श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ शब्द  माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

पुस्तकाचे नाव : शब्द माझ्या सोबतीला 

कवी : श्री. सुहास र. पंडित 

प्रकाशक : प्रसाद वितरण ग्रंथदालन, सांगली.  

‘शब्द माझ्या सोबतीला’ हा सुहास पंडित यांचा पहिला कवितासंग्रह. संग्रहाचे नाव अगदी अर्थपूर्ण आहे.  शब्दाच्या माध्यमातून आशय उलगडत जातो. त्याला अर्थ प्राप्त होतो. कविता, कथा, कादंबरी, लेख, चरित्र,- आत्मचरित्र , समीक्षा,सगळ्याच वाङ्मय प्रकाराचे इमले शब्दांनीच रचले जातात. शब्दांशिवाय वाङ्मयाचे सृजन असंभव. कवीला शब्दसामर्थ्याची जाणीव आहे. पण ते शब्दांना ‘मागुते या’ असा आदेश देत नाहीत. ते अतिशय ऋजुपणे, आत्मीयतेने, कृतार्थतेने आणि काहीशा कृतज्ञतेनेही म्हणतात, ‘शब्द माझ्या सोबतीला’.

कविता साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमनाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्‍या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. विद्रोही, किंवा आक्रोशी नाही. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन, वृत्तात बद्ध होऊन. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्या जातकुळीची वाटते.

कविता संग्रहाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,           

शब्द आमुचे खेळ आहे, कागदाचे अंगण 

ना वयाचे, ना दिशांचे ना कशाचे बंधन

रंगवितो खेळ आम्ही, कल्पनांच्या संगती 

हार नाही, जीत नाही, फक्त आहे अनुभूती 

हार-जीत नसली, तरी या खेळाचा आनंद आहेच. कवीला स्वत:चीच कविता वाचताना जसा आनंद होतो, तसा आनंद, कविता वाचताना वाचकांनाही व्हावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. 

आपल्या कविता- लेखनाला तरुण वयात सुरुवात झाली, असं ते म्हणतात. बहुतेक कवींच्या काव्यलेखनाला त्या वयातच सुरुवात होते. कॉलेजच्या रोमॅंटिक विश्वात शिरला की बहुतेकांना कवितेची बाधा होते. ही बाधा काहींना तात्पुरती होते, तर काहींच्या ती  कायमची मानगुटीला बसते.  ही बाधा सुहास पंडित यांच्या कायमची मानगुटीला बसली. 

तरुण वयात प्रेम भावनेचे प्राबल्य अधिक. अनेकदा तर प्रत्यक्ष प्रेमापेक्षा ‘प्रेमाच्या कल्पनेवर’च या बहाद्दरांचं प्रेम असतं. मग सफल-विफल प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात. पंडितांच्या प्रेमकवितेतही प्रेमाच्या विविध रंगछ्टा विखुरल्या आहेत. त्यांची सखी, प्रेयसी आणि पत्नी एकच आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सफल प्रेमाची गीते होऊन येतात. इथे पुन्हा एकदा भा.रा. तांबे यांची आठवण होते. 

निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. चंद्र-चांदण्या, त्यांचे चांदणे, घमघमणारी चमेली,  मोगरा , रातराणी या वातावरणात त्यांच्या शृंगाराला बहर येतो. प्रेयसीशी एकरूप होण्याची उत्कट असोशी ‘आता नाही दुजेपण’ या कवितेत व्यक्त झालीय. त्यांची शब्दकळा लावण्यमयी आहेच, पण या कवितेत ती विशेष वैभवाने प्रकट झाली आहे . म्हंटलं तर यातील कल्पना, रूपके पारंपारिकच, पण त्यातून एक देखणा आविष्कार त्यांनी प्रकट केलाय. ते म्हणतात, तुझ्यासवे बोलताना कधी पहाट होऊच नये आणि पुढे लिहितात, 

गालातील गुलाबाचा  रक्तिमा फुटावा 

डाळिंबाच्या ओठातील मध हळूच टिपावा

चंद्र लपावा ढगात, मुखचंद्रमा हातात 

माझ्या गळ्यात पडावे, तुझे सोनियाचे हात 

ऋतुराजाचे वैभव सारे खुलावे कायेत

माझ्या मनाचा मयूर सुखे  नाचेल छायेत 

आणि मग चांगली कल्पना येते –

तुझ्या देहाच्या चंद्राचे माझ्या मनात चांदणे 

आता नाही दुजेपण सारे एकरूप होणे 

 स्वप्नवेल, प्रीत बरसते, सर येण्याआधी, फुलवीत आपुली प्रीत (संवाद), नातं ,प्रतीक्षा अशा अनेक सुंदर कविता इथे वाचायला मिळतात. 

पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्‍यांना स्पर्शून जाते. घन गर्जत आले, घन बरसला सावळा, श्रावणमास, रवी आला क्षितिजावर, च्ंद्रोत्सव, मानसमेघ, जंतर मंतर अशा कितीतरी कविता निसर्गाचे लावण्यरूप घेऊन येतात. त्यातही गरजणारा, बरसणारा, वसुंधरेच्या गात्रांमध्ये नवजीवनरस  शिंपत जाणारा, चैतन्याची पेरणी करून अवघी अवनी सजवून टाकणारा पाऊसकाळ त्यांना विशेष प्रिय दिसतो. गुलमोहरा’चे शब्दचित्रही त्यांनी अतिशय सुरेख रेखाटले आहे. 

‘हे मृत्यो’ या कवितेत ते म्हणतात, मृत्यूपूर्वी फक्त एकदाच मला हिमशिखरांच्या उत्तुंग राशी, गगनाचे इंद्रधनुष्यी तोरण, हिरवी राने, नभातील रंगपंचमी पाहू दे. निर्झर संगीत ऐकू दे. शिशिरातील पहाटवारा अंगावर घेऊ दे, चंद्राची रेशीमवस्त्रे लेवू दे. , मातीच्या कुशीत शिरून राबू दे. आणि फक्त एकदाच या सृष्टीतला ईश्वर पाहू दे. या कवितेचा शेवट मोठा मजेशीर आहे. ‘फक्त एकदा मला मरू दे इथले जिणे संपल्यावर’  

निसर्गात रमून जाणे हा कवीचा स्थायीभाव असला, तरी त्याचे सद्य: स्थितीकडे बारीक लक्ष आहे. पूर्वी सुवर्णभूमी असलेला आपला देश स्वार्थांध भ्रष्टाचार्‍यांनी आता स्मशानभूमी बनवला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘घे धाव रामराया’ अशी ते आळवणी करतात.  

संग्रहात काही चांगली शब्दचित्रे आहेत. ‘माझा गाव’ वेंगरूळ ‘घर खेड्यातले’ ‘कापूर ‘( हे त्यांच्या आईचे शब्दचित्र आहे.)    

पंडित म्हणतात, हा संग्रह म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रवास काट्याकुट्याचा असला तरी पुढे ताटवा लागेल, याची त्यांना खात्री आहे. या पुढच्या प्रवासात त्यांना या मार्गावर नव्या नवलाईच्या खुणा दिसोत.. विविध अनुभवांची समृद्धी मांडणारा, या अर्थाने पुढचा प्रवास त्यांना सुखकारक होवो.  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments