सौ. सुचित्रा पवार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बारोमास” – सदानंद देशमुख ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆ 

पुस्तकाचे नाव : बारोमास 

लेखक : सदानंद देशमुख

प्रकाशक : कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे 

सदानंद देशमुखांची एक अंतर्मुख करणारी अन जीवाला चटका लावणारी कादंबरी मी २००९  ला वाचली .या पुस्तकाला साहित्य अकादमीचा प्रथम पुरस्कारही मिळालाय .

अशी ही लोकप्रिय कादंबरी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी अन एकंदरीतच सामाजिक जीवनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम चित्रित करणारी. शहरी जीवन, व शहरी संस्कार,  ग्रामीण जीवन व ग्रामीण संस्कारांची छापही वैयक्तिक जीवनावर कसा प्रभाव टाकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारोमास !

शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाची हृदयद्रावक कथा ,तसेच योग्य वेळेस निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने कादंबरी नायकाला अंतिमतः फक्त दुःख न दुःखच पदरात येते ,घोर निराशा अन अंध:कार !

एकनाथ एका शेतकरी कुटुंबातील एम. ए. झालेला विवाहित तरुण नोकरीच्या शोधात आहे.त्याची पत्नीही उच्चशिक्षित. पण ग्रामीण संस्कार खोलवर रुजलेल्या एकनाथच्या लाजाळू व बुजऱ्या स्वभावामुळं तो मनात असूनदेखील बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. पत्नीकडूनच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही म्हणून आतून नाराज, तर नवऱ्याच्या असल्या मिळमिळीत स्वभावावर पत्नी नाराज. शहरी संस्कार पूर्णपणे भिनलेली ती पतीला समजावते, बाहेर पडण्याची विनंती करते.  पण स्वतःवर विश्वास डळमळीत असल्याने अन कुटुंबावर प्रेम असल्याने एकनाथ तिथंही नापासच होतो .

नोकरीसाठी पैशांची गरज असते आणि हा पैसा उपलब्ध होण्यासाठी शेतजमिनीचा एक तुकडा विकून नोकरी धरावी व नोकरीच्या पैशातून पुन्हा जमीन घ्यावी अशी बिल्कुल सरळ इच्छा बाळगून सुखी जीवनाचे चित्र तो रेखाटतो ,पण घरचे प्रचंड विरोध करतात. दिवस असेच निघून जातात वय वाढू लागते .

कादंबरीची सुरुवात गावाच्या वेशीपासून होते.गावाची ओळख ,सर्रास दिसणारे ग्रामीण चित्र,  थोडे मागास- थोडे आधुनिक, आणि एकनाथच्या घराचा ठिकाणा,अगदी बोळातील रस्ता आणि आजूबाजूचा परिसर एकनाथच्या सामाजिक स्थितीची ओळख करून देतो .आई वडील व एक धाकटा बंधू अन पत्नी असे पंचकोनी कुटुंब. एकनाथ एम ए शिकलेला, विचार आचाराने सुशिक्षित नोकरीच्या शोधात आहे. नोकरीची खात्रीशीर संधी आहे, पण पैसे वशिला हवाय ,वशिला नाही पण पैशांचे काय ? कर्ज काढावे तर व्याज, शिवाय नेहमीचा दुष्काळ पाचवीला पुजलेला ! शेतीचा तुकडा विकावा का ? हा विचार मनात येताच दुसरा विचार येतो ,वडीलोपार्जीत जमीन विकण्यास कदापि पालक तयार होणार नाहीत.अतिशय सरळमार्गी मृदुभाषी एकनाथचे पात्र.  याच्या अगदी उलट भाऊ– पक्का व्यवहारज्ञानी ,समाजातील ,राजकारणातील खाचाखोचाशी ज्ञात ,गावातील टपोऱ्या पोरात ऊठबस असणारा ,आई थोडीशी धाडसी अन वडील माळकरी– अशी ही एकनाथची कौटुंबिक पार्श्वभूमी .आई -पत्नी, अशिक्षित- शिक्षित आणि जनरेशन गॅप, यामुळे खटके -धुसपूस असायचीच ! त्यातच नवरा बेरोजगार, त्यामुळं पत्नीची होणारी घुसमट दोघांतील वादात बाहेर पडायची ! स्त्रीसुलभ भावनांचा कोंडमारा ,परिस्थितीमुळं मूलही जन्माला न घालण्याची खन्त,  अन मग सतत माहेरी जाणे.  यामुळे एकनाथला सर्वच बाजूनी आलेला एकटेपणा आपलेही काळीज पिळवटून टाकतो .या सर्व स्थितीचे अतिशय सुरेख चित्रण आपल्या मनात उतरत राहते अन आपल्यात एकनाथ झिरपत रहातो. एकनाथच्या सर्व सुखदुःखात कुठेतरी सामाजिक प्रश्नांचे मूळ आपल्यालाही अस्वस्थ करत रहाते.

मध्यभागात अवकाळी पाऊस ,शेतीमालाचे नुकसान अन भाव पडणे यामुळे व्यथित- हतबल,  कर्जबाजारी शेतकरी याचे हुबेहूब चित्रण डोळ्यासमोर लेखक उभे करतो. तसेच गावातील राजकारण ,पैशामुळं मिळणारी नोकरी व ट्युशन -क्लास मुळे वाढणारे मार्क, अन पुन्हा चांगल्या मार्कांमुळे मिळणारी नोकरीची चांगली संधी– यामुळं व्यथित एकनाथ म्हणतो, ‘ पैसा हेच सर्व दुःखाचे मूळ आहे.पैसे असतील तर सर्वच गोष्टी मनासारख्या होतात आणि सतत प्रगती होते. ‘

कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथच्या शेतीचा तुकडा विकला जातो. यातील आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन शहरात जाऊन झेरॉक्स सेन्टर काढू व तिथेच स्थायिक होऊ असे पत्नी सुचवते.  पण एकनाथकडून तेही होत नाही. ते पैसे धाकट्या भावासाठी असतात, अन पैशांची चोरी होईल म्हणून घरदार त्या पैशांची काळजी करते आणि सर्वांची झोप उडते .

सततच्या परावलंबित्वाला अन एकनाथच्या स्वभावाला कंटाळून पत्नी माहेरी जाते .एकनाथ पत्नी वियोगात कष्टी होतो. पत्नीला सासरच्या सर्व परिस्थितीचा एवढा उबग येतो की तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ती आतून धास्तावते की एकनाथ परत आपल्याला सासरी नेईल. म्हणून ती स्वतःस लपवू पहाते .एक प्रसंग असा वर्णिला आहे की मेहुणी अन पत्नी एकनाथला शहरात दिसतात.    चुकूनच सर्वांची दृष्टादृष्ट होते.  पण त्या दोघी रिक्षात बसतात अन एकनाथला टाळतात. या प्रसंगात खरेच मन विव्हळ झाल्याशिवाय राहत नाही, कारण शरीरापेक्षा मनाने पती- पत्नी खूप दूर गेलीत तिथून एकत्र येण्याचा कोणताच धागा वाचकास दिसत नाही. विमनस्क एकनाथ घरी येतो .

ज्यासाठी शेत विकले होते तो हेतू सफल न झाल्याने आई एकनाथला म्हणते–’ हे पैसे घे व नोकरीसाठी भर.’ या वाक्याने  आतून तुटलेला एकनाथ खूप दुखावतो. कारण नोकरीची संधी तेव्हाच गेलेली असते जेव्हा पैसे भरलेले नसतात. ती जागा भरलेली असते. पुन्हा लवकर नोकरीची आशा नसते आणि जगण्यासाठीचा आशेचा किरण संपतो. संसार कधीच मोडलेला होता अन जीवन अंधःकारमय ! दोन्ही कडून एकनाथ पिचला गेला अन अशा रीतीने एक सुशिक्षित बेरोजगाराच्या वाट्याला वैफल्यग्रस्त जीवन येते अन कादंबरी संपते. पण बऱ्याच प्रश्नांचा गुंता आपल्याभोवती सोडून जाते—

एकनाथच्या दुःखास खरे कारणीभूत कोण?आर्थिक परिस्थिती,सामाजिक ,कौटुंबिक परिस्थिती की स्वतः एकनाथचा बुजरा ,निर्णय न घेता येणार स्वभाव ? पालकांचा पाल्याच्या क्षमतेवरचा अविश्वास की स्वत:वरचा डळमळीत आत्मविश्वास ? 

” माणूस स्वतःच्या दुःखास स्वतःच कारणीभूत असतो ” हे शेक्सपिअरचे प्रसिद्ध वाक्य काही अंशी पटते ,कारण  कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता परिस्थितीस शरण जाऊन स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवता कोणताच ठाम निर्णय न घेता येणे, ही आजच्या सुशिक्षित तरुणांची कमजोर बाजू आहे .व्यवहारात कसे वागावे याचे धडे कुठेच न मिळालेला एकनाथसारखा प्रत्येक तरुण नात्यात अन कुटुंबात पुरता गोंधळून जातो. नात्यातील संवाद जेव्हा संपतो, तेव्हा नाती कोरडी होतात व तुटतात हे विदारक सत्य, केवळ एकनाथला भावना व व्यवहार यांची उत्तम सांगड न घालता आल्याने पचवावे लागते. एकनाथ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरतो, असे मला तरी वाटते .

सदानंद देशमुखांच्या या कादंबरीला बक्षीस मिळाले असले तरी यात वर्णन केलेली सामाजिक,  राजकीय स्थिती अजूनही तशीच आहे. एकनाथसारखे निष्पाप जीव अजूनही भरडले जात आहेत—-

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments