सौ राधिका भांडारकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “जन्मठेप” – गिरिजा कीर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव…..जन्मठेप
लेखिका …………गिरिजा कीर
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाउस
पृष्ठे १६०
किंमत रु. १५०/—
या पुस्तकाविषयी काही लिहिण्यापूर्वी काही सांगावसं वाटतय् .या पुस्तकाचे प्रकाशन येरवडा जेल पुणे येथे झाले. आणि त्या सोहळ्यास मी गिरिजा कीर यांच्याबरोबर गेले होते. तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या सोहळ्यात उपस्थिती होती कैद्यांची– असे कैदी की ज्यांच्यावर खूनाचे आरोप सिद्ध झालेत आणि जे जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. हे वातावरण अपरिचित होतं आणि मी थोडी भयभीत आणि गोंधळले होते. हे सर्व कैदी त्यावेळी मुक्त होते. कुठल्याही बेड्या त्यांच्या हातात नव्हत्या…सर्व कैद्यांनीच हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. सूत्रसंचालनापासून ते समारोपापर्यंतचा सर्व भार कैद्यांनी उचललेला होता.. मनोगते कैद्यांचीच होती.पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनीच केले. आणि व्यासपीठावर बसलेल्या गिरिजा कीर यांना ते सर्व “आमची माउली “म्हणून संबोधत होते. हा अनुभव खूप वेगळा होता…
मुळात ‘ जन्मठेप ‘ हे पुस्तक गुन्हेगारी जगतातील सत्यं उलगडणारे आहे.
गिरिजा कीर यांचे ‘ लावण्यखुणा ‘ हे पुस्तक वाचून प्रेरित झालेल्या सुहास जोशी यांनी गजाआडून त्यांना लिहिलेल्या पत्रामुळे या पुस्तकलेखनाचा प्रारंभ झाला…
दहा वर्षे त्या जन्मठेपेच्या कैद्यांच्या संपर्कात राहिल्या. हा एक संशोधनात्मक प्रकल्प होता. कल्पना सुस्पष्ट होत्या. आराखडा तयार होता.
या पुस्तकातून गुन्हेगारी जगताशी केलेला संवाद आहे. त्यांच्या व गजाआड शिक्षा भोगणार्यांचा बाहेर असलेला परिवार, कुटुंबीय याच्या वेदनांना केलेला स्पर्श आहे.
गुन्ह्यांचं समर्थन नसलं, तरी त्यामागच्या कारणांचा, त्या मानसिकतेचा आपुलकीने घेतलेला शोध आहे. चिंतन आहे. गिरिजा कीर सृजनात्मक लेखिका होत्या .त्या या विषयात इतक्या गुंतल्या की त्यांच्यासाठी हा विषय केवळ संशोधनात्मक न राहता मन विस्कटून टाकणारा एक विषय ठरला.
या पुस्तकात त्यांनी कनिष्ठ व मध्यम वर्गीय सुशिक्षित गुन्हेगारीचा गट निवडला. कारण ही मुलं पापभीरु ,चांगल्या संस्कारातली असतात. केवळ अविवेकी कृत्याने ती गुन्हेगार ठरतात.
कुठली आमिषं, कुठली आकर्षणं त्यांना प्रवृत्त करतात.?? त्यांची मनं दुबळी का होतात ? वडीलधार्यांचे दडपण, कुसंगती, दहशत, पैसा, स्पर्धा ,भोवतालचा समाज, या सर्व प्रश्नांचा शोध या पुस्तकात प्रत्यक्ष संवादातून घेतलेला आहे.
या पुस्तकांतून गुन्हेगारांच्या पुनर्वसनाचा विचार नसून, ज्यांचा सूर्य मावळला आहे ,त्यांना फक्त जगण्याचे सामर्थ्य देण्याची खटपट आहे…
“कुणी नाही का म्हणता? मी आहे ना ! तुमचं एक छान जग निर्माण करा. प्रेम द्या एकमेकांना…”
असे त्या भेटीत सांगत…
या पुस्तक प्रकल्पात त्यांना अनेक अनुभव आले .कैद्यांना भेटण्यासाठी काढाव्या लागणार्या परवानग्या..त्यातल्या अडचणी…कायद्यातल्या त्रुटी…
काहींना गुन्हा नसतांनाही झालेल्या शिक्षा आणि विस्कटलेली उध्वस्त जीवनं…पुस्तक वाचतांना अंगावर सरसरुन काटा उभा राहतो…
मात्र हे पुस्तक एका नकारात्मक जीवनाला आशेचा आकार देते…लेखिकेच्या या प्रयत्नांतून मिळालेलं तीर्थ हेच की—अंधारातून ते प्रकाशाचा शोध घेत आहेत. स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढत आहेत. शिक्षा भोगून तावून सुलाखून निघालेले हे तरुण मनातल्या श्रद्धांना झळ पोहचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय —आपण फक्त आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे—-
पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर हा विचार मनात येतो..हेच या पुस्तकाचे यश, साफल्य, सार्थक —–
(प्रकाशन सोहळा संपल्यानंतर ,कैद्यांनी आमच्यासाठी रुचकर जेवण बनवले होते. त्यांनी स्वत: वाढले.आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या सेलमधे निघूनही गेले. स्वत:च सेलचे भरभक्कम दार लावून घेतले..त्या अंधारात गुडुप झाले. आणि जेलरने त्यांचे सेल लाॅक केले. हे मी प्रत्यक्ष पाहिलं आणि काय माझ्या मनाची अवस्था झाली ते कसं सांगू….?? पुस्तकातल्या माणसांना मी प्रत्यक्ष पहात होते…)
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈