सौ राधिका भांडारकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक — कृष्णस्पर्श (कथासंग्रह)
लेखिका……. उज्ज्वला केळकर
प्रकाशक ….. अजब पब्लिकेशन्स (कोल्हापूर)
पृष्ठे १९२
किंमत १९०/—
“ कृष्णस्पर्श “ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या या सर्वच कथा वाचनीय आहेत. त्या जितक्या मनोरंजक आहेत तितक्याच वेगळ्या जाणीवांची ओळख करुन देणार्या आहेत..उज्ज्वलाताईंच्या लेखनाची मी तर चाहतीच आहे. त्यांची भाषाशैली खूप प्रभावी आहे. घडणार्या साध्या घटनांचा कथांमधून मागोवा घेत असताना त्यांच्या निरीक्षणात्मक
बारकाव्यांचा अनुभव तर येतोच, शिवाय त्यांचा वैचारिक स्तर किती उंच आहे हेही जाणवते. कथेतल्या पात्रांचा मनोवेध त्या अचूक घेतात. शिवाय प्रसंगाकडे अथवा कॅरॅक्टरकडे जसंआहे तसंच बघण्याची एक तटस्थ वृत्ती त्यांच्या लेखनात जाणवते. कशाचंही उदात्तीकरण नाही,
समर्थन नाही किंवा अपारंपारीक म्हणून विरोधही नाही. वाचकासमोर जसं आहे तसं मांडलं जातं, म्हणून या कथा अत्यंत परिणामकारक ठरतात, वास्तविक वाटतात. काही कथा धक्के देतात. काही कथा बधीर करतात. परीक्षणांत ,कथेतल्या कथानकांविषयी सांगणे म्हणजे वाचकाच्या स्वमग्न वाचनातील आनंद ,गोडवा कमी करणे असे वाटल्यामुळे, काही कथांविषयीच लिहीते.
पहिलीच शीर्षक कथा, “ कृष्णस्पर्श.” –या कथेत माई आणि कुसुम नावाच्या कुरुप ओंगळ ,
आत्मविश्वास हरवलेल्या मुलीची गोष्ट आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासुन माई कीर्तन करत. अत्यंत सुरेल गायन, सुस्पष्ट निरुपण आणि प्रभावी वक्तृत्वामुळे.,श्रोते भारावून जातात. माईंच्या विस्कटलेल्या वैवाहिक जीवनामुळे कीर्तन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनते. कालांतराने त्यांच्या आयुष्यात कुसुम नावाचं गबाळं ध्यान आश्रित म्हणून येतं. सुरवातीला माईंच्या मनात तिच्याविषयी कुठल्याच ओल्या भावना नसतात.उलट रागच असतो. पण एक दिवस त्या तिला गाताना ऐकतात आणि तिच्यातल्या कलाकाराची त्यांना ओळख होते. मग कुसुम माईंना कीर्तनात साथ देउ लागते गाणारी कुसुम वेगळी भासते. मात्र गाण्यातून बाहेर आलेल्या कुसुमचा पुन्हापुन्हा सुरवंटच होतो. मात्र एक दिवस, कृष्ण आणि कुब्जा भेटीचं गुणगान कीर्तनात गात असतांना कुसुम बेभान होते. ती गातच राहते आणि तेव्हां माईंना जाणवतो तो कृष्णस्पर्श—-माई ठरवतात, कुसुमला पूर्ण कीर्तन शिकवायचे. तिला स्वावलंबी,स्वयंपूर्ण बनवायचं….माईंच्या विचारांनाही कृष्णस्पर्शच होतो जणु—-
“ आंदोलन “ या कथेतलं कथानक काहीसं अतर्क्य आहे. लहानपणी एकत्र असलेल्या दोघांचं वडीलधार्यांच्या इच्छेनेच लग्र होतं. दोघांची व्यक्तिमत्व भिन्न. विचार वेगळे. तो मातीत रुजलेला शेतकरी आणि ही एक उत्तम यशस्वी डाॅक्टर. त्याच्या पत्नीविषयीच्या पारंपारिक कल्पना, आणि
हिचं व्यावसायिक जीवन यांची सांगड बसत नाही. दोन मुलंही होतात. पण सहजीवनातला अर्थ हरवलेलाच—-करीअरच्या पाठीमागे असणार्यांनी मूळातच लग्नबंधनात पडूच नये–या विषयावर बोचणारे वाद होतात–मात्र एक दिवस, ब्रेन हॅमरेजसारख्या घातक दुखण्यातून बाहेर पडल्यावर या यशस्वी व्यावसायिकतेतून ती बॅकआउट होते आणि एका सामान्य गृहिणीरुपात ती उतरते–
म्हणजे थोडक्यात त्याच्या कल्पनेतली–.पण या पद्धतीने–? नको. हे बोचरंआहे—आता त्याला ते वेदनादायी वाटतं—ही सर्व मानसिक आंदोलनं उज्ज्वलाताईंनी इतकी सहज टिपली आहेत की कथेतल्या पात्रांच्या भावनांच्या अगदी जवळ जाउन पोहचतो आपण—-
डेथ डे ही कथा अंगावर दरदरुन काटा फुलवते. एका वेश्येच्या, एका विकृत राजकारण्याशी असलेल्या संबंधाची ही कथा आहे. पैसा, छानछोकी, ऐट, रुबाब याच्या बदल्यात
तिला जे करावं लागतं— त्यातलं ओंगळ कारुण्य वाचताना मन मातकटून जातं..
परक्याचं पोर—ही कथाही चटका लावणारी. एका जोडप्यांनं अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेतलेला. पुढे त्यांना त्यांचं स्वत:चं मुल होतं. इथून खरी कथा सुरु होते. वडीलांचं दत्तक मुलगा ,पिंटुशी बदललेलं वागणं.,नातेवाईक आणि सवंगड्याकडून पिंटुला उमजणारं ,त्याच्या आईवडीलांविषयी कळलेलं सत्य , हे सगळं त्याला गोंधळात टाकत असतं. त्याचं बालमन खचत जातं. मग त्याला शिक्षणासाठी अखेर वसतीगृहात ठेवण्याचा निर्णय होतो. आणि या सर्व घटनांमुळे होरपळलेली, पिळवटून गेलेली आईची मनोवस्था वाचकालाही काळीज फाडणारी वाटते—-.
चोरट्या वाटेनं, विवाहानंतरही प्रियकराची मनात केलेली जपणूक एका कथेत आहे..
काही कथांमधे प्रेमाच्या त्रिकोणातून जन्मलेला आणि दुष्कर्म करणारा मत्सर आहे, समाजाने केलेली फसवणुक आहे, दुनियादारी आहे, बलात्कारासारखीही घटना आहे…
पण कथेची इमारत बांधतांना ती सतत ओळंब्यात असलेली जाणवते…उगीच विस्तारत नाही. पसरत नाही.
काही कथा मात्र चटकन् संपल्यासारख्या वाटतात—अजुन पुढे काय, असे वाटत असतानाच संपतात—पण तरीही त्या abrupt वाटत नाहीत….
थोडक्यात इतकंच म्हणेन, एक जाणीव देणारा, कधी सौम्य, कधी उग्र वाटणारा भावाविष्कार व्यक्त करणारा, कधी अतर्क्य वाटणारा, तर कधी वस्त्रहीन वास्तव समोर मांडणारा ,विविध घटनांचा, विविध आशयांचा एक कथास्पर्श….”.कृष्णस्पर्श!! “
सुंदर वाचनीय.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈