सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
☆ पुस्तकावर बोलू काही ☆ कुत्रा छंद नव्हे संगत – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
“कुत्रा छंद नव्हे संगत ” पुस्तक
१९९९ साली, “स्वरमाधुरी” प्रकाशनने प्रकाशित केलेल्या श्री शांताराम नारायण दाते यांनी मराठीतून लिहिलेल्या “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकात कुत्रा हा प्राणी आपल्यासाठी सर्व दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याबद्दल सविस्तर सांगितले आहे.पुस्तकाचं मुखपृष्ठ हे त्यांचा स्वताचा प्रिन्स हा कुत्रा आणि बाकीची इतर चार-पाच जातीची कुत्री यांचा फोटो असं आहे.
मिरज जवळील गणेश वाडी सारख्या गावात दाते यांचे मोठे भाऊ बेळगावहून कुलुंगी जातीची कुत्र्याची पिल्ले आणून त्यांना शिकवीत असत. ते सर्व पाहून त्यांना सगळ्या गोष्टी काही प्रमाणात माहित होत्या. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते परगावी गेले. त्यांना गावाबाहेर मोठा बंगला असे. त्यामुळे कुत्र्याची गरज भासायला लागली. दरम्यान स्काॅटलडयार्डने प्रसिद्ध केलेलं एक पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्याचबरोबर “लसी कम होम” आणि “रिन टिन टिन” हे कुत्र्याचे उत्कृष्ट काम असलेले दोन चित्रपट पहायला मिळाले. योगायोग असा की दोनचार दिवसातच एक कुत्र्याचे पिल्लू दाराशी आले. त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याचा लळाच लागला. नामकरणही झालं. “प्रिन्स” तीन महिन्याचा झाला. आणि त्याला शिकवायला सुरुवात केली. अगदी साधा गावठी कुत्रा पण इतका उत्तम काम करायला लागला की केंनेल क्लबच्या प्रदर्शनात त्याने पुरस्कार मिळवलान. “राजकमल” च्या “फुलं और कलिया” या बोलपटात प्रिन्सने इतके उत्तम काम करून प्रेक्षकांची वहावा मिळवलीन की त्या बोलपटाला पंतप्रधानांचे सुवर्ण पदक मिळाले अनेकांनी प्रिन्सला प्रदर्शनात पाहिले होते. बोलपटही पाहिला होता. त्यामुळे दातेंकडे डॉग ट्रेनिंग साठी चौकशची रांग लागली. नोकरी आणि डॉग ट्रेनिंग कस जमणार? संपूर्ण विचाराअंती निर्णय घेतला. आणि नोकरी सोडून आनंद देणारा डॉग ट्रेनर हा उद्योग सुरू केला. बारा वर्षे या उद्योगाला जणू वाहूनच घेतले. ठाण्यात राहून मुंबईत कुलाब्यापासून जुहू पर्यंत जवळ जवळ दोनशे कुत्र्यांना शिकवले. राजेश खन्ना, दिलीपकुमार, वामन हरी पेठे, डिंपल कपाडिया असे अनेक प्रतिष्ठित लोकांचे कुत्रे त्यांनी शिकवून तयार केले. अनेकांच्या ओळखी झाल्या. कितीतरी कामे सोपी झाली. सगळ्याचे श्रेय ते आपल्या प्रिन्स ला देतात. इंडियन कॅनेल क्लबच्या प्रदर्शनासाठी पाच वेळा त्यांना परीक्षक म्हणून बोलावले होते. त्यांचा कुत्र्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यासही सखोल होता. देखणा काली, ग्रेटडेन, अल्सेशियन, डॉबरमन, बाॅक्सर, लॅब्राडाॅर, डाल्मेशियन, पामेरियन किती नावं सांगावीत! पण प्रत्येक जातीचा स्वभाव, वैशिष्ट्य, रंग, बांधा अशी माहिती त्यांना पाठ होती. मुंबई दूरदर्शन वर कुत्र्यांसह मुलाखती आणि मार्गदर्शनही त्यांनी केले होते. चंपी, ग्लडी, रंभा, आणि प्रिन्स या चार श्वानांचा पंचवीस वर्षाचा घरात सहवास त्यांना लाभला होता.
शांत ना दाते हे माझे मामा. आम्ही भेटलो की कुत्रा या विषयावर तासन-तास गप्पा मारत बसायचो. तेव्हा मी त्यांना बरेच दिवस त्यांचे कुत्र्यांचे अनुभव आणि माहिती यावर मराठीत पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत होते. त्यांनी ते मनावर घेतलं. आणि “कुत्रा छंद नव्हे संगत” या पुस्तकाचा जन्म झाला.
पुस्तकाचे अंतरंग पुढील भागात
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈