सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ विशी  तिशी चाळीशी… डॉ. आशुतोष जावडेकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

(एका आगळ्या-वेगळ्या ढंगाने केलेले पुस्तक- परीक्षण ) 

साहित्यप्रकार : लेखसंग्रह 

लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर 

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन. 

प्रिय अरीन, तेजस आणि माही

तुम्हाला त्रिकुट म्हणू का थ्री इडीयटस… काही कळत नाही. पण त्यानं मला जे काही म्हणायचं आहे त्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही मला ओळखत नसणारच कारण मी एक सर्वसामान्य वाचक आहे. पण मी मात्र गेले कितीतरी दिवस तुम्हाला पाहतेय असं वाटण्याइतकी छान ओळखते. दोनतीन वर्षांपूर्वी लोकसत्तातल्या एका सदरात मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं. तेव्हाही मला तुमच्या मैत्रीचं, कायप्पाचा(व्हॉटस्अप) ग्रुपचं अप्रूप वाटलं होतं… पण का कोण जाणे मी तेव्हा तुमच्याशी कनेक्ट नाही होऊ शकले. पण विशी-तिशी-चाळिशी या पुस्तकातून तुम्ही भेटलात आणि मी नकळतच तुमच्याशी भावनिकरित्या जोडले गेले. नक्की कशाचा परिणाम… हे काही सांगता येत नाही पण आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यांच्याशी काही काळानेच आपली नाळ जुळते.  त्यात मैत्र हे नातंच असं की ते कधी… कुठे… कसं… का… जुळेल याबाबत काहीही सांगता येत नाही. आणि त्यात वय, शिक्षण, लिंग हे मुद्दे गौण असतात.

तर मुद्दा हा की तुम्ही  तिघांनी मला फारच कॉम्प्लेक्स दिलात. अगदी तेजसच्या बायकोसारखा!  म्हणजे आपला का नाही असा एखादा मैत्रीचा ग्रूप…. निदान एखादा तरी मित्र असावा अरीन किंवा तेजस सारखा असं राहून राहून मनात येतंय. काय हरकत आहे – कल्पना असली तरी वास्तवात साकार व्हायला ? सगळ्याच कल्पना काही पूर्णतः काल्पनिक नसतात त्यात थोडातरी तथ्यांश असेलच की.  आता बघा वधू – वर पाहिजे अशा जाहिराती सर्रास  दिसतात – तसे मिळतातही. पण मैत्र पाहिजे अशी जाहिरात नाही नं देता येत आणि लग्न जुळवण्यासारखं मैत्र नाही जुळवता येत. आता उदाहरण घ्यायचं तर माही रिकीच्या आठवणीनं डिस्टर्ब झालेली असते तेव्हा अरीनशी ज्या पद्धतीनं मोकळं होऊन बोलते आणि तो तिला समजून घेतो ते किती भारी आहे. सॉरी टू से माही, पण तेव्हा मी अगदी जेलस झाले होते तुझ्यावर… फार फार हेवा वाटला होता तुझा. आणि धीरजशी लग्न करण्याबाबत तू साशंक होतीस  तेव्हा तेजसनं तुला समजावलं, धीर दिला ते वाचून नकळत डोळे ओलावले. इतकं मोकळं होता येतं कधी? कुणापाशी? आणि इतकं मोकळं झाल्यावर ज्याच्यापाशी मोकळं होऊ त्याच्याशी नंतरही इतकं जिव्हाळ्याचं नातं राहू शकतं? कमाल आश्चर्य वाटलंय मला. नाही म्हणजे ब्रेकअप होणं, पूर्वीचं अफेअर असणं ते जोडीदाराला सांगणं इथपर्यंत गोष्टी घडतातही . पण त्या किती खरेपणानं आणि किती सोयीनं सांगितल्या जात असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे. इतकंच नाही तर रेळेकाकांसारख्या वडिलधाऱ्या व्यक्तीनंही हे नातं समजून घ्यावं. त्यात मनापासून सहभागी व्हावं हे सारं फारच सुखद धक्कादायक आहे. अरीनचा रुममेट अस्मित, गीता मावशी अशा कितीतरी मंडळींनी त्यांच्या वागण्याबोलण्यातून आपलंस केलं त्यामुळं हे मैत्र फक्त तुमचं राहिलं नाही, तर मैत्रीसाठी आसुसलेल्या प्रत्येकाचं झालं. प्रत्येकालाच तुमच्यामध्ये त्याचा किंवा तिचा मित्र-मैत्रीण दिसू लागले. जगण्याच्या नकळत राहून गेलेल्या जागा सापडल्या. आपल्या भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी संवाद साधला गेला. इथं मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आमचा विशी-तिशीतला जोश आणि तुमचा जोश यात कुठं काहीच कमी नाही.  पण मोठा फरक आहे तो व्यक्त होण्यात. तुमच्यातला ठामपणा पाहता जगण्यातली अपरिहार्यता आणि क्षणभंगुरता तुमच्या पिढीला अधिक जास्त कळली आहे आणि तुम्ही त्याचा खुलेपणानं स्वीकार केलाय. सोलो ट्रीपबाबत जे विचार तेजसच्या मनात येतात तेच त्याच वयोगटातल्या  आम्हाला पटतात. पण तिशीतल्या माहीला एक स्त्री म्हणून सोलो ट्रीप करतानाचे जे अडथळे जाणवतात ते इतरही वयातल्या  स्त्रियांनाही जाणवत असतीलच की. अरीनच्या पिढीकडे पाहून जाणवतं की सतत सामाजिक दडपण पांघरण्याचं व्रतच जणू आम्ही घेतलंय. कसंय ना आसपास पसरलेली गरीबी आम्ही पाहिलीये, वेळ प्रसंगी सोसलीये आणि आता वेगानं वाढणारी सुबत्ताही आम्ही पाहत, अनुभवत आहोत.  जी आत्ताच्या विशीतल्या पिढीला फारशी जाणवणार नाही. तेही खास करून मिडलक्लास, अप्पर मिडलक्लास, हायक्लासमधल्या तरुणांना. लोअर क्लासमध्ये विशी, तिशी आणि चाळिशी यांचे प्रश्नच वेगळे असतील. त्यांच्यातलं मैत्र कसं असेल, ते नात्यांकडे कसे बघत असतील असाही प्रश्न यानिमित्ताने मला पडला. कारण आत्ताच्या काळात फक्त आर्थिकच नव्हे तर वैचारिक दरीदेखील वाढत चालली आहे.  

जगण्याचे अनेक प्रश्न नव्यानेच निर्माण होतायत. सुखाच्या व्याख्या अनेक मितींनी बदलल्यात. त्यामुळे  पारंपारिक ठोकताळे आता पूर्णतः समाधानकारक ठरत नाहीत. अशा वेळी होणारी घुसमट ही फक्त कुणा एका पिढीची नाहीये तर सगळ्याच पिढ्या या घुसमटीला आज तोंड देत आहेत. आत-बाहेर कुठेच ताळमेळ नाही, अनंत कोलाहल माजलाय. म्हणून मग तुमच्या या विशी-तिशी-चाळिशी ग्रूपचं फारच कौतुक वाटतं. आणि असे ग्रूप व्हायला हवेत असं प्रकर्षानं वाटतं. मोकळं होता आलं पाहिजे, योग्य पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. तरच या कोलाहलातून आपला निभाव लागणार आहे. प्रत्येकाला सच्चा सूर सापडणार आहे. असे ग्रुप समाजाच्या सर्व स्तरात अधिकाधिक तयार होवोत. असं मैत्र अधिकाधिक विस्तारित होत जावं.  हीच शुभ कामना.

 

ता.क.

खरंतर ही भेट अपुरी वाटतेय. इतरही भरपूर गप्पा मारायच्यात (कंसातल्यासुद्धा). तुम्ही पुन्हा काही नवीन विषय घेऊन याल तेव्हा नक्की भेटूयात.  

तुमच्यासारख्या मैत्राच्या प्रतीक्षेत असलेली —

एक वाचक—                       

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
दीपाली

अतिशय नेटके आणि प्रामाणिक लेखन