सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

नमुना नमुना माणसं

लेखिका | मंजिरी तिक्का

साहित्य प्रकार | अनुभवकथन

प्रकाशक | अक्षरमानव प्रकाशन

सात-आठ वर्षांपूर्वी चक्रम माणसांशी कसे वागावे हे कि.मो. फडके यांनी लिहिलेलं त्रिदल प्रकाशनचं पुस्तक मी वाचलं होतं. यात चक्रमपणाबद्दल व्यवस्थित माहिती दिली होती. त्याची लक्षणं, तीव्रता त्याचे होणारे परिणाम वगैरेंचे किस्से वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, याच्यातली बहुतांशी सौम्य का होईना लक्षणं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येकांमध्ये आढळतात अगदी आपल्यातही. वागण्याची पद्धत किंवा अमुक प्रकारचा स्वभाव हा चक्रमपणात कसा नोंदला जाऊ शकतो किंवा इतरांसाठी तो कसा ठरू शकतो याची जाणीव या पुस्तकातून करुन दिली आहे.

तर मंडळी,

हे सगळं चऱ्हाट लावण्याचं कारण म्हणजे मी नुकतंच वाचलेलं ‘नमुना नमुना माणसं’ हे मंजिरी तिक्का यांचं पुस्तक. एव्हाना नावावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की नमुना नमुना माणसं असं म्हणताना त्यात चक्रमपणा हा हळुच डोकावतोय. अगदी थेट नसला तरी एखाद्या नुकसानकारक गुणाचा अतिरेक हा त्याच्या जवळपास जाणाराच गुण आहे. हेच गुण अंगी असलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि त्यांचे त्याबाबत घडणारे विनोदी किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

अतिशय साध्या-सोप्या आणि संवादी शैलीत हे किस्से असल्यामुळे क्वचित प्रसंगी आपल्या हातूनही घडलेले असे फजितीचे प्रसंग किंवा आपल्या इतर मित्र-मैत्रिणी, भावंड यांच्यापैकी कोणाच्या तरी बाबतीत घडलेले प्रसंग आठवून आपल्याला खुदकन् हसू येतं. बालपणीच्या आठवणींमध्ये अधिक तर अज्ञानाचा, निरागसतेचा भाव असल्यानं त्यांचं वैषम्य जाणवत नाही. पण मोठेपणी मात्र आपल्या स्वभावामध्ये योग्य त्या प्रकारे बदल करता आला नाही तर त्याचा किती गैरफायदा घेतला जातो हे लक्षात आल्यावर हसू येण्यापेक्षा हळहळायलाच होतं.

मला या पुस्तकाची भावलेली आणखीन एक बाजू म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे जे घडलं ते जसंच्या तसं स्वरूपात मांडल्याचं जाणवतं. त्यात अतिरंजितपणा, पाल्हाळीकपणा, अकारण विनोद निर्मितीचा प्रयत्न, शब्दविक्षेप आढळत नाही. त्यामुळे हे किस्से आपल्या घरातलेच आहेत, किंवा आपल्या समोरच घडताहेत असं वाटतं.

अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये आढळणाऱ्या अतिचिकित्सक, अतिचिकट, अतिस्वच्छतावेड्या, अतिअबोल, अतिवाचाळ, अतिभिडस्त, तारतम्याचा अभाव असलेल्या नमुन्यांचा यात अंतर्भाव आहे. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे नात्यांमध्ये, कामामध्ये होणारा गोंधळ हा अतिशय सहजतेने टिपला आहे. प्रसंगांची मांडणी, किस्से हे जरी विनोदी पद्धतीने सांगितले असले तरी ते वाचून हसता हसता आपण नकळत अंतर्मुख होतो. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जास्त जाणीवपूर्वक बघू लागतो, हे खरंतर या पुस्तकाचं यश.

मंजिरी तिक्का यांचं हे पुस्तक जरी पहिलंवहिलं असलं तरी काहीसं स्वशोध घेणारं, स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लावणारं आहे. त्यांच्यातल्या उत्तम निरीक्षकाची, लेखकाची चुणूक दाखवणारं आहे. शंभरेक पानांच्या या पुस्तकात वाचताना कुठेही कंटाळवाणेपणा जाणवत नाही. मात्र क्वचितप्रसंगी प्रसंग वर्णन करताना पुनरावृत्ती झाल्याचं जाणवतं.

पुस्तकाची महत्त्वाची आघाडी सांभाळणाऱ्या दोन गोष्टी एक मुखपृष्ठ आणि शीर्षक या अतिशय उत्तम जमून आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी साकारलेले पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि विषयाला समर्पक असं आहे. माणसाच्या वेगवेगळ्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या चौकटीतल्या व्यंगचित्रातून ‘नमुना नमुना’ माणसाचं उत्तम प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर नमुना या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे निर्माण होणारा भाव पुस्तकाच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू आणतो.

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या दिवसात एका बैठकीत वाचून संपणारं आणि मनाला प्रसन्नता देणारं हे पुस्तक आवर्जून वाचा. आणि आपल्या आजूबाजूची नमुनेदार माणसं शोधतानाच आपल्यातही लपलेला नमुनेदारपणा शोधून काढा.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
1.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments