सौ. सुचित्रा पवार
पुस्तकावर बोलू काही
☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
गावठी गिच्चा: लेखनभान जपणाऱ्या संयमित कथा – सौ. सुचित्रा पवार
नुकताच ‘गावठी गिच्चा’ हा सचिन पाटील यांचा कथासंग्रह वाचून झाला. एकूणच पूर्वापार शंकर पाटील ग्रामीण कथेचा बाज असणाऱ्या, लेखनभान जपणाऱ्या संयमित अशा एकूण बारा कथा या कथासंग्रहात आहेत. कोणत्याही बड्या लेखकाची प्रस्तावना न घेता लेखकाने स्वतः ‘गावातून फेरफटका मारण्यापूर्वी…’ या शिर्षकाखाली कथासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया व आज-कालच्या गावाचा आढावा घेतला आहे. ‘गावठी गिच्चा’ म्हणजे हिसका किंवा खोड मोडणे या अर्थाचे संग्रहाचे शिर्षकच ठसकेबाज आहे.
प्रत्येक कहाणीचे आशय अन् विषय वेगवेगळे आहेत, तसेच प्रत्येक कथा ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. आता गावाचे स्वरूप बदलत असले तरी माणसांच्या मनोवृत्ती मात्र बदलल्या नाहीत असेच काहीसे ग्रामीण वास्तव चित्र आहे.
या कथासंग्रहातील ‘उमाळा’ या कथेतील फटकळ असणारी पुष्पाआक्का रागेरागे भावाकडे येते, शरीराने ती भावाकडे आलीय पण तिचे मन मात्र तिच्या घरातच रेंगाळत आहे, म्हणूनच नातवाची आठवण येताच नातवाच्या काळजीने तिचे मन घराकडे ओढ घेतेय आणि ती लगेचच घरी परतते. बहिणीची तऱ्हा भावाला मात्र न कळल्याने तो चक्रावून जातो पण विहिरीला लागलेला ‘उमाळा’ मात्र आक्काचा पायगुणच समजतो. बहीण-भावाच्या प्रेमाचे दुर्मीळ चित्र उमाळा कथेत आपल्याला दिसते.
‘दंगल’ या कथेत दंगल असूनही आपल्या जीवावर उदार होऊन वेळप्रसंग पाहून अवघडलेल्या रेशमाला आपल्या रिक्षातून शहराकडे सुखरूप बाळंतपणाला नेणारा जेकब रिक्षावाला अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवतो.
ऊस फडावरील खोपटात रात्रभर अब्रूच्या भीतीने गांगरलेली सुली प्रत्येक चाहुलीला घाबरते पण एका क्षणात वीज तळपल्याप्रमाणे तिला स्वतःच शील जपण्यासाठी ‘कोयता’ जवळ आहे याची जाणीव होते व तिची भीती कुठल्या कुठं पळून जाते.
विज्ञानयुग असलं तरी अजून खेडोपाडी करणीबाधेच्या भुताचा लोकांच्या मनावर पगडा आहे. त्यातूनच ‘करणी’ मधील विठाई आपल्या म्हशीची दुरावस्था बघून अंदाजाने, संशयाने आसपासच्या लोकांना शिव्या घालते पण प्रत्यक्ष मात्र तिच्याच मुलाने गोठ्यात मारलेल्या कीटकनाशकाचा अंश म्हशीच्या पोटात गेलेला असतो हे गुपितच रहाते.
अचानक नवरा मेलेली तरुण सुंदर सविता उर्फ सवी पतसंस्थेच्या कर्जाच्या विळख्यातून अब्रूसह चातुर्याने निसटते याचे वर्णन लेखकाने ‘डोरलं’ कथेत तंतोतंत केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेली सवी आपलं डोरलं अर्थात मंगळसूत्र विकून आपला शब्द पाळते व शीलही वाचवते.
‘गावचं स्टँड’ आणि ‘तंटामुक्ती’ या दोन्ही कथा विनोदनिर्मिती करणाऱ्या असल्या तरी त्यातील कथानक हे ग्रामीण भागातील उपहासात्मक वास्तव आहेत.
‘उपास’ या कथेत ज्ञानू पैलवानाची मटण खायची तल्लफ बायकोच्या संकष्टीच्या उपवासाने न भागताच दिवसभर त्याला कसा उपास घडतो आणि रात्री मात्र राग विसरून तो परत बायकोला माफ करून आनंदाने कसा शाकाहार करतो याचे रसभरीत चित्रण आहे. मात्र मटण न करता शाकाहारी जेवण करून पैलवनाची बायको रत्ना नवऱ्याची समजूत का काढू शकत नाही त्याला उपास का घडवते? हे मात्र कळलेलं नाही.
‘सायेब’ या कथेत लेखकाच्या मित्राच्या जीवनाला एका नापास शिक्क्याने कशी कलाटणी मिळाली याचे वास्तव चित्रण आहे. परंतु कथेचा आशय आजच्या शिक्षण पद्धतीला सुसंगत वाटत नाही.
‘चकवा’ या कथेतील बज्याच्या डोक्यात भुताचा विचार आल्याने प्रत्यक्ष हव्याहव्याशा माणसाबरोबर बोलायची, एकांत सहवासाची संधी येऊन सुद्धा मनातलं गुपित मनातच ठेवून बाजाराचे सामान देखील कसे रस्त्यातच सोडावे लागते याची सुरस कथा आहे.
अनेक एफ.एम.वर सध्या सुरू असलेल्या फोनइन कार्यक्रमाची खिल्ली ‘टोमॅटो केचप’ या कथेत अगदी रास्त उडवली आहे. कारण खेडोपाडी रेंज नसताना, महत्त्वाचं काम असताना हा रेडिओवाला काळ-वेळ-प्रसंग न बघता समोरच्या माणसाची फिरकी घेतो पण लोक वैतागतात आणि ही फिरकी त्यांना किती महागात पडू शकते याचे ज्वलंत उदाहरण सतीश चव्हाण या व्यक्तीरेखेतून कळते.
रुसलेल्या बायकोने आपली आज्ञा पाळली नाही म्हणून तिची खोड गमतीदार पद्धतीने मोडणारा शिवा ‘गावठी गिच्चा’ मध्ये आपल्याला भेटतो. नवरा-बायकोतले किरकोळ वाद तिथेच सोडून दिले तरच संसार गोडी-गुलाबीने होतो हे सूत्र या कथेतून लेखक अलवार गुंफतो.
एकंदरीत ‘गावठी गिच्चा’ मधील सर्व कथा ग्रामीण जीवन डोळ्यांसमोर ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत आणि त्या वास्तव जीवनाशी निगडित आपल्या आसपास असणाऱ्या सा…
पुस्तकावर बोलू काही
‘गावठी गिच्चा’ लेखक श्री सचिन पाटील
अभिप्राय – सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈