सौ. वंदना अशोक हुळबत्ते
पुस्तकावर बोलू काही
☆ साईड इफेक्ट्स… सुश्री नीलम माणगावे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
पुस्तक परिचय
पुस्तक–“साईड इफेक्ट्स”
लेखिका — सुश्री नीलम माणगावे
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे – २९८
किंमत – ३५० रू
“साईड इफेक्ट्स” ही कादंबरी मला अशी भावली……वंदना अशोक हुळबत्ते
नीलम माणगावे यांची ” साईड इफेक्ट्स” ही कादंबरी दोन दिवसात वाचून झाली.एकदा कादंबरी हातात घेतली ती वाचूनच खाली ठेवली.ही कादंबरी एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. कादंबरी वाचताना आपण कादंबरीतील व्यक्तिरेखेचे बोट धरून चालू लागतो.त्यांच्या सुखदुःखात एकरूप होतो.आपण कादंबरी वाचत आहोत हे विसरतो.आपण एक चित्रपट बघत आहोत असा भास निर्माण होतो.कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखिका सांगतात साधारण १५-२० वर्षांपूर्वी वर्तमान पत्रातून आलेल्या वेगवेगळ्या गावात घडलेल्या दोन बातम्यांनी मी हादरले त्याच वेळी या कथेचे बीज मला सापडले.या कादंबरीशी त्या बातम्यांचा संबंध फक्त निमित्तमात्र आहे. बाकी व्यक्तिरेखा काल्पनिक आहे.पण कादंबरी वाचताना कुठेही या व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत असे वाटत नाही.स्त्रियांची होणारी कुचंबणा शहरात काय खेड्यात काय सगळीकडे सारखीच.तिच्या भावनांना, तिच्या मताला, तिच्या म्हणण्याला किंमत असतेच कुठे? ती किती ही शिकली,तिने नोकरी केली,ती स्वतंत्र असली तरी, तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.तिचा पाय संसारात, घरात मुलांच्यात, रुढी परंपरेत अडकलेला असतो. स्त्रिया कधी आपलं मत स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. खेड्यात तर तिला घराबाहेर पडताना ही सासू, सासरे ,नवरा ,दीर ,मुले ,यांना विचारावे लागते. स्त्रियांच्या साध्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर अशावेळी लैंगिक सुखाच्या तिच्या कल्पना ती कुणा समोर बोलणार? तिची तळमळ कुणाला समजणार? तिच्या मनाचा, समाधानाचा, विचार कोण करतो ?
सुश्री नीलम माणगावे
या कादंबरीत जयराम या एका पुरूषा सोबत अनेक स्त्रिया राजीखुशीने कशा काय संबंध ठेवतात? हे कृत्य करण्यासाठी त्या का तयार होतात? कश्या तयार होतात? हे लेखिकेने अतिशय ओघवत्या शैलीत मांडले आहे.
परपुरषाशी विवाहबाह्य संबंध. हा विषय अतिशय संवेदनशील. या बद्दल तोंड उघडून बोलण्याची हिम्मत होत नाही. चार चौघात बोलतानासुद्धा आपल्याला कोणी ऐकत नाही ना? बघत नाही ना ? ऐकले तर काय म्हणतील ? यांची काळजी घेतली जाते अशावेळी या विषयावर उघड उघड कादंबरी लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पलण्यासारखे होते. सिद्धहस्त लेखिका नीलम माणगावे यांनी हे शिवधनुष्य पेलले. कादंबरीचा विषय बंडखोर आहे.विषय वाचून हा विषय कसा मांडला असेल या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
स्त्री मनाची होणारी घुसमट,तिचा एकटेपणा, शारीरिक संबंधांचे आकर्षक, शारीरिक झळ,विवाहबाह्य शरीरिक संबंध हे कादंबरीतील व्यक्तिरेखेच्या मांडणीतून, संवादातून उलगडत जाते. स्त्री मनाची दाहकता समाजासमोर हळुवार पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे.
गावातील सगळ्या बायका मिळून जयरामला ठेचून मारतात. तेव्हा गावात एकच वादळ उठते. अनेक स्त्रियांचे जयरामशी संबंध होते हे जेव्हा कुटूंबा समोर आले, समाजा समोर आले.तेव्हा कुटुंबे उध्वस्त झाली. स्त्रियांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले, माणसे कोलमडून पडली, मुलींची ठरलेली लग्ने मोडली, प्रत्येकजण आपल्या घरातील स्त्रीला संशयाने बघू लागला. एका घटनेचे गावात झालेले हे साईड इफेक्ट्स वाचकाला हादरून सोडतात.हे का झाले? कसे झाले? पुढे काय ? यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत दिसून येते.
कादंबरीत कुठेही अतताई पण दिसत नाही, कुठे ही आक्रोश दिसत नाही, कुठे ही बंड दिसत नाही. तरी ही सकारात्मक विचार करण्यास ही कादंबरी भाग पाडते लग्न झालेल्या पुरुषांनी अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवले तर त्यात समाजाला काही वावगे वाटत नाही आणि त्या पुरूषाला माझे काही चूकले आहे,हे लाजिरवाणी जीवन संपवले पाहिजे, मी आत्महत्या केली पाहिजे असे काही वाटत नाही. समाज या गोष्ट स्विकारतो. पण हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत घडली तर मात्र नवऱ्यापासून समाजापर्यंत सगळे तिला कुल्टा समजतात, तिच्या जगण्याचा अधिकार नाकारता, तिला शब्दांनी टोचून टोचून घायाळ करतात, तिचे जीवन नरक बनवतात,अश्यावेळी आत्महत्ये शिवाय तिच्या पुढे कोणताच पर्यायच शिल्लक राहत नाही. समाजात पुरुषांना आणि स्त्रियांना वेगळा न्याय का ?
विवाहबाह्य संबंध चांगले नाहीत त्याचे समर्थन लेखिका ही करत नाही पण “आज्ञत्महत्या करण्याएवढी ही मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट नाही”हे समजून घेतले पाहिजे. तिला समजून घेतले पाहिजे,तिचा संसार वाचला पाहिजे,ती जगली पाहिजे. हा विचार लेखिकेने कादंबरीत प्रकर्षाने मांडला आहे.यासाठी लोकप्रबोधन सर्वात महत्त्वाचे आहे.
एखादी घटना घडली तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याचे परिणाम जास्त परिणामकारक दिसतात.गावाचे जनजीवन ढवळून निघते.सारा गाव कसा होरपळून निघतो. हे लेखिकेने कादंबरीत दाखवले आहे.
नीलम माणगावे यांचे मी अभिनंदन करते इतका गंभीर विषय किती सहजतेने सोप्या पद्धतीने कादंबरीत मांडला आहे या कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांची भाषा, त्यांचं वावरणं, सारे एका मर्यादेत आहे कुठेही बीभत्सपणा आढळत नाही, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे सामर्थ्य लेखणीत आहे म्हणून कादंबरी सलग वाचली जाते पुढे काय होईल, पुढे काय होईल, ती अशी का वागली, तिचे पुढे काय होणार, हे प्रश्न पडतात आणि ते सोडवण्यासाठी आपण पुढे वाचत राहतो.
प्रिया आणि प्रतिभा ही प्रकरणे या कादंबरीचा गाभा आहे. कोलमडलेले गाव आणि उध्वस्त झालेली मने पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड महत्वाची आहे. जीव अनमोल आहे. जीव वाचला पाहिजे. जगणं महत्त्वाचं आहे हेच या कादंबरीचे सारं आहे असे मला वाटते.
एक वाचक म्हणून मला ही कादंबरी जशी भावली तसे मी माझे मत मांडले.साईड इफेक्ट्स ही कादंबरी ग्रामीण जीवन अधोरेखित करणारी आहे. विवाहबाह्य संबंधा बाबत ग्रामीण महिला कसा विचार करतात हे ही कादंबरीतून स्पष्ट होते. स्त्री माणूस आहे. ती चुकू शकते. तिने नकळत चूक केली तर चूक सुधारण्याची संधी तिला ही मिळाली पाहिजे. हे समाजाने, पुरूष वर्गाने समजून घ्यावे ही प्रांजळ इच्छा लेखिकेने कादंबरीतून मांडली आहे.
ह्या कादंबरी वर चांगला चित्रपट तयार होईल. ही कादंबरी समाजाला एक नवा विचार देईल असे वाटते. तो विचार पचविण्याची ताकद वाचकांच्या असावी म्हणजे झालं.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈