? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘अल्याड-पल्याड’ —अलक संग्रह… म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे) ☆ परिचय – परिचयकर्ता — प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ ☆

पुस्तकाचे नाव —अलक -संग्रह ” अल्याड- पल्याड ” 

लेखक –- म.ना.दे ( होरापंडीत मयुरेश देशपांडे )

प्रकाशक –-परीस पब्लिकेशन – सासवड , जि. पुणे.

पृष्ठ संख्या– ११२.

मूल्य- रु.८०/-,

मयुरेश देशपांडे यांनी लिहिलेला ‘अल्याड पल्याड’ हा अलक कथासंग्रह आज वाचून संपवला. एका बैठकीत नाही. कारण त्यातील प्रत्येक कथा आकाराने लहान असली तरी मानवी जीवनातील काही विदारक तर काही सुखांत सत्त्ये  पानोपानी आढळून येतात. म्हणून बारकाईने सगळ्या अलक वाचल्यावर माझी मतं लिहितो.

‘ आजकाल वाचन कमी होत आहे,वाचनसंस्कृती वाढायला पाहिजे,वाचणं हीच माणसाची खरी ओळख आहे…’ वगैरे वगैरे कितीही म्हटलं तरी एक सत्य आहे -आज माणसांना मिळणारा फावला वेळ कमी असतो, त्यातही आपले प्राधान्यक्रम हेही या तक्रारीमागचं एक मोठं कारण आहे. मला आठवतं, पूर्वी गावात वर्तमानपत्रं फक्त ग्रामपंचायतीत येत. तेही सायंकाळी ती वाचणं हा माझा रोजचा काही तासांचा दैनंदिन उपक्रम असायचा. क्वचित मिळणारी नियतकालिकंही पुरवून पुरवून म्हणजे एकच मजकूर मी अनेकदा वाचून काढी. पुस्तकातल्या कविताच नव्हे तर  काहो धडेही  माझे पाठ होते. आज हे थांबलं ही शोकांतिका असली तरी खरं आहे. आज भेट मिळालेलीच काय अगदी विकत घेतलेली पुस्तकं, अगदी नामवंत लेखकांचीही असली तरी आपण पूर्ण वाचत नाही. समाजमाध्यमं इतकं साहित्य उपलब्ध करून देतात की, काय वाचू आणि कधी हेच ठरवता येत नाही. या पार्श्वभूमीवर  ‘अल्याड पल्याड’  हे पुस्तक अपवाद ठरते. यातील पहिलीच अलक लेखकाने भारतीय समाजात  वंचितांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  यांच्याविषयी लिहून औचित्य साधले आहे. सगळ्याच अलक कथा या  अर्थपूर्ण आहेत. अनेक लेखक मराठीच्या आत्यंतिक प्रेमापोटी अनाकलनीय मराठी शब्दांचा प्रयोग करून लिखाण हे बोजड करतात. इथे लेखकाने ते जाणीवपूर्वक टाळले आहे. लेटमार्क,बेस कॅम्प असे शब्द हे दर्शवतात. अनेक अलकमधून  स्थानिक बोलीभाषेची योग्य रचनाही दिसते. समाजातील विदारक सत्ये दाखवताना अनेक विसंगत बाबीही परिणामकारकपणे मांडल्या आहेत.  ‘ वडापाव ‘ या आशयाच्या कथेतून स्त्री सक्षमीकरण, पत्नीची कुटुंबातील महत्त्वाची भूमिका जाणवते. वैद्यकीय उपचारांसाठी घरातल्या बायकोच्या राहिलेल्या मंगळसूत्राकडे पहाणा-या नवऱ्याची अगतिकता प्रभावीपणे एका अलकमधून  उलगडते. भंगार गोळा करणारी स्त्रीही आपले सौंदर्य फुटक्या आरशात पहाते, ही अलक आपल्या समाजातील आजचे एक सत्त्य सांगते. मात्र केवळ दु:ख उगाळत बसणारा हा लेखक नाही, तर ‘ दु:ख उधळण्यास आता आसवांना वेळ नाही ‘ हा बाबा आमटे यांचा  आशावादही इथे ठायीठायी दिसून येतो. सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. 

माणूस हा श्रेष्ठ आहे याच भूमिकेतून लिहीत असलेले साहित्यिक मयुरेश देशपांडे यांच्या साहित्यप्रवासाला मनापासून शुभेच्छा.

परिचय – प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

मो ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments