पुस्तकावर बोलू काही
☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆
कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)
पुस्तकाचे नाव : “सैनिक हिमालयाचा “
लेखक : कर्नल शरदचंद्र पाटील ( निवृत्त )
प्रकाशक : अनुकेशर प्रकाशन
पृष्ठसंख्या : २२८
किंमत : रु. ३५०/-
(या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक, “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..)
तरुणपणी अक्षय कुमारचा सैनिक नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर बॉर्डर..चित्रपटांमधून सैनिक फक्त गरजेनुसार दाखवला जातो; खरी थीम तर लवस्टोरीच असते.. अलीकडे आलेले सत्य घटनेवरील काही चित्रपट याला अपवाद आहेत. या चित्रपटातून सैनिक मला जितका समजला नाही, तितका परवाच वाचलेल्या एका पुस्तकातून समजला. पुस्तकाचे नाव आहे, ‘सैनिक हिमालयाचा’.. आणि लेखक आहेत निवृत्त कर्नल शरदचंद्र पाटील..
चित्रपट पाहताना एक गोष्ट माईंडमधे सेट असते की, समोरचा सैनिक हा सैनिक नसून फक्त एक्टिंग करतोय. अनेक रिटेक घेऊन त्याने प्रत्येक सीन शूट केलेला असतो. मात्र वास्तवात सैनिकांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक सीन एकदाच, एका शॉटमधे ओके आणि सक्सेसफुल करायचा असतो. हाच फरक आहे चित्रपटातून सैनिक बघण्यात आणि प्रत्यक्ष पुस्तकातून सैनिक समजण्यात..
अलीकडेच प्रकाशित झालेले हे पुस्तक नुसते पुस्तक नसून, एका सैनिकाचे आत्मवृत्त आहे. एका सैनिकाने वाचक आणि भारतीय जनतेशी साधलेला संवादच आहे. २६ – २७ वर्षाच्या सैनिकी आयुष्यात लेखकाने दहा अकरा वर्षे हिमालयात घालवली. आजही लेखकाला हिमालय साद घालतो. आणि खरं सांगू का? पुस्तक वाचताना मी ही कित्येक वेळा मनोमन हिमालयात जाऊन आले. इतका जिवंतपणा लेखनातून जाणवला. प्रसंग चांदण्या रात्रीचे असोत, अंधाऱ्या रात्रीचे असोत, हिमवृष्टीचे असोत किंवा हिमस्खलनाचे असोत.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा करण्यात लेखकाने कमालीचे यश मिळवले आहे. बर्फाच्या गुहेत अडकलेला प्रसंग असो किंवा राहत्या बंकरवर कोसळलेल्या महाकाय शिळेचा प्रसंग असो; केवळ नशीब बलवत्तर म्हणून लेखक जिवंत राहतात.. हे वाचून मन विषण्ण होते. कसे राहत असतील हे सैनिक जीवावर उदार होऊन..? सियाचीन हिमनदीसारख्या मृत्यूच्या जबड्यात जाऊन देशसेवा करण्याचे धैर्य या सैनिकांच्या अंगी कुठून येत असेल देव जाणे ..! तीन महिने दाढी न करता, केस न कापता,अंघोळ न करता? बर्फात 24 तास थंडी आणि हिमवृष्टीशी युद्ध तर चालू असते या सैनिकांचे..! मी तर आत्तापर्यंत समजत होते, सियाचीन हे नाव चीनच्या नावावरून पडले असेल, पण तसे नाही..तिबेटी भाषेत ‘सिया’ म्हणजे ‘गुलाब’ आणि ‘चेन’ म्हणजे ‘मुबलक’..सियाचेन म्हणजे ‘मुबलक गुलाबांची जागा’.. हे या पुस्तकातूनच उलगडले.. ऑफिसर्स मेस म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने चैनीची जागा, पण तसे नाही..हवामानाशी जुळवून घेण्याची कला म्हणजे अॕक्लमटायझेशन..अशा कित्येक सैनिकी संकल्पना जाणून घ्यायच्या असल्यास पुस्तक वाचावे..आतापर्यंत दोन दंश माझ्या परिचयाचे होते. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विंचूदंश.. पण हिमदंश पण असतो हे पुस्तक वाचून कळले.. हाताच्या बोटाचा सतत बर्फाशी संपर्क येऊन बोटांची संवेदनाच निघून जाते. प्रसंगी बोटे कापावीही लागतात. बोटावर निभावले तर ठीक, नाही तर मृत्यूही येऊ शकतो..इतका कठीण असतो हा हिमदंश.. खरेच या आणि अशा कित्येक गोष्टी लेखकाने या पुस्तकात जीव ओतून लिहिल्या आहेत.
कॅप्टन कपूर यांच्या जीवावर बेतलेला हिमस्खलनाचा, त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेला प्रत्यक्ष अनुभव वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.सिक्कीमच्या जंगलातील जळवांचा हल्ला असो वा हिमालयातील प्रत्येक ठाण्यावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत असो; या सैनिकांच्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याला सलाम करावासा वाटतो..
कश्मीर फाईल्स जर समजून घ्यायची असेल तर एका सैनिकाइतकी ती कोणीच मांडू शकत नाही. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे मी म्हणेन..जागोजागी वापरलेली कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे पुस्तकाच्या आशय-विषयाचे सौंदर्य वाढवतात. दारूगोळ्याची साफसफाई, हिमनदी, सफरचंदाच्या बागांची चित्रे खरोखर पाहण्यालायक आहेत..मधेमधे प्रसंगानुरूप लिहिलेल्या गज़ला लेखकाच्या साहित्यिक प्रतिभेची ओळख करून देतात.. खरे तर अशी पुस्तके सैनिकाकडून लिहिणे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून सैनिकांविषयी सामान्य जनतेच्या मनात आदर निर्माण होईल आणि तरुण वर्ग सैनिक होण्याकडे प्रवृत्त होईल..सैनिक कोणत्या हालअपेष्टातून जातात, ते ही सर्वांना कळेल..आपण विकेंडला मौजमजा करतो, सण,समारंभ साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो..तेव्हा हे सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर कुठे तरी सीमेवर देशाचे रक्षण करत असतात.. अशा प्रत्येक सैनिकाला मानाचा मुजरा !
या लेखातून सर्वांना विनंती ..चला थोडे सैनिकांनाही प्रसिद्ध करूया.. कारण खरे हिरो तेच आहेत, चित्रपटातले नव्हे.. लेखकाने पुस्तकात लिहिलेली काही वाक्ये, खूप काही सांगून जातात.. जसे की,
“…संपूर्ण सैनिकी आयुष्यात फाजील आत्मविश्वास चालत नाही. आत्मविश्वास असावा. धाडस असावे, पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच ! तसे केले नाही तर कधी मृत्यू झडप घालेल ते सांगता येत नाही ..”
आणखी एका प्रसंगी लेखक म्हणतात, ” पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचे ज्ञान यात जमीन-अस्मानाचा फरक असतो..” आणि उपसंहारमधे लिहिलेली कविता, ‘त्रिवार वंदन’ तर लाजबाव आहे.
या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक, “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..
परीक्षण : अलकनंदा घुगे आंधळे
औरंगाबाद
मोबाईलः ९४२२२४३१५९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/सौ. सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈