☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह “धुक्यातील वाट” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. दीपा पुजारी ☆ 

कथा संग्रह  – धुक्यातील वाट

लेखिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक – श्री नवदुर्गा प्रकाशन – कोल्हापूर

श्रीमती उज्ज्वला केळकर

धुक्यातील वाट हा  उज्ज्वला केळकर यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाच मनापासून स्वागत. या छोटेखानी पुस्तकातून लेखिकेने अनेक वेगवेगळ्या कथाविषयांना वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या या प्रयत्नात यशस्वी झाल्या आहेत.

सोळा कथांचा हा कथासंग्रह लेखिकेच्या अंगी असलेल्या अनेक पैलूंची ओळख करून देतो. भाषेवर प्रभुत्व असूनही सरळ,साधी,सोपी लेखनशैली, तरीही प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद त्यांच्या लिखाणात आहे. आशय समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांना साधली आहे. साधे लिखाणही मनावर कसे छापा उठवू शकते हे कळण्यासाठी हा कथासंग्रह जरूर वाचावा. ओघवते सहज लिखाण, साधी शब्दरचना, थोडक्यात आशय मांडणारं लेखनकौशल्य अशा अनेक गुणवैशिष्ट्यांनी हा कथासंग्रह  परिपूर्ण आहे.

दोन तीन पानांच्या लहानशा कथा थोडक्या वेळात वाचता येतात.म्हणूनच जास्त वाचनसमाधान देतात. यातील बहुतेक कथा संवेदनशीलते बरोबर सामाजिक बांधिलकीची लेखिकेला असलेली जाण लक्षात आणून देतात. यातील काही कथांचा आवर्जून ऊल्लेख करावासा वाटतो.

‘धुक्यातील वाट’ ही मुखपृष्ठ कथा खूप काही शब्दांच्या पलीकडचे सांगून जाते. सुरवातीला ही प्रेमकथा वाटते. पण कथानक जसजसे सरकत जाते तसतसे नायकाच्या मनातील विचारांचे पदर उलगडत जातात आणि ही कथा म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा केलेला आदर आहे, कलेला दिलेली नि:सीम दाद आहे हे लक्षात येते.सुरांच्या सम्राज्ञीला , तिच्या सुरावटींनी दिलेल्या आनंदघनाला तिच्याच चित्राच्या रुपात कुंचल्याचे अभिवादन आहे.या कथेतील धुक्याचं वर्णन करताना रोमरंध्रातून आत झिरपत चाललंय अशा शब्दात जेव्हा लेखिका करते, तेंव्हा आपणच धुक्यातून चालत असल्याचा भास   होतो.

‘पांघरूण’ ही  कथा दारिद्र्याच विदारक रुप दाखवते. परदेशातील धर्मादाय संस्था तेथील काही कुटुंबांच्या मदतीने शाळेतील काही मुलांना दत्तक घेते. तिथल्या पालकांनी पाठवलेल्या पत्रातून एक अनोख जग सर्जासमोर साकारत असतं.पण दारुड्या बापामुळं निरागस मन कोसळून जातं. झोपडीच वर्णन, ठिगळं जोडून आकाश शिवण्याची आईची धडपड, बेदरकार, बेफिकीर, चंगळवादी, स्वार्थी बाप यथार्थ ऊभे करण्यात शब्दप्रभुत्व लक्षात येतं.

‘अनिकेत’ या कथेत    समाजासाठी कळकळ , निसर्गसंवर्धनाची जाणीव, अशा विविध कार्यासाठी आपले आयुष्य वेचणारा अनिकेत , लोकांचा आवडता होऊनही कुठेच न गुंतता आपला प्रवास सुरु ठेवतो. समाजसेवेचे व्रत घेण्याची गरज स्वतःच्या वागण्यातून ठसवतो.

‘डायरी’ ही,  क्षणिक, फसव्या मोहाला बळी पडून तरुण आयुष्यातून कसं ऊठावं लागतं याची करुण कथा आहे. त्यांच्याकडे आशेने डोळे लावून बसलेल्या पालकांची आधाराची काठी मोडते. भावस्वप्नं बघणारी मैत्रीणही कोलमडून जाते.मन सुन्न करणारी ही कथा नायकाच्या डायरीच्या रूपातून सामाजिक भान जागरुक  करते.

‘त्याची गडद सावली’ या  या कथेत नवीन जोडीदारा बरोबर सुसंवाद साधताना पहिल्या दिवंगत जोडीदाराच्या येणाऱ्या आठवणी, दोघांच्या स्वभावातील फरक यामुळे नायिकेची होणारी घुसमट स्पष्ट तरीही साधेपणाने मांडली आहे.

अशी घसमट पुरुषांची देखील होते हे ‘आंदोलन’ या कथेत दाखवले आहे. अनुरुपता नसेल तर संसारात अर्थ उरत  नाही. मोठ्या माणसांनी लहानपणीच अविचाराने मुलांचे लग्न केलं तर होणारा परिणाम ,त्यातून निर्माण झालेली हतबलता. वैवाहिक आयुष्य यशस्वी होण्यासाठी  कशाला महत्त्व दिले पाहिजे हे या दोन कथा सांगतात.

गरिबीनं ग्रासलेला,बापाविना पोरका, कुटुंबातील सगळ्यांना निदान घासभर अन्न मिळावं म्हणून नाईलाजाने वाईट मार्गाकडे वळलेला यशवंत साहेब एक विचारू असा प्रश्न विचारुन कोर्टाला तर निरुत्तर करतोच पण वाचकांना ही कुंठीत करतो.

आश्रमाबाहेरच्या जगाची प्रतिक्षा करणारा अनाथ रमेश असो वा लीडरचा नायक असो आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी  मनात घर करतात.

समोर धुसरं दिसत असतानाही, मनाला उभारी देणार्‍या , लढण्याचं बळ देणार्‍या , वास्तवतेची जाणीव आहे तरी दक्ष राहून पाऊलवाट चालायची आहे असा संदेश देणार्‍या  कथांच्या या संग्रहाला नावही साजेसं आणि योगेश प्रभुदेसाईंच मुखपृष्ठ ही तितकंच समर्पक!!

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments