेखिका ,कवयित्री ,प्रकाशिका ,विविध संस्थांवर पदाधिकारी …इतपर्यंतचे त्यांचे सविस्तर आणि अत्यंत प्रामाणिकपणे लिहीलेले हे लेखन उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे…वेळोवेळी थक्क करणारे आहे.

एक आगळंवेगळं ,शिस्तबद्ध,नीटनेटकं चोखंदळ व्यक्तीमत्व— याचीच ओळख यातून होते….

स्वप्नांची मोडतोड,अपेक्षाभंगांचे चटके ,वैवाहिक जीवनातले सुखदु:खांचे चढउतार,सहकार्याचे हात देणारेही नातलग,मित्रमंडळी यासोबत एक अडखळती पण यशाची वाट धरणारी अशी ही सकारात्मक दृष्टीकोणाची  संघर्ष कहाणी.

आयुष्यात कोणी गॉडफादर नाही ,कुणाचे प्रोत्साहन नाही तरीही शिक्षण आणि प्रकाशन व्यवसायात त्यांनी लक्षणीय यश मिळवलं…

पुण्यातले साहित्य वर्तुळात एका महिलेने चालवलेले “नीहारा “हे पहिलेच प्रकाशन असेल.!

लेखिका म्हणते,मी चारचौघींसारखीच धडपडणारी संसारी स्त्री आहे,पत्नी माता भगिनी या भूमिका वठवणारी सामान्य गृहिणी आहे.पण मी दुबळी नाही. मी बुद्धीने असामान्य,हजारात एक नाही पण मी अगदीच सर्वसाधारणही नाही. मी कुठे आहे,कशी आहे याचं नेमकं भान मला आहे. माझ्यात खूप उणीवा,कमतरता आहेत,पण प्रवाहपतित होउन  जगणं,मला मान्य नाही. तशी मी जगले नाही म्हणून माझं आयुष्य संघर्षमय झालं…..””

खरोखरच अजिबात रटाळ,पाल्हाळिक नसलेल्या आणि ओघवत्या शब्दशैलीतले हे डॉ.सुधाताई  कुलकर्णी यांचे आत्मकथन वाचताना,आयुष्यांतील संकटाशी,अडचणींशी झगडण्याची उमेद मिळते…हेच या लेखनाचे उद्दीष्ट्य सार्थ झाले असे म्हणायला हरकत नाही…..

 डॉ. स्नेहसुधाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

 

प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments