सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “न्यायदानाच्या खुर्चीवरून” – जस्टिस रमेश माधव बापट ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक ~ न्यायदानाच्या खुर्चीवरून

लेखक ~ जस्टिस रमेश माधव बापट

प्रकाशक ~ इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे ३०

पृष्ठसंख्या ~ २४०

मूल्य ~ ₹२००/—

~~~~~

हे पुस्तक कथा,कादंबरी किंवा चरित्र या कोणत्याच वाङ्मय प्रकारात मोडणारे नाही.

एका न्यायाधिशाने त्यांच्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत निकाला त काढलेल्या विविधरंगी खटल्यांचे व अनुभवांचे शब्दांकित रेखाटन असे या पुस्तकाविषयी थोडक्यात म्हणता येईल.

प्रस्तूत पुस्तकाचे लेखक श्री.रमेश माधव बापट, मुळचे कर्नाटकातले, वकीलीची पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर स्वतंत्रपणे वकीली करण्यासाठी पुण्यात स्थायीक झाले. बॅरिस्टर सी. बी अगरवाल आणि एडवोकेट सी.एन्.भालेराव ह्या प्रथितयश व अनुभवी वकिलांकडे ज्यूनियर वकील म्हणून काम करत करत कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त करून यश संपादन केले. सर्वसाधारणपणे असा समज आहे की वकिली म्हणजे लबाडी, पण “सचोटी, व्यासंग आणि चारित्र्य यांच्या बळावर कोणत्याही व्यवसायात यश व प्रतिष्ठा मिळू शकते”  हे या लेखकाकडे पाहून समजते.

श्री.बापटांनी त्यांच्या या व्यवसायात,अर्थात आधी वकीली आणि नंतर न्यायदान सांभाळताना ज्ञानसाधना हा महत्वाचा घटक कटाक्षाने सांभाळला आहे. त्यामुळे कोर्टापुढील त्यांचे निवेदन अत्यंत प्रभावी, परिणामकारक व पटण्यासारखे होत असे. पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, नागपूर, परभणी, आंध्रप्रदेश अशा अनेक ठिकाणी रजिस्ट्रार,न्यायाधीश ही पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कोर्टापुढे जे विविध खटले गाजले व त्यांनी न्यायदान केले असे अनेक खटले या पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यावरून जस्टिस बापटांचा मानवतावाद हा त्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा घटक आहे असे म्हणावे लागेल. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे गरीब व गुणी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सगळी हुषारी पणास लावली आहे, याच्या खुणा पुस्तकात जागोजागी सापडतात. 

एका क्रिमिनल खटल्याविषयी ते लिहितात……

“खुनाची केस होती. दोन आरोपी होते. सेशन्स कोर्टात खुनाचा आरोप सिद्ध होऊन दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीने हायकोर्टात अपील केले, परंतु दुसर्‍याने आर्थिक परिस्थिति अनुकूल नसल्याने अपील केले नाही. अपील माझ्या बेंचसमोर आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे वाचून झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झालेलाच नाही.  याचाच अर्थ असा की ज्याने अपील केले नाही त्याच्यावरचाही गुन्हा सिद्ध होत नाही. केवळ आर्थिक स्थिति ठीक नाही म्हणून गुन्हा शाबीत झाला नसताना दुसर्‍या आरोपीने जन्मठेप भोगावी हे मनास पटेना. सरकारी मदत देऊन दुसर्‍या आरोपीस अपील करण्यास सांगावे अशी सूचना वकीलांनी मला दिली, परंतु अपिलाची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दोन एक महीने तरी लागतील, तेव्हा त्याने तेवढा वेळ तरी जेलमध्ये का काढावा? त्यापेक्षा पहिल्या आरोपीच्या अपील निकालात सर्व गोष्टी नमूद करून दोन्ही आरोपींच्या सुटकेचा एकत्र हुकूम काढतो.”  अशाप्रकारे बापटसाहेबांनी दोघांनाही वाचविले.

न्यायमूर्ति बापटांचे मुंबईतील family कोर्टात पोस्टिंग झाले असता त्यांना तर्‍हतर्‍हेची विचित्र माणसे पहावयास मिळाली. या पुस्तकात घटस्फोटाच्या कित्येक नमुनेदार केसेस त्यांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. न्यायदान करताना आठवीत शिकलेला एक शेर श्री.बापटांना कसा सहाय्यभूत ठरला त्याविषयी ते लिहितात….

” एका शिक्षिकेने घटस्फोटासाठी दावा दाखल केला.दोघेही तरूण, नवर्‍याला चांगली नोकरी–

काय भूत संचारले,अचानक नोकरी सोडून नवरा घरी बसला. रिकामटेकडा वेळ घालविण्यासाठी व्यसनाची संगत—स्वतःचे पैसे संपल्यावर बायकोकडे मागणी–तिने नकार दिल्यावर मारझोड….अखेर घटस्फोटाचा निर्णय.. पुढे बायकोकडे पोटगीची मागणी—

शिकलेला धडधाकट नवरा बायकोकडे पोटगी मागतो हे मला पटेना..त्याला सरळ करण्यासाठी मी एक गोष्ट लक्षात घेतली की प्रत्येक माणसाला ईगो असतो आणि प्रत्येकाचा काहीतरी विक पाॅइंट असतो– त्याचा ईगो न दुखावता मी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. “ तू स्वतः कमव आणि स्वकमाईचे खा “– असे म्हटल्यावर “ बायकोने कमवावे आणि नवर्‍याने घरी बसून खाऊ नये असा कुठे कायदा आहे का?“ असा प्रतिप्रश्न त्याने मला केला.

तेव्हा मी  त्याला सांगितले “ ठीक आहे, मी पोटगीच्या अर्जावर सही करतो, पण एका अटीवर–उद्या येताना या लांब मिशा तू उतरवून ये. असे म्हणताच मला पाहिजे तो परिणाम झाला. त्याचा अहंकार दुखावला, त्याने पोटगीचा अर्ज मागे घेतला.”

*कर दिया कर्झन ने जन, मर्दों की सूरत देखिये,

आबरू चेहेरे की सब, फॅशन बनाकर पौंछ दी!* असा तो शेर होता—

लाॅर्ड कर्झन गव्हर्नर जनरल असताना हिंदुस्थानातील पुरूष मोठ्या मिशा ठेवीत असत, पण कर्झनने त्यांना बाई बनविले. मिशा उतरविणे म्हणजे अब्रू जाणे. फार मोठा अपमान समजला जातो. 

कोर्टात केसच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदाराची साक्ष काढताना वादी आणि प्रतिवादीचे वकील जो युक्तिवाद करतात, त्याचेही बरेच नमूने ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.

श्री.बापट बॅरिस्टर अगरवालांच्या हाताखाली काम करत असतानाचा एक अनुभव त्यांनी नमूद केला आहे—बॅरिस्टरांचे एक तत्व होते.  “go along with prosecution and then take diversion”

–केस होती ‘under essential commodity act.’ पुणे जिल्ह्यात कलेक्टरनी गव्हाच्या विक्रीची किंमत २ रुपये किलो ठरवली होती. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार आरोपीने गहू २॥ रूपये किलो भावाने विकला होता. कोर्टापुढे तसे साक्षी पुरावेही त्यांनी सादर केले. साक्षीदाराकडे अगोदरच नंबर लिहून, पंचनामा करून दहा रूपयांची नोट देऊन ठेवली होती. दुकान उघडताच एक बोगस गिर्‍हाईक नोट घेऊन दुकानात शिरला व त्याने चार किलो गहू मागितले.आरोपीने गहू वजन करून दिल्यावर पोलीस व अधिकारी दुकानात शिरले आणि साक्षीदाराची झडती घेतली. उरलेले दोन रुपये त्याच्याकडे सापडले नाहीत. याचा अर्थ आरोपीने २॥रुपये भावाने त्याला ४किलो गहू दिले. आरोपीचे वकील होते श्री.बापट. त्यांनी साक्षीदारास एकच प्रश्न विचारला..”जे गहू आरोपीने विकले त्याचे वजन करून पंचनामा केला होता का ?”

उत्तर नकारात्मक मिळाले. वकिलांच्या प्रश्नाचा रोख कोणालाही कळला नव्हता. वकिलांनी आरोपीला अशी जबानी देण्यास सांगितले की,सकाळची वेळ होती,गल्ल्यात सुटे पैसे नव्हते  म्हणून ‘ ४ किलोऐवजी ५किलो गहू देतो असे सांगितले.’ त्यामुळे २ रुपये परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोजून ५ किलो गहू दिले, गहू २ रुपये भावानेच विकले. तेव्हा कोणताही गुन्हा केला नाही.

कोर्टाला हा बचाव मान्य करावाच लागला आणि आरोपी निर्दोष सुटला.

हे पुस्तक म्हणजे अशा मनोरंजक कहाण्यांची रेलचेल आणि त्यांतून घडणारे मानव जातीचे दर्शन! 

कायद्याच्या कक्षेत राहून अक्कलहुषारीने न्यायदान करणे हे काम सोपे नाही. 

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments